Home > News > उद्धव ठाकरेंनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला?

उद्धव ठाकरेंनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला?

उद्धव ठाकरेंनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा का दिला?
X

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. यानंतर शिवसेनेच्या खासदारांनीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपतीपदासाठी नंदा तर्फे उभ्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देईल अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

ही घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांच्या दबावाखाली आपण हा निर्णय घेत असल्याची चर्चा चुकीची असून, हा निर्णय सर्वस्वी आपला असल्याचा दावा केला आहे. एकीकडे मोदीविरोधी राष्ट्रीय आघाडीत सामील झालेली शिवसेना विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देईल अशी शक्यता होती. पण गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांचा आग्रह पाहता उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

सोमवारी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला काही खासदार गैरहजर होते, असेही समजते आहे. याच बैठकीत खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली असल्याचे समजते आहे. शिवसेनेने यापूर्वी देखील भाजपसोबत असताना काँग्रेसच्या उमेदवार आणि महाराष्ट्राच्या कन्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसेना हा आपल्या मतानुसार निर्णय घेणार पक्ष आहे, कुणाच्या दबावाखाली निर्णय घेणाक नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी याआधी मांडली होती.

Updated : 12 July 2022 3:45 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top