Home > Political > "आज आपली खूप आठवण येतेय.." मंत्री ठाकूर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र..

"आज आपली खूप आठवण येतेय.." मंत्री ठाकूर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र..

बाबासाहेब आज आपली खूप आठवण येतेय. आज आपण हवे होतात.आपल्या शिकवणुकीचा, विचारांचा, ज्ञानाचा आज आम्हाला खऱ्याअर्थाने उपयोग होतो आहे. या लोकशाही व्यवस्थेला सत्तर वर्षांपेक्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही आपला देश अखंड, एकसंध, सार्वभौम राहिला, तोसुद्धा बाबासाहेब आपल्या दूरदृष्टीमुळेच! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी मंत्री यशोमती ठाकूर यांचे बाबासाहेबांना पत्र..

आज आपली खूप आठवण येतेय.. मंत्री ठाकूर यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र..
X

आदरणीय बाबासाहेब,

पत्रास कारण की....

बाबासाहेब आज आपली खूप आठवण येतेय. बाबासाहेब आज आपण हवे होता, आपली ही उणीव पदोपदी जाणवतेय. आपल्या शिकवणुकीचा, विचारांचा, ज्ञानाचा आज आम्हाला खऱ्याअर्थाने उपयोग होतो आहे.

आपण आम्हाला शिका, संघटित व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा हा मुलमंत्र दिला. हाच मुलमंत्र घेऊन आपण सांगितलेल्या मार्गाने मार्गाक्रमण करीत आहोत. आपण जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था भारताला दिली. या लोकशाही व्यवस्थेला सत्तर वर्षांपेक्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही आपला देश अखंड, एकसंध, सार्वभौम राहिला, तोसुद्धा बाबासाहेब आपल्या दूरदृष्टीमुळेच!

दुसऱ्या महायुद्धानंतर देशाची अर्थव्यवस्था पार गाळात रुतली होती, पण ती रुळावर आणण्यात असो वा स्वातंत्र्योत्तर काळात सिंचन व वीजप्रकल्पांसंदर्भातही मोठी जबाबदारी, दामोदर नदी खोरे, सोने नदी खोरे प्रकल्प, हिराकुंड धरण प्रकल्प, रिझर्व्ह बँक, एलआयसीसारख्या विविध संस्थांच्या स्थापनेतही आपण मोलाचं योगदान दिलंत.

आपण आपलं अवघं जीवन मानव कल्याणासाठी वेचलंत. तळागळातील मूलं शिकली पाहिजे, देशात स्त्रियांना समानतेची, न्यायची वागणूक मिळाली पाहिजे, ही आपली तळमळ होती. आपण म्हणाला होता की, शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. याची पदोपदी आम्हाला जाणीव होते आहे.

समाजातून विषमता नष्ट व्हावी, समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी; प्रत्येकाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा म्हणून आपण लढा दिलात. माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे, हे आपण निक्षून सांगितलंत.

आपण म्हणाला होता की, मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या झालेल्या प्रगतीवरून करतो. या आपल्या विचारांना अनुसरून आणि त्याच विचारांचा वसा घेऊन आम्ही काम करीत आहोत. आज भारतीय स्त्रीने सर्वोच्च स्थानी गगनभरारी घेतली आहे, हे केवळ बाबासाहेब आपल्यामुळे शक्य झाले.

आपल्या देशापुढे धर्मांधता, जातीयता, आपण दिलेल्या घटनेला धोक्यात आणणारे सत्ताधीश अशी विविध आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यांच्याशी दोन हात करण्याची शक्ति आपण दिलेल्या राज्य घटनेमुळे आम्हाला मिळाली आहे. याच राज्य घटनेच्या आधारे आम्ही हा लढा लढू आणि जिंकू असा विश्वास आम्हाला आहे.

पण बाबासाहेब राहून राहून वाटतं की, आता केवळ भाषणापुरता आपल्या नावाचा आणि संविधानाचा वापर करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना समतेची मुल्ये शिकवण्यासाठी, जाती-जातीत पसरवल्या जाणाऱ्या विद्वेषावर चवदार तळ्यातील अमृतपाणी शिंपडण्यासाठी आज तुम्ही आमच्यात असायला हवे होता. हो पण तसेही आपण आहातच की आमच्यात... आपण दिलेल्या निडर विचारातून आणि पोलादी राज्यघटनेच्या माध्यमातून...

बाबासाहेब आपल्या याच विचारांवर चालण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहु....

आपल्या विचारांची पाईक

यशोमती ठाकूर

Updated : 14 April 2022 5:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top