तुमसे ना हो पायेगा !
X
तुमसे ना हो पायेगा अशा मथळ्याची बातमी द टेलिग्राफमध्ये काल म्हणजे दिनांक २९ मे रोजी प्रसिद्ध झाली. ही बातमी कशाच्या संदर्भात आहे म्हणून पूर्ण बातमी वाचायला घेतली. ही बातमी होती प्रा. सोनाझरीका मिन्झ यांच्या संदर्भातील.
कोण आहेत प्राध्यापक सोनाझरीका मिन्झ.
सोनाझरीका मिन्झ, सर्व प्रथम एक स्त्री... ओंराव ह्या आदिवासी जमातीतील कुटुंबात जन्माला आलेली मुलगी. जो आदिवासी समुदाय आजही आपल्या देशात मूलभूत हक्कापासून वंचित आहे. ह्या आदिवासी समाजातील सोनाझरिका... शिक्षणाची सुरवात झाली म्हणून इंग्रजी शाळेत प्रवेश घ्यायचे पालकांनी ठरवले होते. पण इंग्रजी माध्यमात आदिवासी आहे म्हणून त्यांना प्रवेश नाकारल्यामुळे हिंदी माध्यमात शाळा शिकणाऱ्या सोनाझरीका... शाळेत शिकत असताना तुला “तुला गणित जमणार नाही” असे शाळेत गणिताच्या शिक्षकांनी अपमान केल्यावर गणितातच उच्च शिक्षण घेणाऱ्या सोनाझरीका... हेच आयुष्यच चॅलेंज म्हणून स्वीकारत कॉम्प्युटर सायन्स शिकून जेएनयू मध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकणाऱ्या प्राध्यापक सोनाझरीका मिन्झ यांची झारखंडमधील मुरमु विशवविद्यालयाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली आहे.
सोनाझरीका ह्या मूळ झारखंडच्या सेंट मार्गरिटा हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण घेत असतांना तीन वेळा त्यांनी गणितात १०० % गुण मिळवले होते. पदवीचे शिक्षण वुमन ख्रिश्चन कॉलेज, चेन्नईमध्ये पूर्ण करून गणित विषयातून एम.एससी. चे मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर १९८६मध्ये जेएनयूमधून कम्प्युटर सायन्स विषयात प्रावीण्य मिळवले. भोपाळ, मदुरई येथे काही काळ नोकरी केल्यानंतर १९९२ साली जेएनयूमध्ये गणित आणि कम्प्युटर सायन्सच्या प्राध्यापक महणू कार्यरत झाल्या. या काळात नॉर्थईस्टमधून दिल्लीत शिक्षणासाठी येणार्या अनेक विद्यार्थाच्या लोकल गार्डियन म्हणून विद्यार्थ्यासाठी मदत करत राहिल्या. २०१८-१९ मध्ये जेएनयू च्या शिक्षण संघटनेच्या अध्यक्ष म्हणून काम करत असतांना जेएनयूमध्ये ऑनलाइन प्रवेश परीक्षा,सक्तीची उपस्थिती अशा मुद्द्यावर आंदोलन सुरू झाले होते. हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी जेएनयूमध्ये सैन्य बळ बोलवण्यात आले होते. याच काळात जानेवारी महिन्यात त्याच्या वर काही लोकांनी दगडफेक केली ज्यात त्या जखमी झाल्या होत्या. एकंदरीत त्याचा जीवनप्रवास संघर्षाची एकएक पायरी चढत यशाची शिखर गाठत राहिला... गुरुवारी सोनाझरीका मिन्झ यांची झारखंडमधील मुरमु विशवविद्यालयाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्याची सूचना त्यांना झारखंड राजभावनातून मिळाली. यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलत असतांना त्यांना ‘तुमसे ना हो पायेगा’ हे म्हणणारे शिक्षकाचे शब्द जसेच्या तसे आठवतात असे सांगितले.
खरतर ही सर्व बातमी वाचत असतांना मला आपल्या राज्यातील आणि देशातील पहिल्या फायर फायटर हर्षिणी कान्हेकर नजरेसमोर आल्या. कारण हर्षिणीला फायर फायटर कॉलेजमध्ये मुली शिकत नाही म्हणून प्रवेश घेतांना अडचणीचा सामना करावा लागला होता. आज हर्षिणीच्या सुरुवातीमुळे देशात मुलीसाठी फायर फायटरचे शिक्षण सुरू झाले. तसेच फायरमन ह्या शब्दप्रयोगाला रीतसर आता फायर पर्सन हा शब्दप्रयोग केला जात आहे. हे हर्षिणी यांच्या संघर्षाचे फळ आहे.
आपल्या देशात मुलीसाठी शिक्षणाचे दार उघडले गेले ते , क्रांती जोती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या योगदानामुळे. देशात समान संधीचा हक्क प्राप्त झाला तो भारतीय राज्यघटनेमुळे. हे सगळे खरे असले तरी आजही मुलींना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतोच. मुलींसाठीचा हा संघर्ष केवळ कुटुंबातून नाहीये तर तो समाजातील जातीव्यवस्थेशी सुद्धा आहे. तसाच हा संघर्ष येथे होणार्या शिक्षणाच्या बाजरीकरणाशी सुद्धा आहे. तुम्ही एका विशिष्ट जातीतून आहात म्हणून आजही अवहेलना, अपमान, अमानुष छळ अल्पसंख्याक जाती जमातीतील मुलामुलींना सोसावा लागतो आहे. ही सगळी मुल-मुली जोपर्यंत शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येत नाही तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. ही पिढी खर्या अर्थाने २१ व्या शतकातील भारत घडवतील.
सोनाझरीका मिन्झ यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
संदर्भ- https://www.telegraphindia.com/india/how-a-put-down-propelled-an-oraon-tribeswoman-to-become-vice-chancellor-of-dumka-varsity/cid/1776777?fbclid=IwAR11ewSix1kCdc6T64dIfiggqS9RSoNGHJB_OZnEzgD4StmY8I89YF5nosc
-रेणुका कड