Home > Political > "दादा त्या अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत" - चित्रा वाघ

"दादा त्या अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत" - चित्रा वाघ

“दादा त्या अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. मी राष्ट्रवादीत असल्यापासून ही मागणी करतेय” चित्रा वाघ यांचे अजित पवारांना उत्तर

दादा त्या अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत - चित्रा वाघ
X

धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणावरून अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून भाजप मध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांचं नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी अजित पवार यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. भाजपने मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यासाठी आंदोलन केले होते. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन केले होते. पीडितेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहील. असं म्हणत चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली होती.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचं वादळ शमल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या चित्रा वाघ यांचं नाव न घेता टीका केली.

चित्रा वाघ यांनी अजित पवार यांना उत्तर दिलं आहे.

अजित पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून हे प्रकरण धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्यापुरतंच मर्यादित असेल. पण मला उपमुख्यमंत्री साहेबांना हे सांगायचंय की, राज्यामध्ये अशा कित्येक पीडित आहेत. ज्यांच्यासोबत खऱ्या पद्धतीचे गुन्हे झालेले आहेत. ज्यांच्यावरती खरे बलात्कार झालेले आहेत. त्या आजही प्रतिक्षेत आहेत.

आपल्या पोलिस दलांमध्ये अशा घटनांबाबत जागृकता यायला पाहिजे. ही मागणी राष्ट्रवादीत असल्यापासून आम्ही करत आहोत. ज्या महिला पोलिस स्टेशनला जातात. त्यांच्या नावानं एफआय़आर दाखल होत नाही. आता तर एफआयआर दाखल होऊन सुद्धा आरोपी मोकाट फिरतात. आणि या केसमुळे खरोखर ज्या महिलांवर अत्याचार झाला आहे. त्या प्रकरणातील महिलांकडे पाहण्याचा समाजाचा, पोलिसांचा दृष्टीकोन बदलू नये. यासाठी उपमुख्यमंत्री साहेब आम्ही ही मागणी केली होती.

काय म्हणाले होते अजित पवार?..

परंतू अलिकडे झटपट आपलं नाव व्हावं. आम्ही पक्षासाठी काहीतरी करून दाखवतोय. आणि जी बाडगी असतात ना... जी या पक्षातून त्या पक्षात जातात. ते तर पहिले त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आम्ही किती या पक्षात येऊन पक्षाशी समरस झालो आहोत. पक्षामध्ये एकरूप झालो आहोत. हे दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. वास्तविक कोणाच्या काय काय गोष्टी आहेत. सांगायच्या ठरल्या तर वेळ अपुरा पडेल. असं म्हणत अजित पवार यांनी चित्रा वाघ यांना इशारा देखील दिला होता.

Updated : 23 Jan 2021 12:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top