Home > पर्सनॅलिटी > विजेच्या खांबावर सरसर चढणारी 'बिजली' उषा जगदाळे

विजेच्या खांबावर सरसर चढणारी 'बिजली' उषा जगदाळे

विजेच्या खांबावर सरसर चढणारी बिजली उषा जगदाळे
X

टाळ्यांचा कडकडाट.... आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराच्या मानकरी आहेत. महावितरणच्या उषा जगदाळे... (कोरोना काळातील योध्दा )

तीन एकर कोरडवाहू शेती... दुष्काळी भाग... घरी आई... पत्नी, दोन मुली व लहान मुलगा अशी संपदा असणारे भाऊसाहेब जगदाळे! कष्टाचा पिंड... निसर्गावर विसंबलेली शेत... कधी भरभरून देणारी धरणी तर कधी अर्धपोटी देखील राहायला शिकवणारी... शेतकरी नावाचा शेला घातला की, "जगाचा पोशिंदा "अशी उपाधी मिळते.

परंतु म्हणतात ना...

'गवंड्याचे घर पडके असते' तशी शेतकऱ्याची स्थिती असते. त्याच्या झळा कुटुंबातील लेकराबाळांनाही सोसाव्या लागतात.

थोरली कन्या उषा भाऊसाहेब जगदाळे आस्तेकदम...

नाव फार जोखमीचे आहे बरं का... होय,, शेतकरी कुटुंबात निपजलेलं हे कन्यारत्न "महाराष्ट्र गौरव" पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.

शालेय जीवनात प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा देवी गव्हाण. तालुका-आष्टी, जिल्हा-बीड येथे पूर्ण करत असताना उषाच्या अंगी असणाऱ्या मैदानी, खेळाडू वृत्तीची दखल संजय सोले सर यांनी घेत तिला प्रोत्साहन दिले. पुढे माध्यमिक शिक्षणात इयत्ता पाचवीपासून विष्णू आदनाक सरांनी खेळ कौशल्यांची जोपासना करीत विविध स्पर्धांची तयारी केली .

उषाच्या अंगी असणाऱ्या साहस, धैर्य, चिकाटी, उत्तम खिलाडूवृत्ती खो-खो पटू ची ओळख महाराष्ट्राला व्हावी. या करिता शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. उषानेही मिळालेल्या हर एक संधीचे सोने केले. तब्बल अकरा सुवर्णपदक! होय गोल्ड मेडल नॅशनल लेव्हल-राष्ट्रीय पातळीवर उषाने मिळविली. हिमाचल प्रदेश, पंजाब, पटियाला, जालंदर, इंदोर, हैदराबाद असा या पदकांचा प्रवास करताना राज्यस्तरीय महाराष्ट्र टीमचा कर्णधार होण्याचाही मान मिळविला आहे.

घरच्या एकूण परिस्थितीने शिकस्त दिल्याने उषाची पुढील शिक्षणाची वाट धूसर झाली. त्याच तालुक्यातील तवलवाडीच्या भारत सूर्यभान केरूळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर उषाने सासरीही असणारा शेतीचा वारसा जपला.

सासू-सासरे यांच्यासह सर्वांशी प्रेमाने वागत माहेराहून आणलेल्या संस्कार शिदोरी च्या जीवावर संसार फुलवत नेला. पतीच्या दुग्ध व्यवसायातही ती खांद्याला खांदा देऊन साथ देते. एकदा बँकेत नोकरीचा अर्ज करण्यासाठी तिथे उषा गेली असता महावितरणची जाहिरात वाचली.

अर्ज केला... 2013 साली खेळाडू कोट्यातून तिची निवड महावितरणमध्ये "तंत्रज्ञ" म्हणून झाली. खरंतर महावितरण म्हणजे काय? हे देखील तेव्हा तिला ठाऊक नव्हते. परंतु कोणत्याही परिस्थतीशी खुबीने दोन हात करण्याची कला तिला अवगत होती.

तदनंतर लातूरला एक वर्ष ट्रेनिंग पूर्ण करून कडा, तालुका आष्टी या गावी उषा ची नियुक्ती तंत्रज्ञ म्हणून झाली.

युनिट ऑफिसला काम करताना एक महिला असूनही कार्यालयीन पोस्टिंग मागण्याचा प्रयत्न तिने कधीही केला नाही. महिलांनी जरी सर्व प्रांतात आपला हात दाखविला असला तरी हे क्षेत्र महिलांसाठी केवळ कार्यालयीन न राहता फिल्ड वर्कमध्ये ही कुठे महिला कमी नाहीत. याचे उदाहरण उषाने घालून दिले.

