Home > Political > भारताने माफी मागू नये, काँग्रेसने घेतली ठोस भूमिका

भारताने माफी मागू नये, काँग्रेसने घेतली ठोस भूमिका

भारताने माफी मागू नये, काँग्रेसने घेतली ठोस भूमिका
X

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठे वादंग निर्माण झाले आहे. तर वादग्रस्त वक्तव्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवरून भारताने माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र या भुमिकेवर काँग्रेसने सवाल उपस्थित केला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चेत बोलताना मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. याबरोबरच अरब देशांनीही नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपने नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांचे सहा वर्षांसाठी निलंबन केले. मात्र त्यानंतरही कतार देशाने या प्रकरणी भारताने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यावर काँग्रेसने सवाल उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले, भारताने माफी मागावी अशी चुक भारताने केली नाही. तर ही चुक भाजपने केली आहे. त्यामुळे त्याचा फटका देशाने का भोगावा? असा सवाल उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, भारताला कतार आणि कुवैत सारख्या देशांकडून राजधर्माची आठवण करून देणे ही देशासाठी अत्यंत निंदनिय बाब आहे. एवढंच नाही तर एक पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाने संपुर्ण देशाला खाली मान घालायला लावली आणि यावर देशाने माफी मागावी, हे आम्ही स्वीकार करू शकत नाही, अशी भुमिका काँग्रेसने घेतली आहे.

भारत हा देश संविधानिक मुल्यांचा आदर करणारा देश आहे. मात्र जर भाजप संविधानिक मुल्यांचा आदर करत नसेल तर त्याचा परिणाम भाजपने भोगावा. भारताने माफी मागू नये कारण चूक ही भारताची नाही, असे मत व्यक्त केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेसने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी जर आपल्या पक्षाच्या विष ओकणाऱ्यांना आवरलं असतं, ज्या अँकरकडून अशा प्रकारे विष ओकलं जातं त्यांना आवरलं असतं तर आज देशाची मान शरमेने खाली गेले नसते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी, असे मत काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी व्यक्त केले.

नुपुर शर्मा यांच्या निलंबनाचे स्वागत मात्र माफीची मागणी

भाजपने नुपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल मुरैखी यांनी परराष्ट्र खात्याचे दीपक मित्तल यांच्याकडे निवेदन देत या वक्तव्याचा भारत सरकारने निषेध करावा आणि अशा वक्तव्याबद्दल भारताने माफी मागावी, असे मत व्यक्त केले आहे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे अल्पसंख्यांकाविरोधातील हिंसा वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. तर नवीन कुमार जिंदाल आणि नुपुर शर्मा यांच्या निलंबनाचे कतारने स्वागत केले आहे.

कतारने निवेदनात काय म्हटले आहे?

कतारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरातील २ अब्ज मुस्लि हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांवर चालतात. त्यामुळे भारतातील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अशा प्रकारे केलेले वक्तव्य मुस्लिम समुदायाचा अपमान करणारे आहे. कतार सर्व धर्मांप्रती आणि देशांतील नागरिकांप्रती समान मुल्यांचा आणि सहिष्णूतेचा अवलंब करते. त्यामुळे या वक्तव्याबद्दल भारताने निषेध नोंदवावा आणि माफी मागावी.

भारतीय राजदुतांनी दिले उत्तर

नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे परराष्ट्र खात्याचे दीपक मित्तल यांनी अधिकृतरित्या भारताची भुमिका स्पष्ट केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, कोणत्याही व्यक्तीच्या किंवा पक्षाच्या व्यक्तीकडून वैयक्तिकरित्या करण्यात आलेल्या वक्तव्याशी भारत सरकारचा संबंध नाही. भारत सरकार हे संविधानावर चालते. तसेच एकतेवर विश्वास ठेवते. त्यामुळे अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी भुमिका मांडली.

नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यावरून इतर देशांनीही व्यक्त केली नाराजी

नुपुर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून कतारपाठोपाठ ओमानचे ग्रँड मुफ्ती यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून इराण आणि कुवैतनेही नाराजी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतावर दबाव वाढत आहे. तर भारताने माफी मागावी अशी मागणी अरब देशांतून केली जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला नाचक्कीला सामोरे जावे लागत आहे.

Updated : 6 Jun 2022 4:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top