Home > पर्सनॅलिटी > आयएएस अधिकारी निधी चौधरी यांची EXCLUSIVE मुलाखत

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांची EXCLUSIVE मुलाखत

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांची EXCLUSIVE मुलाखत
X

म.गांधींविषयी निधी चौधरी यांनी उपहासात्मक ट्विट केलं. त्यामागची भूमिका न समजून घेताच काहींनी त्यांना ट्रोल केलं. मुंबई महापालिकेत सह आयुक्त असणाऱ्या निधी यांची राज्य सरकारनं मंत्रालयातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात तात्काळ बदली केली. निधी यांनी १७ मे रोजी ते ट्विट केलं होतं, त्यावर वादंग निर्माण व्हायला सुरूवात झाली ती ३१ मे पासून...या संपूर्ण प्रकरणात निधी यांना आलेल्या अनुभवाविषयी मॅक्सवुमनच्या टीमनं त्यांची EXCLUSIVE मुलाखत घेतली.

प्रश्न-

  • थँक्यू गोडसे असं तुम्ही म्हणालात ज्यावरून गोंधळ झाला, तुमची असं म्हणण्यामागे काय भावना होती?

उत्तर-

हा वाद सुरू झाला तेव्हाच मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. हा एक उपहास होता ज्याचा विपर्यास करण्यात आला. माझ्या स्पष्टीकरणानंतरही लोकांनी, राजकीय नेत्यांनी आणि मीडियाने मला गोडसेवादी ठरवलं. या वादानं मी प्रचंड व्यथित झाले. मी माझ्या भावना एका फेसबूक पोस्टद्वारे मांडल्या आहेत.

(निधी चौधरी यांची कविता... खालील लिंक वर क्लिक करा)

कारवाईनंतर निधी चौधरी यांची पहिली कविता

मी अपेक्षा करते की माझी ही कविता तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट करत आहे.

प्रश्न-

  • तुमच्या सोशल मिडीयावर गांधी, आंबेडकर यांच्यासोबत श्रीराम अशा पोस्ट दिसतात. यावरून गोंधळ झाला का विरोधी पक्षाचा?

उत्तर-

मी अनेक स्वातंत्र्य सैनिकांवर लिहित असते. घटनेच्या कलम 51 नुसार स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी सहभाग घेऊन योगदान दिलं, त्यांच्यावर लिहिणे हे माझं कर्तव्यच आहे. एक नागरिक म्हणून हा माझा मुलभूत अधिकार आहे, की गांधीचे विचार सांगणे, बाबासाहेब आंबेडकरांविषयी सन्मान ठेवणे, सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा सांगणे, आणि मी ते करतच राहणार. तो पर्यंत लिहित राहणार जो पर्यंत माझे ट्विटस व्यवस्थित समजून घेतले जाणार नाहीत. ज्यामुळे हा वाद उद्भवला तो म्हणजे मोठा टोमणाच होता, जो अनेकांना समजलाच नाही. मुळात ते ट्विट 17 मे ला पोस्ट केलं, मात्र त्यानंतर 31 मे रोजी अचानक त्यावर वादंग का उठलं, हे माझ्यासाठी अनाकलनीय होतं.

प्रश्न-

  • नथुराम गोडसेचं उदात्तीकरण सुरू आहे असं वाटतं का तुम्हाला?

उत्तर-

यावर्षी 30 जानेवारीला कुणीतरी गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या घातल्या आणि ते फोटो, व्हिडिओ, ट्विट करण्यात आले. याविरोधात मी ट्विट केलं. शहीद दिनाला असा प्रकार होणं हेच दुर्देवी होतं. मी गांधींविषयी सातत्यानं सोशल मीडियावर लिखाण करते. त्यामुळं मला ट्रोल केलं जातं. मी तरीही त्यांच्या मतांचा आजवर आदरच करत आलीय. ते ट्विट मी 17 मेला पोस्ट केलं त्यावेळी अनेकांनी त्यावर गोडसेच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्यानंतर मला धक्काच बसला. शेवटी काहीही असो भारत आणि संपूर्ण जग यावर्षी गांधीची 150 वी जयंती साजरी करतोय. त्या प्रतिक्रियांमुळे मला प्रचंड वेदना झाल्या. हे सर्व ट्विट वरील एक follower @sidvaach याच्याशी केलेल्या संवादातून स्पष्ट झालंय.

प्रश्न-

  • गांधीजींची मुल्ये तुम्हाला अशावेळी आधार देतात का ?

उत्तर-

मी लहानपणापासूनच गांधी विचारांचं अनुकरण करते. ते माझ्या आयुष्याचा मोठा आधार आहेत.

प्रश्न-

  • तुमच्या कवितेत तुम्ही एकाचवेळी उद्वीग्न आणि भावनिक पण झालेल्या दिसताय. तुमच्या लहान बाळाचं ही उदाहरण तुम्ही दिलंय. दूध आणि अश्रू मिक्स झालेयत असं ही तुम्ही म्हटलंय.. नेमकं काय वाटतंय तुम्हाला या क्षणी?

उत्तर-

गेल्यावर्षी मी 11 ऑक्टोबरला मुलाला जन्म दिला. तो आता फक्त सात महिन्यांचा आहे. भारत सरकरच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक बाळाला 6 महिने आईचं दूध मिळालचं पाहिजे, त्यानंतरच्या सहा महिन्यानंतरही ते मिळालं पाहिजे. सहा महिन्यांच्या प्रसुती रजेनंतर मी पुन्हा कामावर परतले. तरीही मी सकाळी, संध्याकाळी, रात्री बाळाला दूध पाजायचेच या वादामुळं मला खूप त्रास झाला. त्याचा परिणाम माझ्या मुलाचा हक्क असलेल्या स्तनपानावरही झाला. स्तनदा मातांसाठी कुठल्याही प्रकारच टेन्शन हे हानिकारक असल्याचं वैद्यकीय सल्लागारांचं म्हणणं आहे. हे सध्या मी अनुभवतेय, जे मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या मातृत्वाला त्रास देण्याचा कुणालाही अधिकार नाही. ज्यांनी हा वाद निर्माण केला, त्यांच्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या आहेत. आई म्हणून मी भावनिक झाले असले तरी माझ्या बाळासाठी मी जगाशी लढणारच.

प्रश्न-

  • ज्यांनी तुमच्यावर आरोप केले त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ आहेत असं मानलं जातं, तरी त्यांनी तुमच्यावर हल्ला केला याबद्दल काय वाटतं. तुम्ही त्यांना माफ कराल का?

उत्तर-

मी देवाजळ प्रार्थना करेल की त्यांनी मी लिहिलेल्या पोस्टचा खरा अर्थ समजून घ्यावा. त्यांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांनी स्वत:कबुली द्यावी आणि माझी प्रतिमा मलीन केल्याचीही कबुली द्यावी, यासाठी मी प्रार्थना करेन.

प्रश्न-

  • सरकारने तुमच्यावर कारवाई केली यावर तुमची काय प्रतिक्रिया...

उत्तर-

सरकारने मला खुलासा मागितला मी तो दिला. नंतर हा खुलासा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सार्वजनिक झाला. खुलासा मागणंही शासकीय प्रक्रिया आहे, मी माझा खुलासा वेळेत सादर केला.

(निधी चौधरी यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर करा क्लिक)

गांधी, निधी आणि गैरसमज...

(मॅक्सवुमनचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Updated : 10 Jun 2019 8:31 AM GMT
Next Story
Share it
Top