Home > पर्सनॅलिटी > शिवाजी महाराजांचे गड किल्ले सर करता करता कस्तूरीने एव्हरेस्ट सर केला

शिवाजी महाराजांचे गड किल्ले सर करता करता कस्तूरीने एव्हरेस्ट सर केला

पालकांनी आपल्या मुलींना संधी दिली, योग्य मार्गदर्शन केलं तर त्या आभाळात भरारी घेऊ शकतात हे आणखी एका महाराष्ट्र कन्येनं करून दाखवलं आहे. त्यासाठी त्यांना बाकी काही नाही तर फक्त भक्कम पाठबळ आणि आशिर्वाद हवे असतात. कोल्हापूरच्या कस्तुरीने असाच भीमपराक्रम करून दाखवला आहे. अवघ्या २० व्या वर्षी तिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करत तिरंगा फडकवला आहे.

शिवाजी महाराजांचे गड किल्ले सर करता करता कस्तूरीने एव्हरेस्ट सर केला
X

वडिलांचा चारचाकी मेकॅनिकचा व्यवसाय... घरची परिस्थिती बेताची.. आपल्या सर्व गरजा बाजूला सारून आई वडिलांनी कस्तुरीच्या कलागुणांना प्राधान्य देत लहानाचं मोठं केलं आणि हाच पाया कस्तुरीच्या आयुष्यात भरभक्कम ठरला... आणि याच भक्कम पायावर कस्तुरीने जिद्दीने एव्हरेस्ट शिखर सर केलं.

ट्रेकिंग क्षेत्रात कस्तुरीचं पहिलं पाऊल २००४ मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षी पडलं. पावनखिंडीच्या पावसाळी मोहिमेत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत तिचं मार्गक्रमण सुरू झालं. तिच्यामध्ये एव्हरेस्टची जिद्द निर्माण करणारी शिवछत्रपतींची हीच भूमी होती. तिने शिवराष्ट्र संस्थेबरोबर पावनखिंडबरोबरच गगनबावडा- दाजीपूर, वासोटा, राजगडसह इतर मोहिमा केल्या. खडतर आणि आव्हानांना तोंड देण्याचं तिच्यात सामर्थ्य निर्माण झालं. पुढे तिने अलंग- कुलंग-मलंग हे अतिअवघड किल्ले सर केले आणि तिने वडिलांना प्रश्न विचारला यापेक्षा खडतर कोणती मोहीम आहे? त्यावर वडिलांनी, एव्हरेस्ट शिखर असल्याचे सांगितले. आणि तेथून पुढे एव्हरेस्टचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी कस्तुरीचा प्रवास सुरू झाला.

वडील दीपक व आई मनस्विनी यांनी एव्हरेस्टच्या मोहिमेच्या दृष्टीने तयारी सुरू केली. नववीमध्ये असताना कस्तुरीने एनसीसीच्या माध्यमातून हिमालयातील बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स केला. तिला त्यामध्ये तीन गोल्ड मेडल मिळाले. त्यानंतर तिने माऊंट मेरा पिक सर केला. मेरा पिक ही तिच्या आयुष्यातील एव्हरेट शिखरची चाचणी होती. यातील यशपाहून तिच्या वडिलांनी एव्हरेस्टच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. मात्र एव्हरेस्टचा ४९ लाख रुपयांचा खर्च पेलणे त्यांच्यासमोर आव्हान होते. साधे मेकॅनिक असूनही समाजातून ही मदतमगोळा करण्यासाठी त्यांनी जिद्द बाळगली.

प्रत्येक शाळेत, उद्योजकांकडे जाऊन त्यांनी २०२१ मध्ये पै पै उभे केले. यादरम्यान वडिलांनी पत्नीचे दागिने ठेवून १५ लाख रुपये राहिलेले भागवले. मात्र खराब हवामानामुळे कस्तुरीला एव्हरेस्ट मोहीम निम्म्यावर सोडून परतावे लागले होते. पुन्हा पुढील वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा चंग बांधून कस्तुरी करवीर नगरीत परतली. त्यानंतर तिने करवीर हायकर्सच्या माध्यमातून मनस्लू, अन्नपूर्णा ही खडतर आणि अतिअवघड शिखरे सर करून आपली जिद्द दाखविली.

कस्तुरीची एव्हरेस्ट चढाईची मोहीम समोर असतानाच इकडं कोल्हापुरात वडील दीपक सावेकर पैशांचा एव्हरेस्ट उभा करण्यासाठी रात्रंदिवस धडपडत होते. मात्र, उर्वरित २० लाख रुपयांचा शिखर पार करण्यात त्यांना अपयश आलं. त्यातून त्यांनी उसनवारीवर पैसे भागवले आणि कस्तुरीने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करून दाखवलं. तिच्या जिद्दीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. आवाहन इतकंच की, तिच्या वडिलांवरचा कर्जाचा बोजा पूर्णपणे कमी व्हावा आणि कस्तुरीच्या पुढील शिखरांच्या मोहिमांना बळ मिळवलं.

Updated : 15 May 2022 4:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top