Home > पर्सनॅलिटी > Gautam Buddha यांनी आपल्याच आईला Gautami ला भिक्षुणी होण्यास नकार का दिला?

Gautam Buddha यांनी आपल्याच आईला Gautami ला भिक्षुणी होण्यास नकार का दिला?

बुद्धपौर्णिमेनिमित्त जाणून घेऊयात बुद्धाची आई महाराणी गौतमीची भिख्खू होण्याची कहाणी...

Gautam Buddha यांनी आपल्याच आईला Gautami ला भिक्षुणी होण्यास नकार का दिला?
X

Hii, जय भीम! भगवान गौतम बुध्दांनी बौद्ध धम्माची स्थापना केली आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करायला सुरूवात केली. यादरम्यान अनेक जण त्यांचे अनुयायी झाले आणि त्यांनी देखील भिख्खू होत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला सुरूवात केली. पण या भिख्खूंमध्ये महिला नव्हत्या. त्यांनाही भिख्खू होऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची इच्छा होती. त्यासाठी बुद्धांना तशी विचारणाही करण्यात आली पण त्यावेळी त्यांनी महिलांना भिख्खू होण्यापासून नकार दिला. पण का? नेमकं काय कारण होतं? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जन्मदात्रीचं जाणं आणि गौतमीचं येणं

महाराज शुध्दोजन आणि महाराणी महामाया यांच्या पोटी राजकुमार सिद्धार्थ चा जन्म झाला. नियतीला हे सुक कदाचित पाहवत नव्हतं की काय म्हणून सिद्धार्थ अवघे ७ दिवसाचे असताना त्यांची जन्मदात्री आई महामाया हिचं निधन झालं. या सात दिवसांच्या बाळाला पोरके होऊ न देता राणी महामाया यांची धाकटी बहीण- कोशाल राज्याची राजकुमारी गौतमी यांनी त्या बाळाला हृदयाशी कवटाळले, ते आजन्म. पुढे त्यांनाही मुले झाली, पण त्यांचे पहिले आणि लाडके अपत्य राहिले ते सिद्धार्थच. गौतमी यांनी सिद्धार्थना आपले बाळ म्हणूनच वाढवले. त्या अतिशय प्रेमळ जरी असल्या, तरी योग्य ठिकाणी कडक शिस्त बाळगण्यात कचरल्या नाहीत.

युवराज सिद्धार्थाचा गृहत्याग

महालात राजा शुद्धोदन आणि राजपुत्र सिद्धार्थाच्या चर्चेत त्या भाग घेत आणि योग्य ठिकाणी आपली मतेही ठामपणे सांगत. या चर्चेतूनच त्यांना कपिलवस्तूचे शाक्य आणि देवदह रामग्रामचे कोलीय या दोन गणराज्यांत रोहिणी नदीच्या पाण्यावरून चालत असलेल्या वादाची पूर्ण कल्पना होती. सिध्दार्थ यांच्याबरोबर त्यांच्या या विषयावर नियमित चर्चा होत असत. हळूहळू या वादाने उग्र रूप धारण केले. रोहिणी नदीच्या पाण्यासाठी युद्ध अटळ आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. सिद्धार्थ यांनी या युद्धाला कडाडून विरोध केला. मात्र सभागृहाच्या नियमाप्रमाणे, 'युद्धाला विरोध केला म्हणून मी गृहत्याग करतो,' असे त्यांनी जाहीर केले.

