Home > Political > बाई तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा पण...... नेटकऱ्यांची रूपाली चाकणकर यांच्यावर टीका

बाई तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा पण...... नेटकऱ्यांची रूपाली चाकणकर यांच्यावर टीका

बाई तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा पण...... नेटकऱ्यांची रूपाली चाकणकर यांच्यावर टीका
X

संपुर्ण राज्यभरात मंगळवारी १४ जुन ला वटपौर्णिमा साजरी केली जातेय. महिला नटून थटून वडाच्या झाडाला पुजण्यासाठी एकत्र येतात. त्याला दोरी गुंडाळतात आणि साज जन्म हाच नवरा मिळू दे अशी इच्छा व्यक्त करतात. पण ज्या महिलांचे नवरे त्यांच्यावर अत्याचार करतात, ज्या महिलांचे पती त्यांचा मानसिक छळ करतात, ज्या महिलांना त्यांचे अत्याचारी पती पुन्हा त्यांच्या आयुष्यात नको असतील त्यांनी हा सण का साजरा करावा? बरं मग फक्त नटण्यासाठी, सजण्यासाठी महिला हा सण साजरा करत असतील तर मग विधवा महिलांनी तो का साजरा करून स्वतःचं दिर्घायुष्य का मागू नये? असा कोणता सण आहे जो फक्त गळ्यात मंगळसुत्र असल्याशिवाय साजरा करता येत नाही. मग त्याला महिलांचा सण तरी कसा म्हणावा? आता प्रत्येक धर्माच्या रुढी प्रथा परंपरा या विविध असतात. काळागणिक त्या बऱ्याचदा जाचक बनत जातात.

पण अशा जाचक प्रथांविरोधात जर प्रबोधन केलं गेलं नाही तर कधी करणार? अशीच काहीशी भुमिका राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील घेतली. सोमवारी राज्य महिला आयोगाच्या कार्यक्रमात भाषण करताना "आपल्या महिलांना सत्यवानाची सावित्री लवकर समजली. दुर्देव हे की फारच लवकर समजली... पण अंगावर शेणा मातीचे गोळे खाणारी जोतिबाची सावित्री मात्र अजुनही समजली नाही", असं म्हणाल्या. शिवाय माझा आणि वटपौर्णिमेचा काहीही संबंध नाही कारण मी कधीच वडाला फेऱ्या मारायला गेले नाही. मी माझ्या नवऱ्यालाच सांगितलंय. तुम्हाला जर मी पत्नी म्हणुन सात जन्म हवी असेन तर तुम्ही वडाला फेऱ्या मारा. पण मी काही फेऱ्या मारायला जाणार नाही. त्यांच्या या भाषणातील एक वाक्य मॅक्स वुमनने समाजमाध्यमांवर अपलोड केलं. त्यांची बातमी केली.

नेहमीप्रमाणे त्यांच्या या कोटवर समस्त नवरे वर्गाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर अश्र्लाघ्य भाषेत टीका करायला सुरूवात केली. त्यांच्यावर धार्मिक द्वेषाच्या टीकेपासून वैयक्तिक टीका करण्यात आली आहे. त्यांच्या या बातमीवर गजानन शेंडगे या वापरकर्त्याने, "हा सण सत्यवानाच्या सावित्रीसाठी असतो. आधारवडच्या चेटकिणीसाठी नाही", असं म्हणत टीका केली आहे. आता आधारवड म्हणजे कोणत्या मोठ्या नेत्याला उद्देशुन हा शब्द वापरला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. याशिवाय त्यांनी कुप्रथा असलेल्या तीन तलाक वर सडेतोड बोलून दाखव असं म्हणत सवाल देखील विचारला आहे.

तर किशोरभाई म्हात्रे या वापरकर्त्याने "सौ चुहे खा के बिल्ली हज को चली....ज्या बाया दहा ठिकाणी जाणाऱ्या त्यांना वडाची पुजा काय समजणार?", असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

गोविंद केंद्रे या वापरकर्त्याने "बाई तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा पण तुमच्या सांगण्यावरून दिसत नाही" असं म्हणत टीका केली आहे.

तर दौलत जाधव पाटील या वापरकर्त्याने , "मुळात वटपौर्णिमा हा सण पतिव्रता स्त्रियांसाठी आहे इतरांसाठी नाही" असं म्हणत टीका केली आहे.

एकंदरीत रूपाली चाकणकर यांच्या वक्तव्याचा या पुरूषमंडळींचा अहंकार इतका दुखावला गेला की त्यांनी थेट रूपाली चाकणकर यांच्या चारीत्र्यावर टीका केली. आणखी किती काळ आपण महिलांना आपल्या गुलाम म्हणूनच वागवणार आहोत. इथे काही महिलांना याच जन्मात इतका वाईट नवरा मिळतो की त्यांना तो आताच नकोसा होतो. पण तरीही त्यांनी ती पुजा तो नवरा सात जन्म मिळावा म्हणुन का करावी हा एक सवालच आहे. रूपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात या परिस्थितीचा देखील उल्लेख केला आहे. काही महिला फक्त लोक काय म्हणतील म्हणूनन वटपौर्णिमेची पुजा करतात असंही म्हटलं आहे. जे की सत्य आहे. असं सगळं असलं तरीही रूपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत हे विसरून चालणार नाही आणि त्यांनी ठरवलं तर त्या या प्रतिक्रीयांवर आक्षेप घेऊन कायदेशीर कारवाई देखील करू शकतात. आपण कुठे आणि काय प्रतिक्रीया देतो याचं भान राखण्याची आणि या पुरूषप्रधानम विचारसरणीत बदल करण्याची नितांत गरज आहे असंच म्हणावसं वाटतं.

Updated : 14 Jun 2022 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top