Home > Political > धनंजय महाडिक यांना काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दाखवून दिलं 'महिला काय करू शकतात..'

धनंजय महाडिक यांना काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दाखवून दिलं 'महिला काय करू शकतात..'

पती प्लंबिंग करत असेल तर तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे का? असं म्हणणाऱ्या धनंजय महाडिक यांना महिला काय करू शकतात हे दाखवून देणारी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल..

धनंजय महाडिक यांना काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने दाखवून दिलं महिला काय करू शकतात..
X

कोल्हापूर उत्तरचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या सगळ्यातच काल भाजप नेते धनंजय महाडिक यांनी एक विधान केलं आणि या विधानामुळे खरंतर ते सध्या चर्चेत आहेत. त्यांनी महिलांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित करणारे विधान केल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर भाजपने या ठिकाणी सत्यजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे. काल सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील प्रचार सभेत बोलताना धनंजय महाडिक यांनी "काँग्रेसचे लोक येतील आणि आम्ही महिला उमेदवार दिला आहे असे सांगतील. पण मला सांगा तुमच्या कुटुंबातील कुणाचा पती गेला आणि तो आधी प्लंबिंग करत असेल तर तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे का? जर तुमची पत्नी इलेक्ट्रिशन असेल तर तुम्हाला ते काम जमणार आहे का? ज्याचे काम त्यानेच करायचे असते. त्यांचे पती आमदार होते म्हणून लगेच त्यांच्या पत्नीला पुढे आणले" आता धनंजय महाडिक यांनी केलेल्या या विधानाचा सर्व स्तरातून विरोध होत आहे.

या सगळ्या विरोधात काल समाजमाध्यमांवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. पतीच्या निधनानंतर केशकर्तनाचा व्यवसाय करणाऱ्या शांताबाई यांचा फोटो ऋषिकेश पाटील - INC या काँग्रेसच्या कार्यकर्त्याने ट्विटरवर शेअर केले आहे. शाहूनगरीत महिला कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत. महिला काहीही करू शकतात हेच शांताबाईंनी सिद्ध करून दाखवलं आहे. शांताबाई करत असलेले काम म्हणजे महिलांविषयीच्या वाईट मानसिकतेला एक भली मोठी चपराक आल्याचं म्हणत त्यांनी महाडिक यांना चांगलच उत्तर दिलं आहे.

ऋषिकेश पाटील यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होतं आहे. ही पोस्ट नक्की काय आहे पाहुयात..

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचे वातावरण तापलं आहे, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, यात काल एक वादात्मक मुद्दा चर्चेला निघाला आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला आमदारकी जमणार नाही अशा अर्थाने भाजप नेत्यांनी प्रचार सभेत खिल्ली उडवायला चालू केली. "पतीचे प्लंम्बरचे काम पत्नीला जमेल का...? पतीचे इलेक्ट्रिशियनचे काम पत्नीला जमेल का..?" असा प्रश्न माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी प्रचार सभेत उपस्थित केला. मुळात कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे, इथल्या मातीत पुरोगामी विचार खोलवर रुजलेला आहे, ताराराणी यांच्या पराक्रमाचा इतिहास इथल्या मनामनात वसला आहे. या फोटोत असणाऱ्या शांताबाई यादव पतीच्या निधनानंतर केशकर्तनाचा व्यवसाय करत आल्या आहेत, मोठ्या जिद्दीने आणि हिमतीने त्यांनी पुरुषांची दाढी व केस कटिंग करून महिला काहीही करू शकतात हे सिद्ध करून दाखवले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील शांताबाई यादव यांची ही कहाणी म्हणजे महिलांविषयीच्या वाईट मानसिकतेला एक भली मोठी चपराक आहे.

ऋषिकेश या एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेली ही पोस्ट साध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आहे. परंतू बाई आहे ती काय करू शकते? पुरुषांना जे जमतं ते महिलांना थोडीच जमतं? बाईने घरातीलच कामे करावी, पोरं-बाळं सांभाळावी आशा मानसिकतेचे हे काही पुरुषप्रधान राजकीय पुढारी अनेक ठिकाणी महिला सक्षमीकरणावर मोठी-मोठी भाषणे देतात. आणि परत हेच पुढारी पुरुषांची कामे महिलांना काय जमणार हे अगदी सहजतेने बोलतात. आता धनंजय महाडिक यांनी हे वक्तव्य केलं म्हणून ही सर्व चर्चा. पण तसं पाहिलं तर इतर पक्ष देखील महिलांना किती संधी देतात? इतर पक्ष्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये किती महिला सहभागी असतात? अगदी ग्रामपंचायती पासून , संसदेत, विधिमंडळात महिलांची संख्या किती? हे असे प्रश्न तर आहेतच..

Updated : 1 April 2022 5:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top