Home > Political > 'शिंदें'च्या सोलापूरात बंद ला अत्यल्प प्रतिसाद

'शिंदें'च्या सोलापूरात बंद ला अत्यल्प प्रतिसाद

शिंदेंच्या सोलापूरात बंद ला अत्यल्प प्रतिसाद
X

लखीमपूर हिंसेच्या विरोधात आज राज्यभरात महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही सोलापूर जिल्ह्यात बंदला अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला. विशेष म्हणजे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे यांची जिल्ह्यात चांगली पकड असतांना शंभर टक्के बंद यशस्वी होऊ शकला नाही.

सोलापुरातील बाजार समितीमध्ये सकाळी नऊ ते बारा दरम्यान मार्केट बंद ठेवावी असे आवाहन करण्यात आले होते. मात्र बाजार समितीमध्ये केवळ व्यवहार बंद ठेवले असून गर्दी मात्र तशीच होती. बाजार समितीमध्ये उत्स्फूर्त असा बंद दिसून आला नाही. सोलापुरातल्या बाजार समितीमध्ये या बंदला अतिशय अल्पसा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर स्थानिक नेत्यांनी एपीएमसी मार्केट मध्ये उतरून आवाहन केल्यानंतर व्यापारी शेतकरी अल्प प्रमाणात बंदला पाठिंबा देताना पाहायला मिळाले. त्याचबरोबर बाजारपेठेत काही दुकाने बंद होती मात्र सकाळी इतर व्यवहार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लखीमपूर येथे भाजप नेत्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडल्याचा आरोप होत असून, यात आतापर्यंत एकूण 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज या घटनेच्या विरोधात राज्यात सत्ताधारी पक्षांनी बंदची हाक दिली होती. त्यानंतर सकाळपासून बंदला सुरवात झाली आहे.

मात्र असे असतांना काँग्रेसचा बालेकिल्ला आणि शिंदे कुटुंबाची पकड असलेल्या सोलापूर जिल्ह्यात या बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी सुरळीतपणे आपली दुकाने चालू ठेवली होती. त्यामुळे सोलापुरात बंदचा प्रभाव पाहायला मिळाला नाही.

Updated : 11 Oct 2021 7:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top