Home > News > व्याघ्र गणना करायला गेलेल्या महिला वनरक्षकाचा माया वाघिणीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

व्याघ्र गणना करायला गेलेल्या महिला वनरक्षकाचा माया वाघिणीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

व्याघ्र गणना करायला गेलेल्या महिला वनरक्षकाचा माया वाघिणीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू
X

ताडोबा अभयारण्य मध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प राबवला जातो. देशभर सुरू असलेल्या व्याघ्र गण्या च्या कामासाठी जंगलात गेलेल्या महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकल्पातील माया वाघिणीच्या हल्ल्यात या महिला कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

वनरक्षकांचं काम तसं धाडसाचं असतं आणि तेच धाडस करताना अनेकदा या कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. स्वाती ढुमणे (43 वर्षे) ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काम करणाऱ्या अशाच धाडसी वनरक्षक होत्या. मात्र त्यांचा आज शनिवारी सकाळी माया या वाघिणीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर हा मृत्यू दुर्दैवी म्हणावा की, त्यांचं अतिधाडस हा प्रश्न आहे. आज सकाळी स्वाती ढुमणे या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रात कक्ष क्रमांक 97 मध्ये ट्रांझिट लाईनच्या कामासाठी आपल्या तीन सहकाऱ्यांसह पायीच जात होत्या. जात असताना त्यांच्या रस्त्यात माया वाघीण बसल्याचं त्यांना दिसलं. रस्त्याच्या एका बाजूला स्वाती ढुमणे यांचं पथक तर दुसऱ्या बाजूला पर्यटकांच्या जिप्सी यांच्या मध्ये माया वाघीण अशी परिस्थिती होती. साधारण अर्धा तास वाट बघून देखील माया आपल्या जागेवरून हलली नसल्याने पुढे जाण्यासाठी स्वाती ढुमणे यांनी रस्त्याच्या बाजूला उतरून जंगलातून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय चूकीचा ठरला आणि इथेच घात झाला.

सध्या संपूर्ण देशात दर चार वर्षांनी होणाऱ्या व्याघ्रगणना सुरु आहेत. नोव्हेंबर 2021 ते मे 2022 असं जवळजवळ आठ महिने हे काम चालणार आहे. याच व्याघ्रगणनेचा एक भाग असलेल्या ट्रांझिट लाईन सर्व्हेचं ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या काम सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक बिटमध्ये चार कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आलं आहे.

ट्रांझिट लाईन सर्व्हे हे अतिशय जोखमीचं काम आहे. कर्मचाऱ्यांना जंगलात पायी फिरून सर्व माहिती गोळा करावी लागते. जंगलात काम करतांना लहानशी चूक देखील कशी जीवघेणी ठरू शकते हे आज झालेल्या दुर्घटनेतून समोर आलं आहे. मात्र ताडोबाच्या कोर क्षेत्रात काम करताना स्वाती ढुमणे यांना पुरेशी सुरक्षा न दिल्यामुळे हा हल्ला झाल्याचा आरोप स्वाती यांच्या पतीने केला आहे.

स्वाती ढुमणे यांच्या मृत्यूमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वन कर्मचाऱ्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी देखील व्याघ्र गणनेच्या कामात काय काळजी घ्यावी यावर विचार करत आहेत. त्यामुळे ताडोबाच्या कोअर भागातील ट्रांझिट लाईन सर्व्हे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आलं आहे.

Updated : 20 Nov 2021 5:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top