Latest News
Home > News > राज्याचं चौथं महिला धोरण शिवरायांच्या चरणी अर्पण!

राज्याचं चौथं महिला धोरण शिवरायांच्या चरणी अर्पण!

राज्याचं चौथं महिला धोरण शिवरायांच्या चरणी अर्पण!
X

बहुचर्चित आणि प्रतीक्षित अशा चौथ्या महिला धोरणाचा मसूदा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसंच आई भवानीच्या चरणी अर्पण करण्यात आला. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी महिला धोरणाची प्रत अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद यावेळी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.


"स्त्रियांना समानतेची न्यायाची वागणूक देणारे स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची " प्रतिक्रिया ऍडव्होकेट ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. तत्पूर्वी स्वराज्याचे कुलदैवत असलेल्या भवानीमातेच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करण्यात आली. राज्यातील समस्त महिलांच्या कल्याणाचे आणि रक्षणाचे साकडे आई भवानी मातेकडे घालून ॲडव्होकेट ठाकूर यांनी प्रतापगडावर शिवध्वजारोहणही केले.

महिला धोरण आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, मात्र आता महिला धोरणाची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य अशी ही महाराष्ट्राची ओळख नवीन धोरणामुळे होणार आहे. महिलांसोबत LGBTQIA+ ( इतर लिंगी समुदाय ) समुदायाचा आवर्जून या धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. असा समावेश असलेले हे बहुधा देशातील पहिलेच धोरण आहे, अशी माहितीही ॲडव्होकेट ठाकूर यांनी यावेळी बोलताना दिली.

महिला धोरण हे केवळ कागदावरच राहणार नाही, तर माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती त्यावर देखरेख करणार आहे. शिवाय महिला व बाल विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स ही स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे या धोरणाच्या अंमलबजावणीवर काटेकोर लक्ष राहिल तसंच, या धोरणात आखून दिलेल्या उद्दिष्टांची पूर्तता ही युद्धपातळीवर होऊ शकेल. या धोरणामुळे या जेंडर बजेटची संकल्पना ही अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

प्रतापगडच का?

या देशाला आधुनिकतेचा विचार देणाऱ्या पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. शिवछत्रपतींनी रयतेसाठी राज्य केले. त्यांच्या स्वराज्यात महिलांना सदैव सन्मानाची वागणूक मिळाली. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन केले जाई. स्वतः महाराजांनी वेळोवेळी आपल्या वर्तणुकीतून महिलांच्या बाबतीत आदर्श घालून दिलेला आहे. शिवछत्रपती ते आजचा भारत व्हाया नेहरू असा भारताच्या पुरोगामीत्वाचा प्रवास आहे. या प्रवासाची आठवण म्हणून प्रतापगडाची निवड करण्यात आली असल्याचं ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगीतलं. यावेळी सातारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजित देशमुख, सातारा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, यांच्यासह इतर अधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 19 Feb 2022 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top