एकदा राजेंद्र जैन यांच्या वसुलीची रक्कम न आल्याने त्यांची वीज लाईन बंद करण्यासाठी उषा खांबावर चढली होती. ते मिसेस जैन यांनी पाहिले. त्या पती राजेश जैन यांना सांगू लागल्या. कोणी तरी महिला खांबावर चढून आपली लाईट कापत आहे. राजेश यांना विश्वास च बसत नव्हता.

कोणी स्त्री लाईटच्या पोलवर कशी चढेल? शक्यच नाही... पण त्यांनी पाहिले तर ही गोष्ट खरी होती. त्याना उषाच्या धाडसाचे कौतुक वाटले त्यांनी कॅमेरा आणला फोटो काढले आणि ह्या हिरकणी ची बातमी तयार करून पेपर ला दिली.

ते स्वतः पत्रकार होते. त्यांच्या घराची वीज तोडण्यासाठी उषा आलेली असूनही उषाच्या साहसाची कथा त्यांनी शब्दबद्ध केली. तत्कालीन कलेक्टर साहेब नवलकिशोर राम यांच्या हस्ते जैन सरांना लेखणी सम्राट हा किताब देण्यात आला.

महावितरणच्या या वाघिणीने अवघ्या सहा महिन्यातच लाईन टाकणे, खांबावर चढणे, जनित्र दुरुस्ती करणे, अशी कामे शिकून घेतली. आपले काम हे ऑफिशियल नसून फिल्ड वरील आहे. हे जाणून आपल्या जबाबदारी व कर्तव्याचे भान ठेवून उषाने स्वतःला समृद्ध केले. महावितरणची दामिनी, बिजली गर्ल, हिरकणी अशी बिरुदं तिने मिळवली आहेत.

कोरोनाच्या महासंकट काळामध्ये अकल्पित स्थितीत जेव्हा कडक लॉक डाऊन व सोबत तीव्र उन्हाळा... त्यात बीड चे तापमान 42 डिग्री वर वर असताना सर्वजण घरात सुरक्षित होते. यावेळी रस्त्यावर बाहेर दिसले. तरी पोलिसांचा दंडुका पडत असे. या तापमानात आपण विना वीज काही मिनिटेही राहू शकत नव्हतो. अगदी अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला तर जीवाची घालमेल होई.. बाहेर कोरोनाची भयावहता... "वर्क फ्रॉम होम" असल्यानेही विजेवर अवलंबित्व होते.

हा वीज पुरवठा सुरळीत रहावा. म्हणून महावितरणचे कर्मचारी सेवा देत होते. उषाने एकही दिवस सुट्टी न घेता वेळप्रसंगी भरदुपारी बारा वाजता उन्हाच्या झळामध्ये पोल वर चढून आपले कर्तव्य बजावले.

वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवला. ग्राहक तक्रार निवारण केंद्राची कामे ही अखंडीत पणे केली. स्त्रियांच्या चौकटीतील सर्व जबाबदाऱ्या पेलून शिवाय घरी दोन जुळी मुले, सासू-सासरे, पती, घरची जित्राबं... सर्वांच्या सह आपल्या नोकरीतील पदभाराचा ठसा प्रबळपणे उमटविणारी अशीही महावितरणची वाघीण खरी कोरोना काळातील देवदूत आहे. जेव्हा आपण सारे लॉकडाऊन मध्ये घरी सुरक्षित होतो.

तेव्हा दूध, भाजी, किराणा, पाणी लाईट, दवाखाने या जीवनावश्यक सेवा विनाखंड उपभोगत होतो. तेव्हा कुठेतरी उषा आपल्या सर्वांना ही सेवा देताना स्वतःचा जीव एका पायावर तोलत विजेच्या खांबावर चढून कर्तव्य पार पाडत होती.

सध्या उषा प्रमोशन ने वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून आष्टी -वाकी ग्रामीण येथे कार्यरत आहे. उषाला आजवर अनेक सन्मान मिळाले आहेत. आमदार नीलम ताई गोऱ्हे यांनी मुंबईला बोलावून घेतले. सत्कार करीत तिचे कौतुक केले.

लोकमत सखी मंचने सन्मान केला. महावितरणचे मुख्य अभियंता यांच्या हस्ते ही प्रजासत्ताकदिनी सन्मानित केले गेले आहे. अशी महावितरणच्या हिरकणी ची कहाणी सुफळ संपूर्ण !

  • अतुल माने

Updated : 8 Aug 2020 12:25 PM IST
Next Story
Share it
Top