Home > पर्सनॅलिटी > Fashion: परफेक्ट लूक विथ ॲक्सेसरीज...

Fashion: परफेक्ट लूक विथ ॲक्सेसरीज...

कधी कधी तुमचे कपडे चांगले असतात. मात्र, तरीही तुम्ही परफेक्ट लूकमध्ये दिसत नाही... काही तरी मिसिंग असल्याचं सारखं जाणवत असतं? हे मिसिंग नक्की काय असतं? तुमच्या पर्सनॅलिटीला साजेशा असा परफेक्ट लूक कसा असावा? जाणून घेण्यासाठी ‘फॅशन ॲक्सेसरीज’ संदर्भात सुवर्णरेहा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन वाचा...

Fashion: परफेक्ट लूक विथ ॲक्सेसरीज...
X

फॅशन म्हणजे फक्त कपड्यांपुरतंच मर्यादित न राहता त्यांना पूरक अशा accessories वापरुन त्या कपड्यांच्या सौंदर्यात भर घालणे हेही आलंच. साजेसे दागिने हे ही कपड्यांना उठाव देण्यासाठी गरजेचे असतात. कधी कधी एखादा ड्रेस इतका सुंदर असतो की, त्यासाठी त्याला साजेशा किंवा कॉम्प्लिमेंट करणार्याग नवीन अॅक्सेसरीज बनवून घेणे म्हणजे त्या ड्रेसला ऑनर करण्यासारखंच असतं.

त्यात सर्वात महत्वाची accessory कोणती असेल तर ते फुटवेअर. (शूज,बुट्स,सॅंडल्स,चप्पल इत्यादी) त्याशिवाय कोणताही लुक पूर्ण होत नाही. कोणत्या ड्रेसवर कोणते शूज किंवा साडीवर चप्पल घालायचे हे आधी ठरवणे महत्वाचे असते.

कोणत्या मटेरियलचे, कोणत्या मेकचे, टाचा किती उंच, किती रुंद हव्यात. कधी, कुठे आणि किती वेळ वापरायचे, हवामान कसे आहे, हा सगळा विचार करूनच शूजची निवड करावी लागते. कारण आपल्या शरीराचे पूर्ण वजन दिवसभर आपल्या पावलांवर असते.

बर्यााचदा खूप उंच टाचांचे शूज (स्टीलेटोज) घालून दिवसभर फिरणार्याा मुलींना घरी आल्यावर ते शूज काढल्यानंतर जे फिलिंग येतं आणि जो रिलीफ मिळतो. तो स्वर्गसुखापेक्षा कमी नसतो यावर कुणाचे दुमत असू नये.

मध्यंतरी एक इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यात आला होता. त्यात काही पुरूषांना दिवसभर वापरण्यासाठी मुलींचे हाय-हिल्स दिले आणि नेहमीची कामे करायला सांगितली गेली. दिवसभर सोडाच, एखादा तासही त्या पुरूषांना हे काही झेपलं नाही. आम्ही मुली मात्र, तसे शूज दिवसभर वापरुन आमची सगळी कामे लीलया करतो आणि सुंदरही दिसत राहतो. मला या गोष्टीचे खूप कौतुक आहे.

दुसरी महत्वाची अॅक्सेसरी म्हणजे हँडबॅग, पर्स इत्यादी. ही हातात नसलेली स्त्री विरळच. एकदा एका प्रोजेक्टवर रात्रंदिवस काम करत होते. पहाटे 4 ला झोपून 3 तासात उठून गडबडीत कामाला निघाले. गाडीत बसल्यावर लिपस्टिक लावेन या हेतूने पर्समधून लिपस्टिक काढायला गेले तर पटकन ती हाताला लागेना. पर्समधल्या हार्ड ड्राइव्ह, पेन ड्राइव्हज, चार्जर्स, डायर्याल, कार्डस रीडर्स, पॉवरबँकच्या गराड्यात ती बिच्चारी कुठेतरी लपून बसली होती.

