Home > Political > शिंदे गटाकडून उद्धव सेनेला दणका..

शिंदे गटाकडून उद्धव सेनेला दणका..

शिंदे गटाकडून उद्धव सेनेला दणका..
X

शिंदे फडणवीस सरकारचे पहिलेच विधीमंडळाचे अधिवेशन शिवसेनेतील दोन व्हीप वरून गाजले. त्यातच शिवसेनेने 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, असं पत्र दिलं असताना आता शिंदे गटाचे भारत गोगावले यांनीही आदित्य ठाकरे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरी यांची गटनेते पदी नियुक्ती केली होती. तर शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिले होते. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती. तर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्याने यावर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विशेष अधिवेशन बोलवले आहे. तर या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेने दोन व्हीप बजावले. एक व्हीप सुनिल प्रभू यांनी तर दुसरा व्हीप शिंदे गटाच्या भारत गोगावले यांनी बजावला होता. त्यानुसार मतदान पार न पडल्याने आता नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

सुनिल प्रभू यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असे आदेश दिले होते. तर शिंदे गटाने भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. मात्र आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांनी राजन साळवी यांना मतदान केले. त्यामुळे शिवसेना विधीमंडळ पक्ष आमचा असून आमचा व्हीप योग्य असल्याचे सांगत आदित्य ठाकरे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र भारत गोगावले यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनीही शिवसेनेचा व्हीप डावलून मतदान केल्याप्रकरणी 39 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले. तर ते पत्र रेकॉर्डवर घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे भारत गोगावले यांनीही 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे.

आदित्य ठाकरे यांनीही 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मत व्यक्त केले. तर सुनिल प्रभू यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे व्हीप कुणाचा ग्राह्य धरला जाणार यावर कोण अपात्र ठरणार याचा फैसला होणार आहे. त्यामुळे 11 जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated : 3 July 2022 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top