Home > News > पाणी टंचाईने घेतला एकाच कुटूंबातील पाच जणांचा बळी

पाणी टंचाईने घेतला एकाच कुटूंबातील पाच जणांचा बळी

पाणी टंचाईने घेतला एकाच कुटूंबातील पाच जणांचा बळी
X

महाराष्ट्र कितीही प्रगत झाला असं आपण म्हणत असलो, तरीही या प्रगत महाराष्ट्रात आजही अनेक गंभीर समस्या आहेत. अनेक भागातील लोकांना आपल्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी झगडावे लागत आहे. आज कितीही आधुनिक महाराष्ट्राच्या किंवा आतापर्यंत केलेल्या प्रगतीच्या गप्पा मारत असलो तरीही भेडसावत असलेल्या समस्या हेच महाराष्ट्राचं खरं वास्तव आहे. आजच जी ही घटना घडली आहे ही घटना अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी आहे. पाणीटंचाईमुळे खाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. खरंतर आजही महाराष्ट्रात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे हीच मोठी शोकांतिका आहे.

संदप गावातील खदानीत बुडून एकाच कुटूंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू

डोंबिवली जवळच असलेल्या संदप गावात खाणीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. संदप गावासह आसपासच्या देसले पाडा, भोपर आदी परिसरात पाणी टंचाई आहे. त्यामुळे या भागातील नागरिक संदप गावातील खदानी मध्ये कपडे धुण्यासाठी येत असतात. सायंकाळच्या सुमारास देसले पाडा येथील गायकवाड कुटूंबातील दोन महिला व तीन मुले या खदानीत कपडे धुण्यासाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडली. या पाच जणांमधील एक जण बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी उर्वरित चार जण पुढे आले व या प्रयत्नात पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले असुन मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपेक्षा गायकवाड (30) ,मीरा गायकवाड (55) ,मयुरेश गायकवाड (15) , मोक्ष गायकवाड (13) ,निलेश गायकवाड (15) अशी मयतांची नावे असून हे सर्व देसलेपाडा येथील राहणारे होते. त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात असून या भागातील पाणीटंचाई किती गंभीर आहे, याची दाहकता प्रकर्षाने समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून गायकवाड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Updated : 8 May 2022 2:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top