Home > पर्सनॅलिटी > तिचं तिच्या जीवनाची रचनाकार..

तिचं तिच्या जीवनाची रचनाकार..

तिचं तिच्या जीवनाची रचनाकार..
X

अखिल भारतीय अग्निशिखा मंचतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या स्त्री- पुरुषांना गौरविण्यात येत होतं. त्याचवेळी त्यांची ओळखही करून देण्यात येत होती. एका ओळखीनं माझं लक्ष चांगलंच वेधलं. ते नाव होतं, रचना. रचना ठाकरे.

त्याला कारणही तसंच आहे. आजही पुरुषप्रधान असणाऱ्या समुद्रमार्गे चालणाऱ्या व्यवसायात ती वरिष्ठ हुद्द्यावर आहे. रचना सध्या केरीइंडेव्ह लॉजीस्टिक्स या कंपनीत उपाध्यक्ष (मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर )आहे. या कंपनीतर्फे देशविदेशात विविध मालाची आयात निर्यात होते. अतिशय आत्मविश्वासानं आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरणाऱ्या रचनाचा या पदापर्यंतचा आजवरचा प्रवास खूप खडतर राहिलाय. तो कळाल्यावर आपण चकित होतो, तिच्या यशानं दिपून जातो.

खरं म्हणजे, रचना आणि समुद्राचा संबंध नव्हता. तशी शक्यताही नव्हती. कारण तिचा जन्म झाला, तो अमरावती जिल्ह्यातील वलगाव इथं. वडील पोलीस खात्यात होते. नंतर आईलाही सरकारी नोकरी लागली. पण घरातल्या संख्येमुळे जेमतेम भागत असे. छोटा काका, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे सर्व एका खोलीत रहात. रचनाचे वडील पदवीधर होते. ते शिक्षणाचं महत्व जाणत. आपल्या मुलांनी खूप शिकावं, अशी त्यांची इच्छा होती.

रचनाला त्यांनी अमरावती येथील प्रसिद्ध मणिबाई गुजराती शाळेत टाकलं. रचना पाचवी ते दहावी या शाळेत शिकली. रचनाच्या वर्गातील सर्व श्रीमंत होते. रचना त्या मानाने खुपच सामान्य होती. मैत्रिणींच्या वाढदिवसाला जाताना तिच्याकडे नवे, चांगले कपडेही नसत. दुःखी कष्टी मनानं ती शाळेचा गणवेश घालूनच अशा ठिकाणी जाई . त्या आठवणी, आजही रचनाला दु:खी कष्टी करतात. रचना आज जरी मोठया पदावर असली तरी अभ्यासात तिची प्रगती साधारण होती. अवघे ५८% गुण मिळवून ती दहावी झाली. दुर्दैवाने त्याच दरम्यान तिच्या वडलांना मोठा अपघात झाला. त्यामुळे त्यांना अकाली स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली.

रचनाला या परिस्थितीचा फटका बसला. ती बारावीत नापास झाली. पुढे ऑक्टोबरमध्ये तिने केमिस्ट्रीचा पेपर पुन्हा दिला. ती बारावी पास झाली. रचनाच्या घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचं स्वप्नसुद्धा ती पाहू शकत नव्हती. तिने बीएससी करण्याचं ठरविलं. ती बीएससी झाली. दरम्यान, तिला लग्नासाठी स्थळं येऊ लागली. पण रचनाला लग्न करायचं नव्हतं. जीवनात काहीतरी बनायचं होतं. मार्ग दिसत नव्हता.

दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचं "अग्निपंख" हे पुस्तक तिच्या वाचनात आलं. तिला तिचं आकाश दिसलं. दूर उडण्यासाठी रचनानं झेप घेतली. एमबीए करायचं ठरवलं. अमरावती सोडलं. थेट मुंबई गाठली. खूप मेहनत घेतली. खूप अभ्यास केला. एमबीएच्या लेखी परीक्षेत, गणितात तिनं चक्क ७७% गुण मिळविले. समूह चर्चेच्या तयारीवेळी तिला काही मुलांसोबत मुंबईतील आमदार निवासातील एका खोलीत रहावं लागलं. पण ती डगमगली नाही. रचना उत्तम गुणांनी एमबीएची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली.

