Home > पर्सनॅलिटी > महाशक्ती : अंजुची धडाडी

महाशक्ती : अंजुची धडाडी

महाशक्ती : अंजुची धडाडी
X

अंजूचं मनोगत..

माझे बाबा 15 मार्चला सकाळी 6 च्या आसपास नागपूर येथे मरण पावले. मी 15 मार्चला नवी दिल्लीतून विमानाने नागपूरला आली. सर्व विधी आटोपून आम्ही शनिवारी 21 मार्चला अमरावतीला माझ्या जाऊकडे आलो. त्यात 22ला जनता संचारबंदी होती. 24 पासून देशभर लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही अमरावती येथेच अडकलो. अशात लहान मुलीची, 10 महिन्याची बोधी हिची प्रकृती बिघडली . त्यात एक आठवडा गेला. एकीकडे जाऊ बाईकडे सर्व कामे त्या स्वतः करतात. मला मागील 14-15 वर्षांपासून फारशी कामाची सवय नाही. इथे सकाळी घरची स्वच्छता म्हणजे झाडू पोछा, स्वयंपाकाची भांडी, स्वतःचे, दोन मुलींचे, पुतनीचे, जाऊबाईचे कपडे धुणे, कधी चादर, कधी बेडशीट आलीच, नंतर स्वयंपाकात मदत असं करतेय. 30 पासून अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयात लॉक डाऊनसंपेपर्यंत रुजू झाली. अशी सर्व कामे करून ऑफिसमध्ये जाते. कार्यालयातून आल्यावर पुन्हा स्वयंपाक, बाळांना संभाळणे हे सर्व करताना थकवा जाणवतो. मात्र आईला लहानपणी घरकामांना केलली मदत, आजीच्या घरी बालपणी सुट्ट्यामध्यें जे शकली ते आता खूप कामात येतंय. मला ती सर्व कामे अगदी सुरळीत करता येतात ,हे पुन्हा अनुभवत असल्यामूळे आत्मविश्वास वाढलाय. कार्यालयात ज्या विश्वासाने मी अधिकारी पद निभावतेय त्याच विश्वासाने लॉक डॉउनच्या काळात घरची कामेही सहज पणे करतेय,याचा खूप आनंद आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्र येथे माहिती अधिकारी म्हणून अंजु कांबळे निमसरकर कार्यरत आहेत. जगभर कोरोनाने वातावरण भयग्रस्त केले. सरकारी यंत्रणा दिवसरात्र काम करू लागल्या. अशातच त्यांच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झालं. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. १५ मार्च२०२० रोजी त्या अमरावती येथे आल्या. सर्व धार्मिक विधी आटोपून, रजेवरून परत दिल्ली येथील कार्यालयात रुजू होण्यापूर्वीच भारत भर २४ मार्च २०२० पासून २१ दिवसांसाठी लॉक डॉउन झाले. साहजिकच त्या अमरावती येथून दिल्ली येथे जाऊ शकल्या नाहीत. देशात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असताना कर्तव्यदक्ष अंजुला घरी रिकामं बसणं शक्यच नव्हतं. तसंच झालं. घरून म्हणजे अमरावतीच्या घरात बसून ती तिचं शासकीय कामकाज करण्याची परवानगी मागितली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने लगेच तिला तशी परवानगी दिली. आता घरी बसून शासकीय कामकाज करणारी अंजु सर्व घरकाम ही करत आहे. अशी ही अंजूची धडाडी...

महाराष्ट्र शासनानाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात, मंत्रालय, मुंबई येथे २००३ ते २००८ असा मी कार्यरत होतो. दरवर्षी विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे जाणे, रहाणे होई. खूप जण भेटत, खूप ओळखी होत. अशाच एका अधिवेशनात त्यावेळी पत्रकार असलेल्या अंजु कांबळेची ओळख झाली. लहानचणीची ही मुलगी पत्रकार म्हणून इतक्या आत्मविश्वासाने वावरते, हे पाहून मला तिचं कौतुक वाटायला लागलं. पुढे तिच्या गुणवत्तेवर ती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उपसंपादक म्हणून निवडल्या गेली. तिची नेमणूक मंत्रालयात झाली. पत्रकार अंजु आमची सहकारी झाली !

अंजुच्या धडाडीच्या वाटचालीचा मी एक साक्षीदार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, नोकऱ्या करत अंजुने एम ए, राज्यशास्त्र, लोक प्रशासन,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, पत्रकारिता पदवी संपादन केली.

बारावीत वाणिज्य शाखेत ती १९९८ साली नागपूर जिल्ह्यातुन गुणवत्ता यादीत आठव्या क्रमांकावर आली !

घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे टेलिफोन बुथवर दरमहा ५०० रुपये महिन्याने तिने काम केले काम केले. सेल्स गर्ल म्हणून देखील ५०रु रोजाने तिने काही काळ काम केले.

त्यानंतर गांधीबागेतील पंजाब मशीन टूल्स या दुकानात ३ वर्षं काम केले. त्या सोबत पदवी अभ्यासक्रम, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भोपाळच्या नागपूर केंद्रामधून तिने पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमानन्तर तिने तिच्या आवडीच्या माध्यम क्षेत्रात प्रवेश केला. दैनिक पार्लमेंट,वृत्तरत्न सम्राट (नागपूर प्रतिनिधी) दैनिक भास्कर, सामाजिक समीकरण (मासिक) येथे पत्रकार म्हणून काम केले.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात प्रचंड स्पर्धेत ती उपसंपादक म्हणून निवडल्या गेली. महासंचालनालयात ती १ जुलै २००८ रोजी ती मुंबईत रुजू झाली. पुढे मुंबईतुन तिची बदली नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परियच केंद्रात झाली. महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत काम करणारी अंजु देशाच्या राजधानीत पोहोचली. तिथेच तिला पदोन्नती मिळून ती माहिती अधिकारी झाली. आजही ती तिथे कार्यरत आहे. दरम्यान तिचा विवाह होऊन ती अंजु कांबळेची अंजु निवसरकर झाली. अंजुने स्वतःला केवळ घरदार, नोकरी पुरतेच मर्यादित ठेवले नाही. स्वतः ज्या परिस्थितीतुन ती गेली, तिची जाण तिने ठेवली.

दिल्लीत गली पाठशाला या स्वयंसेवी संस्थेबरोबर ती काम करतेय. ही संस्था झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना मोफत शिकवणी देते, शाळा सोडाव्या लागलेल्या मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश घेण्यास प्रोत्साहन देत असते. अखिल भारतीय सिद्धार्थ कल्याण या सामाजिक संस्थेचीही ती सदस्य आहे . याशिवाय विविध प्रेरणादायी व्यक्ती, संस्था, उपक्रम यावर ती सातत्याने लिहीत असते. नागपूर-मुंबई-दिल्ली असा तिचा सुवर्ण त्रिकोण आहे. तिच्या प्रशंसनीय कामाची दखल घेऊन तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आताच्या कठीण परिस्थितीत स्वतःचं कधीही भरून न येणारं वडिलांच्या वियोगाचं दुःख विसरून ती निर्माण झालेल्या आव्हानाचा स्वतःच्या परीने समर्थपणे सामना करत आहे. अंजु, तु नक्कीच जिंकशील, असा सार्थ विश्वास आहे. तुझी पुढची वाटचाल अशीच गतिमान ठेव. तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

शब्दांकन: देवेंद्र भुजबळ.

+91 9869484800

Email: devendrabhujbal4760@gmail.com

Updated : 10 April 2020 1:11 AM GMT
Next Story
Share it
Top