Home > Political > शिंदे व ठाकरे यांच्यात नरेंद्र मोदी मध्यस्थी करणार?

शिंदे व ठाकरे यांच्यात नरेंद्र मोदी मध्यस्थी करणार?

शिंदे व ठाकरे यांच्यात नरेंद्र मोदी मध्यस्थी करणार?
X

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शपथ घेतली. हा दिवस येण्याअगोदर काही दिवस राज्याच्या राजकारणात अगदी नाट्यमय परिस्थिती होती. राज्याच्या राजकारणात नक्की काय घडतंय याचा सुगोवा भल्याभल्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा आला नाही. आदल्या दिवशी राज्यसभेचे तर दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. विधान परिषदेच्या निवडणुका पार पडताच दुसऱ्याच दिवशी एक बातमी समोर आली. ती म्हणजे एकनाथ शिंदे नॉटरिचेबल, यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना पक्षात सध्या जे काही घडत आहे त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक व पदाधिकारी सुद्धा नाराज असल्याचे पाहायला मिळते आहे. सर्वजण उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकत्र यावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्यामुळे उद्धव साहेब व शिंदे साहेब यांची मध्यस्थी नरेंद्र मोदी यांनी करावी अशी अपेक्षा शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षातच बंड केला आणि आपल्या सोबत चाळीसहून अधिक आमदार नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं. शिवसेनेत पडलेल्या या मोठ्या फुटी नंतर आता खरी शिवसेना कुणाची शिंदेंची की ठाकरेंची हा वाद सुरू आहे. त्यामुळे खरंतर सर्वसामान्य शिवसैनिक हैराण आहे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जावो अशी भावना सर्वसामान्य शिवसैनिक व्यक्त करतोय. हीच भावना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा आहे. दिपाली सय्यद यांनी तर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मनधरणी करण्यासाठी नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून मा. नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या ८ जुलै ला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस देखील असण्याची शक्यता आहे. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तसंच भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान नक्की काय घडतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 8 July 2022 3:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top