साधारणपणे मुली निवडत नाही, ती शाखा तिनं निवडली. ती म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. तिनं अचूक हेरलं, ज्या क्षेत्रात मुली कमी, तिथं स्पर्धा कमी. म्हणजे आपल्याला जास्त संधी. तिच्या एमबीएच्या प्राध्यापकांनीही तिचं मनोबल वाढवलं. घरच्या परिस्थितीमुळे एमबीएसाठी रचनानं बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेतलं. चांगल्या गुणांनी ती एमबीए झाली. त्याचं तिला फळ मिळालं. संस्थेच्या परिसर मुलाखतीतच तिची निवड झाली. तेव्हापासून रचनानं मागे वळून पाहिलंच नाही. मुदतीच्या आधीच तिनं शैक्षणिक कर्ज फेडलं.

पहिली नोकरी कार्गोमार कंपनीत. तिथं ती दोन वर्षे होती. दुसरी हिंद टर्मिनल्स, तिसरी आर्शिया इंटरनॅशनल, चौथी कॉन्टिनेनंटल वेअरहोऊसिंग आणि आता केरीइंडेव्ह लॉजीस्टिक! रचनानं तिच्या कार्यालयात अतिशय प्रसन्न वातावरण ठेवलंय. तेथील प्रेरक संदेश आपलं लक्ष वेधतात. आपल्याला प्रभावित करतात.

आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यवसायात इंग्रजीवर प्रभुत्व हवं. त्यासाठी आत्मविश्वास हवा. ते कसं मिळवलं? असं विचारल्यावर रचना म्हणाली, अमरावतीत असताना इंग्रजी खूपच कठीण वाटायचं. लेखन चांगलं होतं. पण बोलतानाच अडचण यायची. माझी कमतरता मी हेरली. त्यावेळी खूप इंग्रजी दैनिकं, पुस्तकं मी वाचायची. भेटेल त्याच्याशी इंग्रजीत बोलायची. असं करून, रचनाच्या भाषेत रट्टा मारून! इंग्रजी बोलण्याचा तिनं सराव केला. त्यामुळं तिचा आत्मविश्वास वाढत गेला. त्याचा आता तिला खूप उपयोग होतोय.

कामामुळे तिला देशविदेशातही जावं लागतं. रचनानं स्वतःचं यश स्वतः पुरतंच ठेवलं नाहीय. ती नियमित समाज कार्य करते. पण समाजसेवेची जाहिरात करत नाही. करू इच्छितही नाही. रचनाचा भाऊ प्रफुल्ल बीएससी असून स्वतंत्र व्यवसाय करतो. बहिण स्नेहा सुरत इथं व्हेटर्नरी सर्जन आहे. एमबीएतील सहध्यायी कमलेशबरोबर रचनाचा प्रेमविवाह झाला.कमलेश खाजगी बँकेत उच्च पदस्थ आहे. कन्या काव्या सध्या शिकतेय. सामान्य परिस्थिती, सामान्य शैक्षणिक पात्रता असणाऱ्या सामान्य रचनातून असामान्य जिद्द, चिकाटी, धाडस,परिश्रम या जोरावर असामान्य नवी रचना घडलीय.

कमी गुणांमुळे कुणी नाउमेद होऊ नये. नापास झाल्यानंतरही नाउमेद होऊ नये. केवळ मुलीमुलंच नाही, त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी रचनाच्या यशातून हा बोध घेतला पाहिजे. गेलेल्या क्षणांपेक्षा येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. त्याचं आपण सार्थक केलं पाहिजे. रचना, अशीच पुढे जात रहा, मागच्याना सोबत घेऊन ! तुझ्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

-देवेंद्र भुजबळ

+91 9869484800

Email: devendrabhujbal4760@gmail.com

Updated : 3 May 2020 10:14 AM GMT
Next Story
Share it
Top