Home > Political > "धनंजय मुंडेंनी १०० कोटी खर्चून.." करुणा मुंडेंचा खळबळजनक खुलासा

"धनंजय मुंडेंनी १०० कोटी खर्चून.." करुणा मुंडेंचा खळबळजनक खुलासा

कोल्हापूर पोट निवडणुकीतील पराभवानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

धनंजय मुंडेंनी १०० कोटी खर्चून.. करुणा मुंडेंचा खळबळजनक खुलासा
X

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. यात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला. या निवडणुकीत जयश्री जाधव यांच्यासह धनंजय मुंडे यांच्या पत्नी म्हणवणाऱ्या करूणा मुंडे यांचा देखील समावेश होता. परंतू फक्त १३३ मतं मिळवत त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला. यानंतर त्यांनी फेसबुकवर लाईव्ह येत कोल्हापुरकरांचे आभार मानले आहेत. शिवाय त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका देखील केली आहे. नेमकं काय म्हणाल्या करूणा मुंडे चला पाहुयात...

कोल्हापूरकरांचे मानले आभार

त्यांनी सुरूवातीला १३३ मतं त्यांच्या पारड्यात टाकल्याने कोल्हापूरकरांचे आभार मानले. यानंतर बोलताना त्या, "करूणा धनंजय मुंडे या नावानं निवडणुकीचा अर्ज भरला गेला हाच माझा खरा विजय", असं म्हणाल्या आहेत. याशिवाय त्या जरी निवडणुक हरल्या असल्या तरी जिंकणाऱ्यांपेक्षा सोशल मिडीयावर त्यांचीच चर्चा जास्त असं त्या सांगतात. मी निवडणुक हरले हे एका अर्थी बरंच झालं कारण २०२४ ला मला नवरा विरूध्द बायको किंवा सवत विरूध्द सवत अशी निवडणूक लढवायची आहे. माझं लक्ष्य हे २०२४ ची परळी विधानसभा आहे. या निवडणुकीतून मला एक शिकवण मिळाली आहे की निवडणुक लढवण्यासाठी लोकांची कामं करावी लागतात. आणि मी लवकरच परळीमध्ये ललोकांची काम करण्यासाठी जाणार आहे." असं त्या सांगतात.

धनंजय मुंडे मंत्री माझ्यामुळे झाले...

हे सांगताना त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील काही गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणतात, " धनंजय मुंडे हे दोनवेळेस पंकजा ताईंविरूध्द हरले होते. त्यानंतर त्यांच्या पाठीशी फक्त मीच उभी होते. इतकंच नाही तर २०१९ च्या निवडणुकीवेळी धनंजय मुंडेंनी १०० कोटी खर्चून निवडणूक लढवली आणि जिंकली त्यावेळी त्यांना निवडणुकीसाठी मी संपत्ती विकून करोडो रूपये दिले. मी माझा पत्नीधर्म निभावला. माझ्यामुळे ते राज्याचे मंत्री झाले पण आता जेव्हा मला गरज होती तेव्हा मला त्यांनी काडीचीही मदत केली नाही. मी निवडणुक लढवण्यासाठी त्यांच्याकडे ५ लाख रूपयांची मदत मागितली होती पण त्यांनी मला ती मदत केली नाही. इतकंच काय तर मला ज्या गाडीतून प्रचार करायचा होता त्या गाडीचे पेपर्स त्यांच्या नावावर आहेत. ते पेपर्स साधे त्यांनी मला देऊ केले नाहीत. मला निवडणूकीत भाड्याच्या गाडीने प्रवास करावा लागला.", असं त्या म्हणाल्या आहेत.

धनंजय मुंडेंचा भांडाफोड करणार

त्यानंतर त्यांना गप्प बसणार नसल्याचं सागितलं आहे. त्या म्हणतात, "मी रखेल असते तर त्यांच्या इतर रखेल प्रमाणे गप्प बसले असते. मी हरामाचं खाल्लेलं नाही, मी कुणाची दलाली केलेली नाही त्यामुळे त्यामुळे ट्रोलर्सनी मला ट्रोल करण बंद करावं. धनंजय मुंडेनी मला जिवंतपणीच मारलंय त्यामुळे मी कुणालाही घाबरत नाही. त्यामुळे धनंजय मुंडेना मंत्री पदावरून हटवण्यासाठी आझाद मैदानात मी आमरण उपोषणाला बसणार आहे. धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप लागले पण कुणीही त्याच्यावर कारवाई केली नाही. मी लवकरच आझाद मैदानात माध्यमांसमोर धनंजय मुंडेंचा भांडाफोड करणार आहे. ज्या ज्या महिलांचं मंत्र्यांकडून, नेत्यांकडून शारिरीक शोषण झालंय त्यांनी माझ्याकडे यावं आपण मिळून या सिस्टीमविरूध्द लढा देऊ. कोल्हापूरकरांची मी ऋणी आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी मला खूप प्रेम दिलंय. यापुढे मी फक्त बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून चालणार आहे आणि अन्यायाच्या विरूध्द आवाज उठवणार आहे."

आम्ही यासंदर्भात प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही, परंतू त्यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना नुकतंच रूग्णालयातून घरी आणण्यात आले आहे व ते कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत असे सांगितले.

Updated : 17 April 2022 10:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top