Home > पर्सनॅलिटी > प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहिलेल्या 'रमाबाई'

प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहिलेल्या 'रमाबाई'

उच्चशिक्षित व नामवंत विद्वानाची पत्नी म्हणून जीवन कंठण्यापेक्षा स्वत: शिक्षण घेऊन स्वयंसिद्धा बनत असतानाच देशातील अन्य महिलांनासुद्धा तोच वसा देण्यासाठी आजन्म झगडणाऱ्या रमाबाई रानडे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या तेजस्वी स्मृतींना शब्दांतून वंदन केले आहे ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी...

प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहिलेल्या रमाबाई
X

सातारा जिल्ह्यातील एका आडवळणाच्या गावात जन्मलेल्या रमाबाई कुर्लेकर यांचा विवाह त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षीच न्या. महादेव रानडे यांच्याशी झाला. परंतु लब्धप्रतिष्ठीत पुरुषाची पत्नी म्हणून जगण्यापेक्षा स्वत:च सुशिक्षीत व्हायचे त्यांनी ठरवले. समाजाचा कडवा विरोध असूनही त्या शिकत राहिल्या.

रमाबाई या आधुनिक स्त्री चळवळीच्या अग्रणी नेत्या होत्या. स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या खंबीर आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. न्या. रानडे हे नाव, त्यांच्या ऐन तिशीमध्येच समाज सुधारक म्हणून प्रसिद्ध झाले होते. आपल्या पतीच्या सामजिक आयुष्याचा भाग बनून त्यांची मदत करण्याच्या ध्यासाने रमाबाईंनी शिक्षणाची कास धरली.

त्या सुरुवातीला एक उत्तम विद्यार्थी बनल्या, मग हळूहळू त्या न्या. रानड्यांच्या सचिव झाल्या, आणि शेवटी त्या एक उत्तम सहकारी व मित्र झाल्या. महादेवराव सुरुवातीला रमाबाईंना साधी अक्षरओळख, मराठी वाचन करवून घेत. मग इतिहास, भूगोल, गणित आणि इंग्रजीचेही धडे त्यांनी रमाबाईंना दिले. पुढे रोजचे वर्तमानपत्र ते रमाबाईंना वाचावयास लावून घडलेल्या घटनांवर त्यांच्याशी चर्चा करत.

रमाबाईंना इंग्रजी वाङ्मयाची विशेष गोडी निर्माण झाली होती. रमाबाईंनी स्वतःच्या आयुष्यातील घटना शब्दरूप करून मराठी वाङ्‌मयाला एक मोठी देणगी दिली आहे. तसेच त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांची धर्मशास्त्रावरील अनेक भाषणे प्रकाशित केली.

रमाबाईंनी सर्वप्रथम जाहीर भाषण नाशिक हायस्कूलमध्ये एका कार्यक्रमात केले. रमाबाईंनी मराठी आणि इंग्रजी भाषेवर ‌नैपुण्य मिळवले होते. त्यांची भाषणे ही अत्यंत साध्या भाषेतली, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी असत.

त्यांनी मुंबई मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना केली. इ.स. १८९३ ते इ.स. १९०१ या काळात त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाचा आलेख हा सतत उंचवणारा होता. त्यांनी हिंदू लेडीज सोशल आणि लिटररी क्लबची मुंबईत स्थापना केली, तसेच महिलांना भाषा, सामान्य ज्ञान, शिवणकाम आणि हस्तकला यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले.

पतीच्या निधनानंतरचा काही काळ हा दु:खादायक आणि निराशाजनक होता. त्या मुंबई सोडून पुण्याला परत गेल्या आणि फुले मंडई जवळच्या आपल्या जुन्या वाड्यात राहू लागल्या. सुमारे एक वर्ष त्यांनी एकाकी आयुष्य व्यतीत केले. स्वतःवर लादलेल्या या एकांतवासानंतर त्या सामाजिक आयुष्यात सक्रिय झाल्या आणि त्यांनी भारत महिला परिषदेचे मुंबई मध्ये आयोजन केले.

