Home > Political > रुपाली चाकणकरांचे कोणाला समर्थन?

रुपाली चाकणकरांचे कोणाला समर्थन?

रुपाली चाकणकरांचे कोणाला समर्थन?
X

राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज आता राजकीय विश्लेषक सुद्धा बांधू शकत नाही आहेत. राज्यात वारंवार राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारचे नवीन राजकीय नाट्य काल आपल्या सर्वांना पाहायला मिळालं. आपणा सर्वांना माहित आहे तीन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. या महाविकास आघाडीमधील शिवसेना पक्षात फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा मोठा गट घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर या शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होतात न होतात तोपर्यंत पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळाला.

काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला व ९ लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या सहकाऱ्यांच्या निर्णयानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या नक्की काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात अनेक जण असल्याचे म्हटलं जात आहे तसे दावे त्यांच्याकडून केले जात आहेत. आज जर पाहिलं तर सकाळपासून अजित पवार यांना अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या कराड आणि सातारा दौऱ्याला देखील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

ज्याप्रमाणे शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादीत सुद्धा दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे कुठला नेता कुणासोबत जाणार याची देखील जनतेला मोठी उत्सुकता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यादेखील अजित पवार यांना समर्थन देणार की त्या शरद पवार यांच्यासोबत जाणार याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. काही वृत्त माध्यमांनी रूपाली चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतल असल्याच्या सुद्धा बातम्या सूत्रांच्या आधारे प्रसिद्ध केल्या मात्र याबाबत त्यांनी स्वतः अद्याप त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. आपण जर त्यांच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर रूपाली चाकणकर यांनी आज एक ट्विट केला आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर फेसबुकवर सुद्धा अशाच प्रकारे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र सध्या पक्षांमध्ये जे काही प्रकार सुरू आहे याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर कोणतीही वाच्यता केलेलं दिसत नाही. त्यामुळे कोण कुणासोबत जाणार हे येणाऱ्या काळातच आता स्पष्ट होणार आहे..

Updated : 3 July 2023 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top