Home > Political > पंकजा मुंडे मौन सोडणार का?

पंकजा मुंडे मौन सोडणार का?

पंकजा मुंडे मौन सोडणार का?
X

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर, बीडमधील भाजपा कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे समर्थक यांनी थेट भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री होतील या भीतीपोटी आणि इर्षेपोटी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा ताईंना डावलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. धनंजय मुंडे यांना मदत केली असा गंभीर आरोप भाजपतीलच स्थानिक नेत्यांनी केल्याने बीड भाजपामधील पक्ष पातळीवरील खदखद समोर आलीय..एकीकडे राज्यसभेच्या विजयोत्सव साजरा करणाऱ्या भाजप समोर पंकजा मुंडे समर्थकांना शांत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे..

विधानपरिषदमध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठी व देवेंद्र फडणीस यांना सद्बुद्धी मिळावी, याकरिता पंकजा मुंडे समर्थकांनी चक्क हनुमान मंदिराच्या समोर हनुमान चालीसाच पठण करत साकडे घातले होते. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. विधानपरिषदेच्या यादीत पंकजा मुंडेचे नाव न आल्याने राज्यभर पंकजा मुंडे समर्थक यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. मात्र गेली दोन दिवस बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे समर्थक मात्र शांत होते.आता पुन्हा त्यांच्यामधील खदखद बाहेर आलीय. नेत्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून काल कंकालेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक तर हनुमान चालीसा पठण समर्थकांनी केले. अशा प्रकारे विविध मार्गातून कार्यकर्ते आपली नाराजी जाहीर करत आहेत. संताप देखील व्यक्त करत आहेत, यावेळी त्यांनी थेट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना इशारा दिला आहे. काल बीडमध्ये थेट विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांची गाडी आडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली.

पंकजा मुंडे मात्र शांत..

आता पंकजा मुंडे यांची विधिमंडळातील एन्ट्री पुन्हा एकदा टळली आहे. इतका सगळा गोंधळ होत असताना यावर पंकजा मुंडे यांनी मात्र अद्याप एकही वक्तव्य केलेले नाही. पण त्यांचे समर्थक मात्र आता नाराजी व्यक्त करु लागले आहेत. पण पंकजा मुंडे शांत का आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पंकजा मुंडे पक्ष नेतृत्वाविरोधात थेट का बोलत नाही आहेत अशी सुद्धा चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणावर आपले मौन कधी सोडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 13 Jun 2022 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top