Home > Political > Sharad Pawar : मोदी साहेब पुढाकार घेत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल, नक्की विषय काय?

Sharad Pawar : मोदी साहेब पुढाकार घेत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल, नक्की विषय काय?

Sharad Pawar : मोदी साहेब पुढाकार घेत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देईल, नक्की विषय काय?
X

राज्यात मागच्या चार महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींची आकडेवारी सांगत राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्ये करण्याऐवजी या भगिनींच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत असं म्हणत त्यांनी थेट फडणवीसांनाच सुनावलं आहे. याबरोबरच यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देखील पंतप्रधानांना असे वक्तव्य करणे अशोभनीय असल्याचं म्हंटले आहे. यासोबत भाजप विधिमंडळ आणि संसद याठिकाणीही स्त्रियांना आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेत असेल तर आम्ही पाठिंबा देऊ असं देखील त्यांनी म्हंटलं आहे. काल पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण, महिला आरक्षण व पंतप्रधानांचे सुप्रिया सुळे यांच्याबाबतचे वक्तव्य याबाबत नक्की काय म्हंटलं आहे वाचा...

राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्ये करण्याऐवजी या भगिनींच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत..

आज पुणे येथे पत्रकारांसमोर विविध घडामोडींवर भूमिका मांडली. महाराष्ट्रात राज्य सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष झाले. या काळात राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. परंतु माझ्या मते कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न क्रमांक एकचा आहे. यामध्ये अनेक पोटभाग असले तरी महिला आणि मुलींवरील हल्ले हा सर्वाधिक चिंतेचा भाग आहे. महिला बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यातील अशा घटनांची अधिकृत माहिती सरकारकडून मिळवली. त्यामध्ये पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात २३ जानेवारी ते २३ मे या कालावधीत पुणे - ९३७, ठाणे -७२१, मुंबई - ७३८, सोलापूर - ६२ अशा एकूण २४५८ महिला मागील पाच-सहा महिन्यात बेपत्ता झाल्या आहेत. तसेच बुलडाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, नंदूरबार, भंडारा, रत्नागिरी, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये एकूण ४,४३१ महिला बेपत्ता आहेत. २०२२ ते मे २०२३ अ या दिड वर्षाच्या काळात एकूण बेपत्ता मुली आणि महिलांची संख्या ही ६,८८९ आहे. माझ्या मते राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्ये करण्याऐवजी या भगिनींच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत. ज्या महिला बेपत्ता झाल्या त्यांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबियांच्या हवाली कसे करता येईल याची खबरदारी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

संसदेच्या सदस्याबद्दल असे मत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त करणे योग्य नाही...

माझ्या पक्षाबद्दलही प्रधानमंत्र्यांनी मत व्यक्त केले आहे. मुलीला प्रोत्साहित करायचे असेल तर राष्ट्रवादीला मत द्या, असे त्यांनी सांगितले. माझी मुलगी तीन वेळा पार्लमेंटमध्ये निवडून आली आहे. एखाद्या वेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी ठरते. पण दुसऱ्या, तिसऱ्या निवडणुकीत यश मिळणे, त्यानंतर पार्लमेंटच्या कामगिरीत उच्च दर्जाचा क्रमांक ठेवणे, तिला आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला. मोदी साहेबांनी काहीही सांगितले तरी स्वत:चे कर्तृत्व असल्याशिवाय देशातील मतदार नेहमीच मतं देत नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याबद्दल असे मत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त करणे योग्य नाही. ही पदे या सर्व संस्था आहेत. या संस्थेची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. जे या संस्था सांभाळतात त्यांनी संसदेतील सदस्य हे देखील एक संस्थात्मक पद आहे याचे भान ठेवून त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. राज्यातील चित्र पाहिल्यानंतर जे अस्वस्थ आहेत तेच अशाप्रकारचे हल्ले करतात.

भाजप महिला आरक्षण देणार का ?

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना मी महिलांसाठी आरक्षण दिले. राज्यातील हे धोरण राष्ट्रीय पातळीवरही राबवले याचे आम्ही स्वागत केले. आमचा आग्रह आहे की स्त्रियांना आरक्षण द्यायला हवे. आता हे आरक्षण केवळ महानगरपालिकेपर्यंत देऊ शकलो. विधिमंडळ आणि संसद याठिकाणीही स्त्रियांना आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. मोदी साहेब यामध्ये पुढाकार घेत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या धोरणाला पाठिंबा देईल, याशिवाय अन्य राजकीय पक्षांशी बोलून त्यांनाही यात सहभागी कसे करून घेता येईल, याची आमची तयारी आहे.

हे ही पहा..

तरीही ती स्वप्न का बघते? Celebrating the Great Stories of Great Ladies | Maxwoman Conclave

Updated : 30 Jun 2023 5:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top