Home > News > मुलीची छेड काढणाऱ्या मुलाने थेट मुख्याध्यापकांवरच केला तलवारीने हल्ला

मुलीची छेड काढणाऱ्या मुलाने थेट मुख्याध्यापकांवरच केला तलवारीने हल्ला

मुलीची छेड काढणाऱ्या मुलाने थेट मुख्याध्यापकांवरच केला तलवारीने हल्ला
X

दिवसेंदिवस राज्यात महिला अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. त्यातच शालेय आणि महाविद्यालयीन मुलींना मोठ्या प्रमाणावर छेडछाडीला सामोरे जावे लागते. मात्र मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून मुलाने मुख्याध्यापकांवरच तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली.

राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. त्यातच औरंगाबाद जिल्ह्यात शालेय मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारला म्हणून त्याने मुख्याध्यापक आणि शिपायावर तलवारीने वार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर मुख्याध्यापक आणि शिपायाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मक्रनपुर येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयात मुलीची छेड काढणाऱ्या मुलाला जाब विचारल्याप्रकरणी मुख्याध्यापक आणि शिपायावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील मुलीची एक मुलगा सतत छेड काढत होता. त्यावरून शाळेचे मुख्याध्यापक ए. पी.चव्हाण यांनी या मुलाला जाब विचारला. त्यामुळे जाब विचारल्याचा राग आल्याने मुलाने तलवार घेऊन येत विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.पी.चव्हाण यांच्यावर थेट तलवारीने वार केले. दरम्यान शिपाई संतोष जाधव मध्यस्थी करण्यासाठी आले असता त्यांच्यावरही तलवारीने हल्ला चढवला.

छेड काढणाऱ्या मुलाने मुख्याध्यापक आणि शिपायावर केलेल्या हल्ल्यात मुख्याध्यापक चव्हाण यांच्या खांद्याला आणि कानाला गंभीर जखमा झाल्या. तर या घटनेची माहिती मिळताच शहर कन्नड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मुख्याध्यापक चव्हाण यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर हल्ला झाल्याने शिक्षकांमध्ये आणि मुलींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे हल्लेखोरावर कारवाई करण्याची मागणी शिक्षकांमधून केली जात आहे.

तसेच कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाच्या मुख्याध्यापकांवर हल्ला झाल्याची बातमी समजताच विद्यालयात पालकांनी मोठी गर्दी केली. मात्र छेड काढणाऱ्या मुलाने मुख्याध्यापकांवर हल्ला केल्याने मुलींच्या सुरक्षेसह शिक्षकांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Updated : 4 Feb 2022 3:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top