पतीच्या मृत्यूनंतर आयुष्याची २४ वर्षे रमाबाईंनी समाज जागृती आणि सेवा सदन सारख्या पीडित महिलांना सशक्त बनवणाऱ्या सामाजिक चळवळी उभारण्यात वाहून घेतली.

रमाबाई स्त्री शिक्षण, न्याय्य हक्क, समान अधिकार आणि समाज सुधारणेसाठी अविरत झटल्या. त्यांनी स्त्रियांना प्रशिक्षित रुग्णसेवा ही केवळ एक सेवा नव्हे तर उपजिवीकेचे साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितले.

त्या काळी रुग्णसेवा ही व्यावसायिकदृष्ट्या समाजात रूढ नव्हती आणि स्त्रियांसाठी तर ही दारे नेहमीच बंद होती. महिलांना धीर देऊन या क्षेत्रात पुढे आणण्यासाठी त्या विचारत : "तुम्ही तुमच्या आजारी वडील किंवा भावाची सेवा करता ना? सगळे पुरुष रोगी हे आपल्या भावासमान आहेत आणि त्यांची सेवा हे आपले कर्तव्यच आहे." त्यांचे विचार ऐकून अधिकाधिक महिला पुढे आल्या. रुग्णसेवेच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. सेवा सदन मधूनच पहिली भारतीय नर्स समाजात वावरू लागली.

समाजाच्या रूढींना झुगारून स्त्रीस्वावलंबनासाठी रुग्णसेवेची दारे उघडून अनेक गरजू महिलांना नवा मार्ग दाखवला. तरूण मुली आणि विधवांसाठी सेवा सदन एक मोठा आधार होता.

सेवा सदनच्या एका वार्षिक समारंभात एका विधवेला बक्षिस जाहीर झाले होते. अळवण नेसलेली ती महिला जेव्हा पुढे आली तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी टिंगल केली. हे त्यांचे वागणे रमाबाईंना मुळीच आवडले नाही. समारंभाच्या शेवटी आभाराचे भाषण करताना त्या म्हणाल्या, "तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात पण मी तुम्हाला सुशिक्षित कसे म्हणू? समाजातील अनिष्ट रूढींना बळी पडलेल्या आपल्या भगिनींबद्दल ज्यांच्या मनात साधी माणुसकी नसून त्या केवळ एक थट्टेचा विषय वाटतात त्यांना मी सुशिक्षित कसे मानू? तुमच्यातील प्रत्येकाच्या घरी एखादी अशीच अभागी विधवा असू शकते, ती तुमची बहीण, चुलती, तुमची आत्या किंवा तुमची स्वतःची आई देखील असू शकते. ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही असे वागणार नाही." त्यांचे हे कठोर शब्द उपस्थितांना फटकाऱ्यांसारखे लागले.

त्यांनी बालविवाहाच्या अनिष्ट रूढीविरोधात अविरत मोहीम चालवली. मध्यम वर्गातील अनेक अभागी निराधार महिलांना सेवासदनमार्फत त्यांनी मदत केली. पुण्यातील आपल्या वडिलोपार्जित वाड्यातून सुरू केलेले सेवा सदन हे उत्तरोत्तर वाढतच गेले. रमाबाईंनी जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी फिजी आणि केनिया मधील भारतीय मजुरांच्या समस्यांवर देखील आवाज उठवला.

समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्या कार्याचा गौरव झाल्यानंतर देखील आपण केवळ आपल्या पतीची सावली बनण्याचा प्रयत्नय करीत असल्याचे त्या सांगत असत.

रमाबाई रानडे यांनी १९ व्या शतकामध्ये स्त्री शिक्षणावर आपली स्वतंत्र मते व्यक्त करून स्त्री सुधारणा करण्यास मोलाची मदत केली.

अशा रमाबाई. मोठे सामाजिक कार्य करत असताना त्या प्रसिद्धीच्या वलयापासून दूरच राहिल्या. पुणे व मुंबईत स्वकर्तृत्वाची छाप ठेवून २६ एप्रिल १९२४ रोजी त्यांनी सेवा सदनाच्या वास्तूतच ईहलोकीची यात्रा संपवली.

-भारतकुमार राऊत

Updated : 25 Jan 2021 1:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top