Home > News > महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकावाच लागणार ; तालिबानचा महिलांसाठी जाचक नियम

महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकावाच लागणार ; तालिबानचा महिलांसाठी जाचक नियम

महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकावाच लागणार ; तालिबानचा महिलांसाठी जाचक नियम
X

तालिबानने शनिवारी महिलांसाठी नवा नियम जारी केला आहे. महिलांना आता सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालावा लागणार आहे. जर महिलेने घराबाहेर जाताना तोंड झाकले नाही तर तिच्या वडिलांना किंवा जवळच्या पुरुष नातेवाईकाला तुरुंगात टाकले जाईल किंवा सरकारी सेवेतून हाकलून दिले जाईल असा फतवा तालिबनाने काढला आहे.

तालिबानच्या एका प्रवक्त्याने काबूलमधील पत्रकार परिषदेत तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांचा हा आदेश वाचून दाखवला आहे. चेहरा झाकण्यासाठी निळ्या रंगाचा बुरखा सर्वोत्तम असेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा निळा बुरखा 1996 ते 2001 दरम्यान जगभरातील तालिबानच्या क्रूर राजवटीचे प्रतीक बनला होता.

मुलींना शाळेत जाण्यास बंदी

ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने प्रथम शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना शाळेत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. काही काळानंतर तालिबाननेही माध्यमिक शाळा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली, परंतु त्यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली आहे.

मुला-मुलींना एकत्र शिकण्याची परवानगी नाही

अफगाणिस्तानच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने दोन आठवड्यांपूर्वी मुला-मुलींना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकण्यास बंदी घातली होती. तालिबानच्या आदेशानुसार आठवड्यातून तीन दिवस फक्त मुलीच कॉलेज कॅम्पसमध्ये अभ्यासासाठी जातील. या काळात या कॅम्पसमध्ये मुलांचा कोणताही वर्ग घेतला जाणार नाही. पुढील तीन दिवस मुलांच्या वर्गासाठी राखीव असतील. यावेळी कॅम्पसमध्ये मुलींची उपस्थिती राहणार नाही.

विमानाने एकट्याने प्रवास करण्यास बंदी

मार्चमध्ये तालिबानने महिलांच्या एकट्याने विमान प्रवासावर बंदी घातली होती. तालिबानने लागू केलेल्या या आदेशात महिलांना पुरुषाच्या (पालक किंवा पती) उपस्थितीतच विमानाने प्रवास करण्याची परवानगी असेल, असे म्हटले होते.

महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यावर बंदी

काही दिवसांपूर्वी, अफगाणिस्तानातील हेरात शहरातील तालिबान अधिकार्‍यांनी सर्व ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूटमधील महिलांना परवाने न देण्याचे फर्मान काढले. हेरात शहरात गाडी चालवणाऱ्या महिलांची संख्या आधीच कमी होती. ज्या महिला आधीच वाहन चालवत होत्या, आता त्यांच्याकडून हा अधिकारही हिरावून घेतला जात आहे.

Updated : 8 May 2022 1:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top