Home > पर्सनॅलिटी > महाशक्ती : नीला आकाश

महाशक्ती : नीला आकाश

महाशक्ती : नीला आकाश
X

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००० साली मी कोकण विभागाचा माहिती उपसंचालक म्हणून कार्यरत होतो. त्या दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क विभागाच्या भारतीय प्रशासकीय अधिकारी तथा महासंचालक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी नीला सत्यनारायण मॅडम यांनी सूत्रे हाती घेतली. काही व्यक्ती अशा असतात की, त्यांच्याभोवती एक वलय असतं. असं वलय लाभलेल्या व्यक्तींमध्ये मॅडम अग्रणी आहेत. एक कडक, शिस्तप्रिय, निश्चयी अधिकारी म्हणून जशी त्यांची प्रतिमा आहे, तशीच त्यांची एक संवेदनशील कवी, गीतकार, लेखक, कला रसिक म्हणून त्यांची प्रतिभा आहे.

एकाच व्यक्तीत अशी परस्पर विरोधी व्यक्तिमत्त्व कशी असू शकतात याचं मला आश्चर्य वाटायचं. म्हणूनचं मॅडमची आमच्या विभागात नेमणूक झालयावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळेल याचा मला आनंद झाला. त्यावेळच्या त्यांच्या मार्गदर्शनाचा, धाडसाचा, नवनवीन कल्पना उचलून धरून त्यांना केवळ तोंडदेखलं नव्हे तर पूर्ण पाठबळ देण्याचा प्रत्यय मला येत गेला. रत्नागिरी येथे २००० साली झालेला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी विकास प्रदर्शन आयोजित करणे, बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांवर आधारित कोकण विकास: नवी दिशा- नवी आशा हा दूरदर्शन माहितीपट, याच नावाची रंगीत चित्रमय पुस्तिका अशा अनेक कल्पक बाबी मला त्यांच्या प्रोत्साहनामुळे करता आल्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहितीपट दाखवण्याचा निर्णय म्हणजे त्यांचे खूप मोठे प्रशासकीय धाडस जसे होते, तसाच तो स्वतः वरील, सहकाऱ्यांवरील विश्वास ही होता. अशा एक ना अनेक बाबींमुळे, दैनंदिन कामकाजामुळे, बैठका, दौरे यातून मॅडमचं व्यक्तीमत्व उलगडत गेलं, अधिकाधिक भावत गेलं.

खरं म्हणजे, महाराष्ट्र राज्यात गेल्या २०/२५ वर्षात स्पर्धा परीक्षा, प्रशासकीय सेवा या विषयी हा आकर्षण वाढत आहे, ही समाधानकारक गोष्ट आहे. असं असलं तरी मॅडम ज्यावेळी भारतीय प्रशासकीय अधिकारी झाल्या त्यावेळी असे वातावरण नव्हते. त्या या सेवेकडे वळल्या ती त्यांच्या वडिलांची इच्छा होती. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रज अधिकारी भारत सोडून जाऊ लागले. प्रशासनात पोकळी निर्माण होऊ लागली. त्यामुळे आपल्या मुलांपैकी कुणी तरी भारतीय प्रशासकीय अधिकारी व्हावं अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान मॅडम इंग्रजी साहित्य घेऊन दिल्ली विद्यापिठातून बीए तर पुणे विद्यापिठातून एमए झाल्या. भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी आणि भारतीय प्रशासकीय अधिकारी अशा दोन्ही स्पर्धा परिक्षात त्या निवडल्या गेल्या. बँकेची नोकरी अधिक आकर्षक होती तर प्रशासकीय नोकरी खडतर होती. पण वडिलांच्या इच्छेला मान देऊन त्या जुलै १९७२ मध्ये भारतीय प्रशासकीय अधिकारी म्हणून भारत सरकारच्या सेवेत दाखल झाल्या. या सेवेत मॅडमनी सहाय्यक जिल्हाधिकारी - नागपूर, उपविभागीय अधिकारी - भिवंडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी - ठाणे, पुढे मंत्रालयात समाज कल्याण, सांस्कृतिक विकास व युवा कार्य, अन्न व नागरी पुरवठा, पर्यटन, वस्त्रोद्योग, महिला व बालविकास, सामान्य प्रशासन आणि माहिती व जनसंपर्क, गृह, महसूल व वने आदी विभागात सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशा चढत्या श्रेणीने स्वतःचा ठसा उमटवत पदे भूषविलीत. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची पाच वर्षांची कारकीर्द लक्षणीय ठरली.

मॅडमची प्रतिभा म्हणजे आजवर त्यांची ३५ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात १२ ललित पुस्तकं, ९ काव्य संग्रह, काही प्रेरणा दायी, काही अनुवादित पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या २ कथांवर चित्रपट निर्माण झाले आहेत. काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. १० संगीत सीडी प्रकाशित असून काही चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांसाठीही त्यांनी गीतलेखन केलं आहे. मॅडमनी, त्यांचा गतिमंद मुलगा चैतन्य वर ओतप्रोत प्रेमाने लिहिलेलं एक पूर्ण अपूर्ण हे स्वानुभवातून लिहिलेलं पुस्तक तर उद्योजक पती सत्यनारायण सर यांच्या जीवनावर लिहिलेलं सत्य- कथा ही पुस्तकं नुसतीच गाजली नाही तर पालकांना, युवकांना सतत प्रेरणा देणारी आहेत. ही दोन्ही पुस्तकं मी स्वतःही वाचली आहेत. सुदैवानं सत्य-कथा माझ्या संग्रही आहे.

कन्या अनुराधा गरजूंना समक्ष समुपदेशन करून समाज सेवा करतेय. मॅडमनी काही नियम जे मी स्वतः पाहिले, अनुभलेत ते अत्यंत कटाक्षाने पाळलेत. हे नियम आज आपणही अवश्य पाळले पाहिजेत. काही नियम म्हणजे कार्यालयीन वक्तशीरपणा, शिस्तबद्धता, नियमांचं काटेकोर पालन, रविवारचा दिवस कुटुंबासाठीच देणे, आपल्या आवडी, छंद कार्यालयीन वेळेत नव्हे तर त्यानंतर घरी, किंवा सुट्टीच्या दिवशी जोपासणे असे किती तरी म्हणता येतील. सेवेत येणाऱ्या तरुण तरुणींनी शासकीय सेवा ही निरंकुश सत्ता नसून लोकसेवा आहे. याचं सतत भान ठेवलं पाहिजे असं मॅडमना मनापासून वाटतं. आजच्या तरुण तरुणींनीच नव्हे तर आपण सर्वांनी ही त्यांचा असीम आदर्श ठेवला पाहिजे. मॅडमना, प्रतिभाशाली, समृद्ध वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ.+91 9869484800

devendrabhujbal4760@gmail.com

Updated : 5 April 2020 2:09 AM GMT
Next Story
Share it
Top