Home > ‘ती पार्थची वैयक्तीक भूमिका...’ - सुप्रिया सुळे

‘ती पार्थची वैयक्तीक भूमिका...’ - सुप्रिया सुळे

‘ती पार्थची वैयक्तीक भूमिका...’  - सुप्रिया सुळे
X

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली. पार्थ पवार यांनी अयोध्येत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे, असं आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केलं.

पार्थ पवार यांच्या पत्रावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी हे पत्र पहिल्यांदा बघते, आम्हाला ते पत्र लिहिलेलं नाही. खरंच हे लिहिलं असेल तर ती पार्थ याची वैयक्तिक भूमिका आहे. यावर पक्षाचा लोगो नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पार्थ पवार यांनी “काही सत्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये. या देशाच्या तरुण पिढीने राम जन्मभूमीच्या पवित्र भूमीवरुन सुरु झालेली शाब्दिक लढाई कायदेशीर आणि ऐतिहासिक पाहिली आहे. राम जन्मभूमीच्या या जुन्या प्रकरणावर लोकशाही व्यवस्थेअंतर्गत सामंजस्य आणि शांततामय मार्गाने तोडगा निघाला हेही आपण पाहिलं. यातून आपल्याला एक बोध घेता येईल. या देशाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी काही संस्था उभ्या केल्या. त्या संस्थांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि संयमाने वागलं पाहिजे.”

“विजयात आपण विनम्र असलं पाहिजे. युक्तिवाद कितीही तर्कहीन, सदोष किंवा दुबळे असले तरीही बाबरी मशिदीविषयी एक भावना होती. जे हरले त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. त्यांचे तर्क आणि दावे पूर्णपणे पराभूत झाले आहेतच. आता आपण थोडे पुढे गेले पाहिजे. आपला पराभव झाला आहे असं ज्यांना वाटत आहे त्यांना या विजयाच्या क्षणी आपण बरोबर घेतलं पाहिजे.” असं आपल्या पत्रात म्हटलं आहे.

https://www.facebook.com/ParthPawarSpeaks/posts/2026625327470879

Updated : 11 Aug 2020 3:13 PM GMT
Next Story
Share it
Top