Home > News > लेकरासाठी आईने क्षणभरही जीवाची पर्वा केली नाही...

लेकरासाठी आईने क्षणभरही जीवाची पर्वा केली नाही...

हिरकणी सारखी आज एक आधुनिक हिरकणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दीड महिन्याच्या बाळासाठी या आईने जे केलं ते फक्त आईच करू शकते..

लेकरासाठी आईने क्षणभरही जीवाची पर्वा केली नाही...
X

घरात तान्ह बाळ पाळण्यात झोपवून गडावर दूध विकण्यासाठी आलेली हिरकणी रात्री गडाचे दरवाजे बंद होतात आणि ती गडावरच अडकते. हिरकणीचा जीव बाळासाठी कासावीस होऊ लागतो. पहारेकऱ्यांना ती दरवाजा उघडण्यासाठी विनंती करू लागते कारण काहीही करून तिला तिच्या तान्ह्या लेकरापर्यंत पोहोचायचं असतं. पण त्याकाळी शिवाजी महाराजांची आज्ञा होती एकदा दरवाजे बंद झाले की ते दरवाजे सकाळीच उघडत असत. आपलं बाळ उठलं असेल आणि भुकेने रडत असेल या विचाराने हिरकणीचा जीव कासावीस झाला होता. तिच्या डोळ्यासमोर तिचं बाळ दिसत होतं. आपल्या बाळासाठी तिने गडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. रायगड म्हणजे काड्या, कपारी, जंगली श्वापदे असा सगळा अत्यंत अवघड असा किल्ला. पण आपल्या लेकरासाठी असा हा भयंकर किल्ला हिरकणीने रात्रीच्या अंधारात उतरला.

हात, पाय काहीही साधं घसरल जरी असतं तरी तिचा जीव गेला असता. पण तिला घरी भुकेने रडत असलेल्या तान्या बाळाचा चेहरा दिसत होता. आता हिरकणीची ही कथा सर्वांनाच माहित आहे आणि अनेक वेळा आपण आपल्या घरातील लहान मुलांना ही गोष्ट सांगत असतो. पण तुम्हाला जर मी सांगितलं की याच हिरकणी सारखी आज एक आधुनिक हिरकणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दीड महिन्याच्या बाळासाठी या आईने जे केलं त्यामुळं त्या आधुनिक हिरकरणी ठरल्या आहेत..

कितीही संकट असलं तरी आपल्या बाळासाठी आई ते अगदी सहजरीत्या अंगावरती घेऊ शकते. याचाच प्रत्यय काल घडलेल्या नाशिक मधील एका घटनेने आला आहे. चौथ्या मजल्यावरून ग्रील आणि पाईपच्या आधारे एक आई आपल्या बाळासाठी संपूर्ण जीव धोक्यात घालून उतरली आणि आपल्या बाळापर्यंत पोहोचले. तृप्ती असं या आईचं नाव आहे. तर झाला असं होतं की, तृप्ती यांचं दीड महिन्यांचा बाळ आहे. काल त्यांचे पती घरातील एका नातेवाईकांच्या साखरपुड्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी सुद्धा होती. त्यामुळे घरात आई आणि त्यांचा दीड वर्षाचं बाळ हे दोघेच होते. घरातील मुख्य दरवाजा बंद करून तृप्ती घरात काम करत होत्या. बाळाला झोळीत झोपवलं होतं. घरात आवराआवरी झाल्यानंतर त्यात कचरा टाकण्यासाठी गॅलरीत गेल्या आणि गॅलरीत गेल्यानंतर नेमकं त्याच वेळेला त्यांचा दरवाजा वाऱ्याने बंद झाला. दरवाजा आतून लॉक झाला. तृप्ती गॅलरीतच अडकल्या. बाळापर्यंत कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पती आणि मुलगी बाहेरगावी गेल्यामुळे ते लवकर येतील याची शाश्वती नव्हती. मग आईने आपला जीव धोक्यात घालून बाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट गॅलरीतून ग्रील व कडेला असलेल्या पाईपचा आधार घेत खालच्या म्हणजे तिसऱ्या मोजल्यावरील बालकनीत जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

ज्याप्रमाणे हिरकणीला कड्या -कपारीतून रायगड पार करताना आपल्या बाळाचा चेहरा दिसत होता अगदी त्याचप्रमाणे या माऊलीला चौथ्या मजल्यावरून खाली उतरताना त्यांच्या लेकराचा चेहरा दिसत होता. आणि लेकरासाठी आईने आपला जीव धोक्यात घालून तिसऱ्या मजल्यावर उतरली आणि आपल्या बाळापर्यंत पोहोचली. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेनंतर या आईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार केला पाहिजे तुम्ही घरात एकटे असाल तर अनेक वेळा दरवाजा लॉक होण्याचे प्रकार घडतात त्यामुळे अनेक वेळा अडचणींना सामोरे जावे लागत तर नेहमी काम करत असताना तुमच्या दरवाजाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा असं काही करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं

Updated : 1 Jun 2023 3:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top