सिद्धार्थाला बुद्ध होण्यासाठी मार्ग मोकळा झाला

ही बातमी राजा शुद्धोदन आणि महाराणी गौतमी व गौतमाची पत्नी यशोधरेपर्यंत पोचली. सगळा राजवाडाच दु:खसागरात बुडाला. कोण कुणाला समजावणार? राजा शुद्धोदन त्यांना प्रेमाने रागावू लागले. निर्णय बदलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करू लागले. आईची मायाही अश्रूंवाटे वाहू लागली. ''इतका कठोर निर्णय तू आमच्याशी चर्चा न करता कसा घेऊ शकतोस?'' म्हणून गौतमी यांनी सिद्धार्थला कवटाळले. गौतमाची पत्नी यशोधरेचे दु:ख बघवत नव्हते. कुणीच कुणाचे सांत्वन करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. पण काही वेळाने माता गौतमीच भानावर आल्या आणि राजा शुद्धोदनाला व यशोधरेला समजावत त्या म्हणाल्या, ''महाराज, आपण तिथे असतो, तर आपणही पाण्यासाठी होणाऱ्या युद्धाला विरोधच केला असता. युद्धात काय होते, किती रक्तपात होतो, किती घरे उजाड होतात, कित्येकांच्या आयुष्यात अंधार पसरतो, हे आपण जाणतोच. गौतमाचा निर्णय मानवजातीच्या आणि शाक्यांच्या कल्याणाचा आहे. आपल्या शोकाने त्याचे पाय मागे खेचणे बरोबर नाही. तो एका उदात्त हेतूसाठी परिव्रजक (संन्यासी) होतो आहे.'' गौतमी यांचे बोलणे ऐकून सारेच अवाक झाले.

गौतमीला भिख्खू होण्यास तथागतांचा नकार

गौतम बुद्धांनी भिक्षु संघ स्थापन केल्यावर धम्मप्रसारासाठी ते सतत फिरत असत. हळूहळू त्यांचे शिष्यही भरपूर वाढले. मात्र त्यावेळी फक्त पुरुषांनाच धम्मात प्रवेश होता. गौतमींना ही गोष्ट खटकत होती. एकदा बुद्ध आपल्या धम्माचा प्रसार करीत करीत कपिलवस्तूला आले असताना आणि शाक्यांनी बांधलेल्या निग्रोधारा विश्रांतीगृहात विश्रांती करीत असताना महाप्रजापती बुद्धाकडे गेल्या आणि म्हणाल्या, 'मला बुद्ध धम्मात येण्याची व तुमच्या ज्ञानाची विद्यार्थी उपासक होण्याची इच्छा आहे.'' गौतमी यांनी बुद्ध धम्मात प्रवेश परवानगी मागताच बुद्ध म्हणाले, ''भिक्खूंचे जीवन हे गृहहीन जीवन असते. तो कुठेही झाडाखाली राहतो. अरण्यात झोपडी बांधून जगतो. पाच घरे भिक्षा मागून खातो. नदी किंवा विहिरीवर स्नान करतो. एकटाच फिरतो आणि माझ्या ज्ञानाचा प्रसार करतो. पुरुषप्रधान समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. आधी मला स्त्रीकडे समान दृष्टीने पाहणारे सामाजिक वातावरण निर्माण केले पाहिजे.'' असे म्हणून ते पुढल्या वाटेने निघून गेले.

महाराणी गौतमीचा निर्धार!

गौतमींचे मात्र या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांच्या मनात तर बुद्ध धम्मात येऊन त्या धम्माचा प्रचार करण्याचा विचार ठाण मांडून बसला होता. त्यांनी बराच विचार केला. यशोधरा आणि इतर सहकारी स्त्रियांसोबत चर्चा केली. आणि प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली. त्या वेगवेगळय़ा गावी जाऊन स्त्रियांना भेटत होत्या, त्यांच्याशी चर्चा करत होत्या, त्यांना बुद्ध धम्माचे महत्त्व पटवून देत होत्या. 'पुरुषांना जशी भिक्खू होण्याची संधी तथागतांनी दिली, तशी आम्हाला का नको, याबद्दल आपणास काय वाटते?' असे विचारून त्या स्त्रियांना बोलते करीत होत्या. हळूहळू अनेक स्त्रिया बोलायला लागल्या. ''बुद्धाच्या विचारांमध्ये माणसाचे आणि समाजाचे मानसिक परिवर्तन चांगल्या दिशेने व्हावे, ही तळमळ आहे. जुना विषमतावादी समाज बदलून समतावादी समाज घडावा, ही दृष्टी आहे. या विचारात आपणही सहभागी झाले पाहिजे.'' असे गौतमी सभांमध्ये सांगत होत्या.