पैसे, मेकअप किटस्, हेअर ब्रश बरोबरच सेफ्टी पीन्स, डोकेदुखीच्या गोळ्या, साबणाच्या स्ट्रीप्स, चॉकलेट-लिमलेटच्या गोळ्या, रुमाल,टिशूज, देवदेवतांचे फोटो आणि अंगारे हे सगळं आणि अजून बरच काही.. सगळा संसारच घेऊन फिरत असतो. आपण आपल्या हॅन्डबॅगमधून. आपले संपूर्ण जीवन तिने सामावून घेतलेलं असते स्वतःमध्ये !

अशी ही पर्स ढवळणे हा लहान मुलांचा आवडीचा खेळ, त्यातील आईचा मेकअप वापरणे (खराब करणे) हे किती exciting असतं मुलांसाठी, हे वेगळे सांगायला नकोच!

माझ्या आठवणीतील पहिली पर्स म्हणजे आजीची कमरेला लावायची चंची, कधी त्यात जपमाळ असे, कधी घराच्या चाव्या, दुसरीत खायच्या पानात टाकायच्या वस्तू. मग आठवते ती आईची बॅग. आई, स्वतः आमची एक शाळा आणि वर्तमानपत्र तेव्हा चालवत असे, त्यामुळे कागदपत्रे, डायऱ्या, पेनांनी भरलेली असे तिची पर्स. ते सगळे बाहेर काढून मी त्यावर गिरपटत असतानाच कधी तरी माझी चित्रकला सुरु झाली असावी!

नंतर माझा मुलगाही त्याच्या लहानपणी तेच करू लागला. त्याशिवाय त्याला आवडलेली एखादी छोटीशी वस्तू, एखादे फूल, वेगवेगळे कॉईन्, छोटासा सुंदर दगडही कागदाच्या पुरचंडीत बांधून (गिफ्ट रॅप करून) त्यावर "I love you Mom" असं काही तरी त्याच्या बाळबोध अक्षरात लिहिलेल्या आणि माझ्या नकळत ठेवलेल्या गिफ्ट्स मला पर्समध्ये मिळत असत, यातील बऱ्याचशा आज ही माझ्या संग्रही आहेत...

मी त्यांना माझ्या आठवणींच्या पुरचुंड्या म्हणते !!! आणि म्हणूनच हँडबॅगची खरेदी ही एक भावनिक खरेदी मानतात (इमोशनल पर्चेज) हे मला पटते.

या बॅग्सही आपल्या शरीराच्या आकारमानाला बॅलन्स करतात. त्यामुळे शक्यतो आपल्या शरीरमानाच्या विरुद्ध आकाराची बॅग घ्यावी.

उंच आणि बारीक स्त्रियांना सर्वसाधारणरित्या कोणतीही बॅग शोभते. तरीही फारच छोटी पर्स त्यांनी वापरू नये. मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या तसेच मोठे प्रिंट्स असलेल्या बॅग्स या मुलींना चांगल्या दिसतात. लहान चणींच्या मुलींनी फार मोठया बॅग्स वापरू नयेत, बोजड दिसतात. नाकापेक्षा मोती जड होऊ नये. खूप लांब असलेल्या आणि कंबरेखाली ओघळणाऱ्या पर्सेस मुळे उंची कमी भासते.

धिप्पाड आणि प्लस साईझच्या स्त्रियांनी चौकोनी तसेच structured बॅग्स वापराव्या. झोळीसारख्या दिसणाऱ्या किंवा आतील सामानानुसार आकार बदलणाऱ्या बॅग्स टाळाव्या. अतिशय लहानही नको. प्रिंट्स मोठे असावे, नाजूक नको.

बॅग विकत घेताना ती आपल्या शरीरावर कशी दिसते. हे आरशात वेगवेगळ्या अँगलने पाहायला विसरू नये. नियमानुसार बॅग आणि शूज एकाच रंगाचे अथवा जवळपासचे हवेत किंवा अगदी विरोधी असावेत.

