“ही भाजपची खासगी मालमत्ता नाही”
खासदारांना रस्त्यावर फरफटल्यावर ममता बॅनर्जींचा संताप
X
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर लोकशाही मार्गाने निषेध करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांशी झालेल्या वागणुकीचा त्यांनी तीव्र निषेध केला.
ममता बॅनर्जी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर (एक्स) हँडलवरून प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आमच्या लोकनिर्वाचित खासदारांना रस्त्यावर ओढत नेणे, फरफटत नेणे हे कायदा-सुव्यवस्था नाही, तर सत्तेचा उन्माद आहे. ही लोकशाही आहे, भाजपची खासगी मालमत्ता नाही.”
त्या पुढे म्हणाल्या की, लोकशाही केवळ सत्ताधाऱ्यांच्या सोयीसाठी चालत नाही. जेव्हा भाजपचे नेते आंदोलन करतात, तेव्हा त्यांच्यासाठी लाल गालिचे अंथरले जातात, विशेष सवलती दिल्या जातात. मात्र विरोधी पक्षाचे खासदार आवाज उठवतात, तेव्हा त्यांना अटक, अपमान आणि दडपशाहीला सामोरे जावे लागते.
ही दुहेरी भूमिका भाजपची लोकशाहीविषयक मानसिकता उघड करते, असे सांगत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “भाजपला लोकशाही म्हणजे आज्ञाधारकपणा हवा आहे, विरोध नाही.”
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना म्हटले, “आदर हा परस्पर असतो. तुम्ही आमचा सन्मान कराल, तर आम्ही तुमचा सन्मान करू. तुम्ही आम्हाला रस्त्यावर ओढाल, तर आम्ही तुम्हाला संविधानातील सहिष्णुता, मतभेद आणि लोकशाही मूल्यांची आठवण करून देऊ.”
ही आपलीच भारतभूमी असून, नागरिक म्हणून आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, असे सांगत ममता बॅनर्जी यांनी ठामपणे म्हटले की, कोणतेही सरकार, कोणताही पक्ष किंवा कोणताही गृहमंत्री लोकशाहीत कोण सन्मानास पात्र आहे हे ठरवू शकत नाही.