आणि गौतमी भिक्षुणी झाली

स्त्रिया तयार होत होत्या. गावागावांतून स्त्रिया एकत्र करणे, त्यांना आपला मुद्दा पटवून देणे आणि स्वेच्छेने येणाऱ्या स्त्रियांना आपल्या समुदायात सामावून घेणे हे क्रांतिकारी कार्य गौतमी यांनी केले. आणि शेवटी सर्वानी मिळून एक दिवस निश्चित करून यशोधरा व इतर शाक्य स्त्रियांना बरोबर घेऊन त्या वैशालीला जिथे बुद्ध मुक्कामी होते, तिथे निघाल्या. वैशालीला पोहोचल्यावर सर्वप्रथम त्यांनी बुद्धाचा आवडता शिष्य आनंद याच्याशी चर्चा केली. आपली मते त्याला पटवून दिली आणि आनंदच्याच मदतीने स्त्रियांचा भिक्षुणी संघ स्थापन करण्याची परवानगी गौतम बुद्धांकडून मिळवली. जगातील स्त्रियांचे पहिले संघटन हे महाप्रजापती गौतमींचेच आहे. कपिलवस्तू ते वैशाली हा प्रवास केवळ स्त्रियांना, तोही ५०० स्त्रियांना घेऊन करणे सोपे नव्हतेच. पण हा प्रवास करण्याचे अचाट साहस आणि भिक्षुणी संघ स्थापन करण्याचे प्रयत्न दोन्ही त्यांनी यशस्वी करून दाखवले.

'थेरगाथा' ची निर्मिती

गौतमीने ज्ञानप्रक्रियेत, समाजनिर्मिती प्रक्रियेत स्वत: सामील होण्याचे आणि इतर स्त्रियांना सामील करण्याचे शिक्षण दिले. एक स्वतंत्र भिक्षुणी संघ स्थापन केला. पुढे या स्त्रियांनी हे नवे आयुष्य जगत असताना आलेले अनुभव लिहून काढले आणि त्यातूनच 'थेरगाथा' या स्त्रीवादी वाङ्मयाची निर्मिती झाली. भारतीय वाङ्मयात स्त्रीवादाची मांडणी करणारी पहिली साहित्यकृती ही 'थेरगाथा'च मानली जाते. सहाव्या शतकात ही स्त्रियांची चळवळ गौतमींच्या माध्यमातून सुरूच नव्हे तर गतिमान झाली, यशोधरेमुळे ती विकसित झाली. त्यातून अनेक स्त्रिया पुढे गुरुपदी पोचल्या. विचारवंत, कवयित्री झाल्या. सम्राट अशोकाने आपली मुलगी संघमित्रा हिला श्रीलंकेत बौद्धभिक्षुणी म्हणून पाठवले. ती जागतिक पातळीवर पहिली स्त्री गुरू उपदेशक म्हणून इतिहासात प्रसिद्ध झालेली आहे.

जेव्हा बुध्दांनी नकार दिला होता तेव्हाच जर गौतमी ने माघार घेतली असती तर.... आज भिक्षुणी संघाची स्थापना झालीच नसती. थेरगाथाची देखील निर्मिती झाली नसती. म्हणून गौतमी यांनी अनेक स्त्रियांना जो स्त्रीमुक्तीचा मार्ग दाखवला. त्यामुळे त्या काळात यशोधरा, गोपी, भड्डा, कच्छना अशा विदुषी होऊन गेल्या. गौतमी तर या श्रेष्ठ संस्कृतीच्या जडणघडणीसाठी झटणारी एक सांस्कृतिक स्त्री म्हणून दया, क्षमा, शांती, संघर्ष आणि संयम या तत्त्वांची साक्षात मूर्तिमंत उदाहरण म्हणुन आपल्यासमोर आजही येते.

Updated : 16 May 2022 7:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top