Home > News > जत्रा पाहून परतणाऱ्या 2 आदिवासी मुलींवर 10 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार

जत्रा पाहून परतणाऱ्या 2 आदिवासी मुलींवर 10 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार

जत्रा पाहून परतणाऱ्या 2 आदिवासी मुलींवर 10 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार
X

झारखंडच्या गुमला जिल्ह्यात दोन आदिवासी मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. दहा तरुणांनी आधी त्या मुलींचे अपहरण केले आणि नंतर त्यांच्यासोबत सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुली अल्पवयीन असून, त्या चुलत बहिणी आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित केलेली जत्रा पाहून त्या आपल्या भावासोबत घरी परत येत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत्रा पाहून पिडीत बहिणी आपल्या भावासोबत परत येत असताना आरोपींनी त्यांना जंगलात अडवले. सुरवातीला भावाला मारहाण करून पळवून लावले आणि त्यानंतर पिडीत मुलींना जंगलात नेऊन त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केला. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली तेव्हा त्यातील एका आरोपीने आत्महत्या केली. तर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आदिवासी मुली जोभीपाट गावात दसऱ्याला भरणारी जत्रा पाहण्यासाठी गेल्या होत्या. संध्याकाळी त्या आपल्या भावासोबत घरी परत निघाल्या. त्यानंतर 10 तरुणांनी निर्जन रस्त्यावरून त्यांचा पाठलाग केला. जंगल लागताच मुलीच्या भावाला मारहाण करून हाकलून दिले आणि जबरदस्तीने मुलींना निर्जन ठिकाणी घेऊन गेले. मुलींच्या म्हणण्यानुसार, सर्व 10 तरुणांनी या दोघांवर बलात्कार केला. मारहाणीनंतर पीडितेचा भाऊ त्याच्या गावात आला आणि घटनेची माहिती दिली. मुलींना शोधण्यासाठी गावकरी जंगलात शिरले. गावकरी येताना पाहून सर्व आरोपी पळून गेले.

पीडित मुलींनी सांगितले की, जेव्हा ते बलात्काराला विरोध करत होते, तेव्हा आरोपी तरुणांनी दोघांनाही मारहाण केली. त्यांनतर मुलींनी गावकऱ्यांसह गुरदरी पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात करत, आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका आरोपी अजित ओरांव याने रविवारी सकाळी आत्महत्या केली.

Updated : 19 Oct 2021 3:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top