Home > Political > "नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका" पूनम महाजन संजय राऊतांवर भडकल्या...

"नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका" पूनम महाजन संजय राऊतांवर भडकल्या...

नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका पूनम महाजन संजय राऊतांवर भडकल्या...
X

शिवसेना आणि भाजपमधील शाब्दिक संघर्ष आता अगदीच टोकाला गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक संघर्ष ताजा असताना आता प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनीही शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक कार्टून ट्विट करत भाजपला चिमटा काढला होता. यामध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे एका खुर्चीवर पाय ठेवून बसले आहेत, आणि एक छोटा स्टूल त्याजवळ आहे, असे त्या कार्टूनमध्ये दाखवण्यात आले आहे, आणि दिवंगत प्रमोद महाजन हे तिथे उभे असून बाळासाहेब ठाकरे त्यांना बसायला सांगत असल्याचे यामध्ये दाखवले होते. तसेच "कोण कुणामुळे वाढले, उघडा डोळे बघा नीट" असा टोला त्यामध्ये लगावण्यात आला होता.

पण आता संजय राऊत यांच्या या ट्विटला प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी उत्तर दिले आहे. पूनम महाजन यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये हा फोटो वापर संजय राऊत यांना अत्यंत कडक शब्दात उत्तर दिले आहे, "स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका." असे म्हटले होते.

दरम्यान संजय राऊत यांनी ते ट्विट डिलीट केले आहे. याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा आपण ते कार्टून काढले नसून अनेक वर्षांपूर्वी आर.के.लक्ष्मण यांनी काढले होते. पण सोमवारी भाजप नेत्यांनी शिवसेनेबाबत जी काही दावे केले, त्यांना सत्य काय हे कळण्यासाठी आपण कार्टून शेअर केलं, असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. आपण काही प्रमोद महाजन यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. पण गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, मनोहर पर्रीकर यांची पुढील पिढी आता कुठे आहे, त्याचे भाजपाशी काही नाते आहे का, ते पाहावे लागेल असा टोला देखील लगावला आहे.

Updated : 25 Jan 2022 9:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top