Home > News > विक्रम गोखले म्हणतात नागराज मंजुळेंसोबत काम करायला आवडेल..

विक्रम गोखले म्हणतात नागराज मंजुळेंसोबत काम करायला आवडेल..

विक्रम गोखले म्हणतात नागराज मंजुळेंसोबत काम करायला आवडेल..
X

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले अभिनेते विक्रम गोखले यांनी प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणे बंद करावे, असे आवाहन केले आहे.

कंगणा रणावतने भारत 2014 साली स्वतंत्र झाला, असे विधान केले होते. त्या विधानाचे जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केल्याने मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले होते. मात्र आता प्रेक्षकांनी भिकार सिरीयल पाहणे बंद करावे, असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले आहे. ते कल्याण येथील सुभेदार वाडा कट्टा आयोजित रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधत होते.

यावेळी बोलताना विक्रम गोखले म्हणाले की, प्रेक्षकांनी स्वतःचा चॉईस तपासून पहा, चॉईस निश्चित करा आणि त्याच्यावर बंधने घाला, असे सांगतानाच भिकार सीरियल पाहणे बंद करा, तुमचा वेळ वाया घालवू नका, असे विधान केले. तर पुढे विक्रम गोखले म्हणाले की, तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत. चांगल्याच्या मागे लागतील. त्यातून चांगले लेखक, दिग्दर्शक, नट येतील. त्यामुळे चांगला अंतर्मुख करणारे नाटक, सिनेमा, सीरियल नक्की पहा, पण भिकार सीरियल पाहू नका, असे परखड मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.

विक्रम गोखले यांनी यावेळी बोलताना प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी प्रेक्षकांच्या माथी काहीही मारले जात आहे. आज प्रसार माध्यमे पैशाच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी सांगितले. तर आज कोणताही अर्थ नसलेल्या सिरीयल घाल पाणी- घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकाच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असून हि अतिशय विदारक सत्यावर आधारित असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक केले. तर नागराज मंजुळेंसोबत काम करायला आवडेल, असे मत विक्रम गोखले यांनी यावेळी व्यक्त केले.

Updated : 31 Jan 2022 5:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top