कमरेचे बेल्टही सर्वसाधारणरित्या शूजच्या रंगाशी मिळते जुळते असावेत. वेस्टर्न ड्रेसेसवर, जीन्सवर, ट्राउझर्स वर बेल्ट लावले जातात. कापडी, लेदर, मेटल असे वेगवेगळ्या मटेरियल्समध्ये हजारो व्हरायटीज आज उपलब्ध आहेत. ब्रॉंझ युगात बेल्टचा पहिला संदर्भ सापडतो.

शिकारीसाठी आणि नन्तर शेतीसाठी लागणारी आयुधे शरीरावर अडकवण्यासाठी याचा उपयोग होत असे. स्त्रिया नवजात अर्भकाला एका कपड्याने असंच स्वतःच्या शरीरावर बांधत असत. मग नन्तर कधीतरी तो शरीरावरच्या कपडयांना मॅचिंग सॅश म्हणून बांधता बांधता आपल्या वॉर्डरोबचा एक अविभाज्य घटक बनला. सेफ्टी गिअर म्हणून खूप उंचीवर काम करणारे, गिर्यारोहक अनेक प्रकारचे बेल्टस (हारनेस) वापरतातच !

फॅशनपुरते बोलायचे झाले, बेल्ट शरीराच्या मध्यभागी बांधत असल्याने तो visually शरीराला दोन भागात विभागतो. त्यामुळं कमी उंची असणाऱ्यांनी ड्रेसच्या विरोधी रंगसंगतीचा बेल्ट वापरू नये किंवा तो फार रुंदही असू नये.

पेअर शेप असलेल्या मुलींनी रुंद आणि घट्ट बेल्ट वापरले तर त्यांच्या मुळातच रुंद असलेल्या नितंबाकडे लक्ष वेधले जाऊ शकते. स्ट्रेट बॉडी टाइप्सनी गडद/विरोधी रंगाचे रुंद पट्टे वापरावे, नाजूक चणींच्या मुलींनी एक इंचापेक्षा रुंद बेल्टस वापरू नयेत.

स्कार्व्हस, स्टोल्स, दुपट्टेही आपण बर्यांचदा वापरतो. स्कार्व्हस बांधायचे अनेक प्रकार असतात. वेगवेगळ्या तापमानापासून तर ते आपल्याला वाचवतातंच पण काही चांगल्या नसलेल्या नजरांपासूनही आपला बचाव करतात.

साडीवरही थंडीत शाल घेतलीच जाते. छान ड्रेप केली तर सुंदर दिसून साडीला उठावच देते. मी खूप पूर्वी साडीवरही जॅकेट्स घालत असे. एखाद्या प्लेन साडीवर छान भरलेलं स्लिव्हलेस जॅकेट साडीला एक वेगळाच लूक देऊन जाते.

आपले केस आपण वेगवेगळ्या पद्धतीने बांधतो. बांधण्यासाठी लागणार्याे क्लिप्स,पिन्स, स्कार्व्हस,हेयरबॅंड्स, इत्यादी कसे असावेत हे केसांचा कट कोणता आहे, केसांची जात आणि रंग कोणता आहे .यावर अवलंबून राहते. त्यामुळे आपला चेहरा चांगला दिसतो का? हे बघणे महत्त्वाचे. बाहेरच्या देशात हॅट्स वापरतात. आणि तिथे थंडी खूप असते म्हणून हातात मॅचिंग ग्लोव्हजही असतात.

वरील एकेका accessory वर मी किमान एक लेख लिहू शकेन, पण इथे थोडक्यात आवरतेय .

त्यांचे महत्त्व जितके आहे तितकंच त्याचे मार्केट पण मोठे आहे आणि म्हणून निफ्टसारख्या अनेक संस्थांमधून Accessory Design सारखे वेगवेगळे अभ्यासक्रम प्रॉडक्ट डिझाईन या विषयाखाली शिकवले जातात.

त्याबद्दल नंतर कधीतरी .

- सुवर्णरेहा जाधव

#exerpt2 #upcoming

#Fashionate

Updated : 1 April 2021 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top