Top
Home > Max Woman Blog > निळा झेंडा मिरवणाऱ्यांनो, कुऱ्हाडीचा दांडा बनू नका

निळा झेंडा मिरवणाऱ्यांनो, कुऱ्हाडीचा दांडा बनू नका

निळा झेंडा मिरवणाऱ्यांनो, कुऱ्हाडीचा दांडा बनू नका
X

विविध पक्षांच्या आसऱ्याला निळा झेंडे घेऊन गेलेले नेते मला कधीच आंबेडकरी चळवळ वाटली नाही. असे निळे झेंडे वाले पक्ष सेटींगबाज, एजंट सारखं काम करतात. खरी आंबेडकरी चळवळ तुम्हाला शोषित-वचिंतांच्या मनामनामध्ये जीवंत आहे, ती कधीच सेटींग करत नाही, ती कधीच सत्तेच्या मागे धावत नाही, ती कधीच सत्तेसाठी लाचार नव्हती आणि सत्ता मिळाल्यावर माजली नाही. ही चळवळ आजही एक मजबूत भावनिक-वैचारिक-राजकीय चळवळ आहे, अनेक आक्रमणं झेलत ही चळवळ आजही उभी आहे. या चळवळीचं तुकडे पडलेल्या राजकीय निळ्या झेंड्यावरून आकलन करण्याची गल्लत अनेकजण करतात.

सत्ताधारी जमात बनण्याची लालसा असणं गैर नाही, त्यासाठी काहीही करायची तयारी असणंही गैर नाही, मात्र सतत तडजोड करत राहण्याची सवय, आणि सत्तेसाठी लाचारी पत्करण्याची नेत्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा यामुळे एकूणच आंबेडकरी विचारांच्या पाइक असलेल्यांना नेहमीच टीकेचं धनी व्हावं लागतं.

आंबेडकर जयंतीच्या निमित्ता आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करायला हवं. आंबेडकरी जनतेने आता या पक्षांना चिंतन करायला भाग पाडलं पाहिजे. आंबेडकरी जनता सूज्ञ आहे, राजकीय परिस्थितीचं भान तिला आहे. आता याच जनतेने राजकीय चळवळीच्या शुद्धीकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

आपली राजकीय ताकत, जिंकण्याची गणिते, इतर उमेदवारांना पाडण्याची ताकत आंबेडकरी जनतेला आहे. याचाच वोटबँक म्हणून वापर करून अनेकजण स्वतःची सोय करून घेत असतात. राजकीय सेटींग करत असतात. इतकी वर्षे युती-आघाड्यांचं राजकारण केल्यानंतरही रिपब्लिकन पक्षांना सतत जागांसाठी दुसऱ्या पक्षांकडे याचना करावी लागते. ही परिस्थिती बदलावी लागेल. काही राजकीय प्रयोग करावे लागतील. वंचित बहुजन आघाडीने तो करण्याचा प्रयत्न केला आहे, आघाडीच्या सुरूवातीच्या काळातच मी लिहिलं होतं की, या आघाडीमुळे भाजपाचा फायदा-काँग्रेसचं नुकसान अशी विश्लेषणं केली जातील, पण कधी तरी वंचितांच्या स्वतंत्र लढाया उभ्या राहिल्या पाहिजेत.

आंबेडकरी चळवळीने आता प्रामाणिकपणे लढलं पाहिजे. विचारीपणे वागलं पाहिजे, तात्पुरत्या तडजोडी बंद केल्या पाहिजेत. मराठी मध्ये म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आज तशी स्थिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरच घाला घालायचं काम सुरू आहे. अशा परिस्थितीत कुऱ्हाडीचा दांडा बनायचं काम करणं निळा झेंडा मिरवणाऱ्या राजकीय पक्षांनी टाळलं पाहिजे.

-रवींद्र आंबेकर

Updated : 14 April 2020 2:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top