जिजाऊ : माझ्या प्रेरणास्रोत
Max Woman | 17 Jun 2019 4:50 PM IST
X
X
संसदेत माझ्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करीत असताना जनतेच्या अपेक्षांची पूर्तता कशी करता येईल याकडे माझा नेहमीच कटाक्ष असतो. अर्थात एक खासदार म्हणून मी हे करणे अपेक्षित आहेच. परंतु हे काम करीत असताना कोणत्याही लोकप्रतिनिधीला एक वैचारिक वारसा असतो व त्यावरच त्याच्या कामाची दिशा ठरते...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब राजमाता जिजाऊ या माझ्यासाठी सतत प्रेरणेचा स्रोत ठरल्या आहेत. जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांच्या वाड्यात झाला.
त्या काळात त्या घोडेस्वारी, तलवारीबाजी आदींमध्येही पारंगत होत्याच परंतु त्यांच्या काळात घडलेल्या राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरामुळे त्यांच्या ठायी विशेष अशी राजकीय समजही होती. त्यातूनच त्यांनी आपल्या मुलांना स्वराज्य स्थापनेसाठी उद्युक्त केलेच शिवाय त्यांना त्यासाठी तयारही केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीमध्ये राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद होता. महाराज कोणतेही काम हाती घेण्यापुर्वी आईसाहेबांशी सल्लामसलत करीत असत. शिवरायांसारख्या लोकोत्तर राजाच्या जडणघडणीमागे जिजाऊच होत्या. देशातील कर्तृत्त्वान महिलांची यादी काढली जाईल त्यात जिजाऊंचे नाव सर्वात वरच्या स्थानी असेल. त्यांनी केवळ एक राजा घडविला नाही तर त्यांनी लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडून ती यशस्वी करुन दाखविली. शिवरायांच्या चरित्राची जिजाऊंना वगळून कल्पनाही करणे शक्य होत नाही. म्हणूनच राजमाता जिजाऊ माझ्यासाठी नेहमीच उर्जेचा अखंड स्रोत ठरल्या आहेत.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक स्वातंत्र आणि स्वाभीमानाने जगण्याची मोहिम अर्थात बचतगटांचे 'यशस्वीनी सामाजिक अभियान' ही चळवळ आम्ही सुरु केली. या चळवळीच्या माध्यमांतून बचतगटांचे सक्षमीकरण करुन त्यातील महिला सभासदांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य देण्याचे काम करत आहोत. याशिवाय स्त्री-भ्रुणहत्येच्या विरोधात “जागर जाणीवांचा-तुमच्या माझ्या लेकींचा” हा वेगळा उपक्रम आम्ही हाती घेतला. राज्यभरात या उपक्रमाने आज चळवळीचे रुप धारण केले असून स्त्रीभ्रुणहत्या हा समाजाला लागलेला डाग आहे अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे हे या उपक्रमाचे यश आहे.
जिजाऊ, सावित्रीमाईं आणि अहिल्याबाईं अशा अनेक कर्तुत्वान स्त्रियांना घडविलेल्या आपल्या राज्यात लेकींच्या जन्माचे आता स्वागत होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा कृषी संस्कृतीप्रधान राज्यातील दुर्दैवी घटना आहे. यामध्ये शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. अशा पिडितांसाठी आम्ही “उमेद” या महिला सहायता उपक्रमाची सुरुवात केली. याशिवाय जिजाऊंच्या राज्यातील लेक त्यांच्यासारखीच शूर असावी या भूमिकेतून विद्यार्थिनींसाठी कराटे प्रशिक्षणाचीही सोय केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या माध्यमातून युवतींचे राज्यव्यापी संघटन उभारण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यात आम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. अर्थात यामागे आईसाहेबांच्या विचारांची प्रेरणाच आहे हे उघड गुपित आहे.
पुन:श्च एकदा आईसाहेब राजमाता जिजाऊंच्या कार्याला आदरपूर्वक वंदन!!
सुप्रिया सुळे, खासदार, बारामती
Updated : 17 Jun 2019 4:50 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire