Home > News > सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत वाढ किती ते पहा...

सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत वाढ किती ते पहा...

2009 ते 2019 या कालावधीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत 89 कोटी 35 लाख रूपयांची वाढ झाल्याचे एडीआर च्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत वाढ किती ते पहा...
X

2009 आणि 2019 या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या 71 खासदारांच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने प्रकाशित केलेल्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. यात सर्वाधिक वाढ ही भाजपचे खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनगी यांची झाली असून त्यांची संपत्ती या दहा वर्षात 42 टक्क्यांनी वाढली आहे.

कर्नाटकच्या बिजापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रमेश जिनाजिनगी यांची 2009 मध्ये संपत्ती ही 1 कोटी 18 लाख रूपये होती. त्यानंतर 2014 मध्ये ती 8 कोटी 94 लाख रूपये झाली. 2019 मध्ये हीच संपत्ती 50 कोटी 41 लाख रूपये झाली. एकूणच काय तर खासदार जिनाजिनगी यांच्या संपत्तीत 4,189 टक्के वाढ झाली. जिनाजिनगी यांनी लोकसभा निवडणूकीत सादर केलेल्या शपथपत्रातूनही ही टक्केवारी उघडकीस आली आहे. जिनाजिनगी यांनी जुलै 2016 ते मे 2019 या कालावधीत पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये काम पाहिलेलं आहे.

एडीआर च्या रिपोर्टनुसार, भाजपचे कर्नाटक येथील आणखी एक खासदार पीसी मोहन हे यादीत दुस-या क्रमांकावर आहेत. बंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघातून मोहन 2019 मध्ये दुस-यांदा निवडून आले. 2009 मध्ये खासदार मोहन यांची संपत्ती 5 कोटी 37 लाख रूपये होती. त्यात वाढ होऊन 2019 मध्ये मोहन यांची संपत्ती 75 कोटी 55 लाख रूपये झाली. म्हणजेच खासदार मोहन यांच्या संपत्तीत 1,306 टक्के वाढ झाली.

भाजपचे उत्तर प्रदेशच्या पीलीभीतचे खासदार वरूण गांधी यांच्या संपत्तीतही घसघशीत वाढ झाली आहे. सलग तीनवेळा खासदार राहिलेल्या वरूण गांधींची संपत्ती 2009 मध्ये 4 कोटी 92 लाख रूपये होती, ती 2019 मध्ये 60 कोटी 32 लाख रूपये झाल्याचे एडीआरच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.

शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर-बादल यांच्या संपत्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे. भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या हरसिमरत यांची संपत्ती 2009 मध्ये 60 कोटी 31 लाख रूपये होती. ती वाढून 2019 मध्ये 217 कोटी 99 लाख रूपये झाली आहे. म्हणजेच हरसिमरत यांच्या संपत्तीत 2009 ते 2019 या दहा वर्षांमध्ये 261 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची 2009 मध्ये संपत्ती ही 51 कोटी 53 लाख रूपये होती, त्यात वाढ होऊन 2019 मध्ये 140 कोटी 88 लाख रूपये झाली. म्हणजेच 2009 ते 2019 या कालावधीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत 89 कोटी 35 लाख रूपयांची वाढ झाल्याचे एडीआर च्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे.

ओदिशा च्या पुरी इथल्या बिजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्रा यांची संपत्ती 2009 मध्ये 29 कोटी 69 लाख रूपये होती. त्यात वाढ होऊन 117 कोटी 47 लाख रूपये झाली. तब्बल 296 टक्क्यांनी ही वाढ झाली आहे.

Updated : 4 Feb 2023 3:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top