Home > Max Woman Blog > पाणीवाली रणरागिणी!

पाणीवाली रणरागिणी!

पाणीवाली रणरागिणी!
X

'तेल नाही तूप नाही, या सरकारला लाज नाही', ही तारसप्तकातील घोषणा कानावर पडली की बघतां बघता कर्मचारी व गृहिणी हातातील कामे सोडून रस्त्यावर यायच्या आणि मंत्रालयातील मंत्री व ज्येष्ठ अधिकारी लपण्यासाठी आसरा शोधायचे... असा तो १९६०च्या दशकातील उत्तरार्ध. त्याचे प्रभावी नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी मृणालताई गोरे यांचा आज जन्मदिन! या 'पाणीवाली बाई'च्या स्फुर्तीदायी आठवणींना श्रद्धांजली!

उंच शिडशिडीत बांधा, उन्हाने रापलेला गोरा वर्ण, घोषणा दिल्याने कायमच बसलेला आवाज, अशा मृणालताई मोर्च्यात किंवा निदर्शनात असल्या की वातावरण आपसूकच भारले जायचे.

फोटो सौज्यन्य - सोशल मीडिया

ज्या काळात धान्ये, डाळी, केरोसिन या आणि अशा जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करून व्यापारी कृत्रिम टंचाई सरकारातीलच राजकारणी व नोकरदारांच्या मदतीने करत, तेव्हा नृणालताईंचा अंक 'लाटणे मोर्चा' साऱ्यांनाच वठणीवर आणे.

त्या काळात पश्चिम उपनगरांत पाण्याची दरवर्षी जाणवत असे. अनेक वर्षांच्या उग्र आंदोलनानंतर ही परिस्थिती बदलली व मृणालताई 'पाणीवाली बाई' बनल्या. याच भांडवलावर त्या मुंबई महापालिकेत नगरसेवक, गोरेगावच्या आमदार व उत्तर मुंबईच्या खासदार बनल्या.

पण संसदीय कारकीर्दीपेक्षा रस्त्यांवरील आंदोलनांत त्यांचा जीव रमत असे. त्यामुळेच तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देऊ केलेले केंद्रीय मंत्रिपद नाकारून त्या पुन्हा रस्त्यावर उतरल्या.

२४ जून १९२८ला जन्मलेल्या मृणालताईंनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता पण ते अर्धवट सोडून त्या राष्ट्र सेवा दलाचे काम करू लागल्या. त्यांचे पती बंडू गोरे यांचे अकाली निधन झाल्यानंतर मृणालताईंनी संपूर्ण जीवनच लोकसेवेत झोकून दिले.

अशा मृणालताई वयाने थकल्या तेव्हा त्या वसईला जाऊन राहिल्या. त्यांचे वयाच्या ८४व्या वर्षी १७ जुलै २०१२ला निधन झाले.

सामान्य मुंबईकरांच्या घरगुती समस्यांसाठी लढणारी रणरागिणी कायमची निघून गेली.

भारत कुमार राऊत

Updated : 24 Jun 2020 5:47 AM GMT
Next Story
Share it
Top