Home > Political > अमित आणि मिताली ठाकरे यांच्या हाती महापालिकेची धुरा? युवासेना नेते वरूण सरदेसाई यांची टिका…

अमित आणि मिताली ठाकरे यांच्या हाती महापालिकेची धुरा? युवासेना नेते वरूण सरदेसाई यांची टिका…

अमित आणि मिताली ठाकरे यांच्या हाती महापालिकेची धुरा? युवासेना नेते वरूण सरदेसाई यांची टिका…
X

सध्या राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऍक्टीव मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. लॉकडाउन मध्ये लोकांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी लावून धरत मार्गी लावल्यानंतर मनसे आता निवडणूकीच्या दृष्टीकोनातून महत्वाची पाऊलं उचलताना दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही काळापासून राज्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहे. आज मुंबईच्या वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये मनसेची दुसरी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राज ठाकरे यांच्या सुन आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे या देखील उपस्थित होत्या. यावरून शिवसेना युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मनसेवर टिका केली आहे.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून १२ जानेवारीला राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची पहिली महत्वाची बैठक पार पडली होती. यात राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूकांची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचबरोबर राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांचीही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. त्याच दृष्टीकोनातून पक्ष वाढवण्यासाठी आणि पक्षाची पुढची वाटचाल ठरवण्यासाठी मनसेची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती.


अमित यांना आगामी महापालिका निवडणुकांची जबाबदारी दिल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे या पक्षाच्या बैठकीला आलेल्या पाहायला मिळालं. याआधीही अमित यांच्यासोबत मिताली यांनी अमित यांच्यासोबत मनसेच्या पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र थेट पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला त्या उपस्थित राहिल्याने आगामी महापालिका निवडणूकीत अमित यांच्या खांद्याला खांदा लावून त्या पक्षाचं काम करताना दिसतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मिताली या मनसेच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर शिवसेना युवासेनेचे सचिव आणि उध्दव ठाकरे यांचे भाचे वरुण सरदेसाई यांनी मनसेवर टिका केली आहे. 'शॅडो' पण 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' असं टिव्ही ९ या वृत्तवाहिनीच्या बातमीवर ट्विट करत मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर टिका केली आहे. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वरुण सरदेसाई यांना फैलावर घेतलं आहे.

दरम्यान मनसेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत, पुढच्या महिन्यात ९ फेब्रुवारीपासून राज्यात सभासद नोंदणी सुरू करण्यात येण्यात असल्याबरोबरच गटाध्यक्षांचे नामकरण 'राजदूत' करण्यावर शिक्कामोर्तब झाला असल्याचं बोललं जात आहे. त्याच बरोबर राज यांनी हिंदूत्वाचा मुद्दा हाती घेतल्यामुळे त्यांचा आगामी काळात अयोध्या दौरा होणार असल्याचीही माहिती या बैठकीतून मिळत आहे.

Updated : 29 Jan 2021 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top