Home > Political > मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले महाविकास आघाडीला पाठिंबा देणार...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले महाविकास आघाडीला पाठिंबा देणार...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले महाविकास आघाडीला पाठिंबा देणार...
X

एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यपालांकडे ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. राज्यपालांनीही तातडीने बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि अपक्ष असे मिळून जवळपास ५० आमदार सरकारविरोधात मतदान करतील अशी शक्यता आहे. या बहुमत चाचणीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना वगळता इतर छोट्या पक्षांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे.

यापार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले हे महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याची घोषणा पक्षातर्पे कऱण्यात आली आहे.

"भ्रष्ट मार्गाने जमा केलेला प्रचंड पैसा आणि केंद्रीय तपासयंत्रणा यांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आता उघड झाले आहेत", असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. "तातडीने ३० जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा महाविकास आघाडीला आदेश देत महाराष्ट्राचे राज्यपाल या कारस्थानात सहभागी झाल्याचे दिसून येते. विधान परिषदेच्या १२ आमदारांची आणि नियमित सभापतींची नियुक्ती करण्यात दीर्घकाळ आडवे येणाऱ्या राज्यपालांचा हा आदेश संविधानाची हत्या करणारा आहे", अशीही टीका त्यांनी केली आहे.

संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संघराज्य प्रणालीचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्राचा सन्मान राखण्यासाठी केंद्रातील भाजपच्या फॅसिस्ट व धर्मांध एकाधिकारशाहीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच कसून विरोध करत आला आहे आणि यापुढेही करत राहील, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेला सामोरे जाईल तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहून तिच्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान करतील, अशी माहिती पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिली आहे.

Updated : 29 Jun 2022 9:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top