Home > News > महिला स्वातंत्र्यावर बोलण्यास इस्लाम मध्ये वाव; मात्र मुस्लिमांमध्ये नाही

महिला स्वातंत्र्यावर बोलण्यास इस्लाम मध्ये वाव; मात्र मुस्लिमांमध्ये नाही

स्त्री स्वातंत्र्य हा विषय खूप संवेदनशील आहे. स्त्री स्वातंत्र्यवर वाचा पैगंबर शेख यांच मत !

महिला स्वातंत्र्यावर बोलण्यास इस्लाम मध्ये वाव; मात्र मुस्लिमांमध्ये नाही
X

स्त्री स्वातंत्र्य हा विषय तसा खूप संवेदनशील आहे. कारण स्त्री स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय ?स्त्री स्वातंत्र्य हा विषय तसा खूप संवेदनशील आहे. कारण स्त्री स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय ? हे खूप साऱ्या पुरुषांना आणि स्त्रियांना देखील समजलेले नाही. आणी ते माहिती करून घेण्याएव्हढा समजूतदारपणा देखील नाही. महत्वाचे म्हणजे स्त्रीला स्वातंत्र्य दिल्यावर स्त्री आपल्या नियंत्रणातून तर बाहेर जाणार नाही ना ? ही भिती देखील अनेक पुरुषांमध्ये दिसून येते. त्यामुळे स्त्री हक्काचा आणि स्वातंत्र्याचा मुद्दा कितीही वर काढण्याचा प्रयत्न केला तरीही तो धर्माच्या नावावर पुन्हा थोपवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे फक्त मुस्लिमांमध्येच आहे असेही नाही. हे ही तितकेच सत्य.


अरब मध्ये जन्मलेल्या मुलीला तिथले लोक जेंव्हा जमिनीत गाडून टाकायचे, मुलगी झाली हे सांगायला देखील लोकांना लाज वाटायची. त्या काळात पैगंबर साहेबांनी ज्याला मुलगी झाली व त्याने तिचे उत्तमपणे सांभाळ करून तिचे लग्न लावून दिले तो माणूस जन्नत मध्ये जाईल असा विचार मांडला. अर्थातच आता या काळात जन्नत मिळावी म्हणून फक्त कोणीही मुलींचा चांगला सांभाळ करावा अशा विचारांचा मी नाही. एक व्यक्ती म्हणून मुलींना त्यांचे जीवन जगण्याचा, चांगले शिक्षण घेण्याचा आणि आपले निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारांचे जतन करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. आणि हे कार्य जन्नत चा विचार न करता पार पाडावे असेही मी म्हणेल. दोन्हीही विचार वेगवेगळे आहेत. मात्र उद्देश एकच.

स्त्रियांना संपत्तीमध्ये कायदेशीर वाटा देणारा इस्लाम हा जगातील बहुदा पहिला धर्म असावा. लग्न करताना मुलीचा निर्णय देखील महत्वाचा हा देखील विचार पैगंबर साहेबांनी मांडला. मुलीच्या विरोधात जाऊन तिच्या कुटुंबातील लोक तिचे लग्न लावू शकत नाहीत हा आधुनिक विचार त्या काळात पैगंबर साहेबांनी मांडला. अरबमधील काबागृह या मुस्लिमांच्या सर्वात पवित्र अशा स्थळावर महिलांना देखील पुरुषांच्या बरोबरीने त्यांनी प्रवेश दिला. एवढं सगळं खरच पैगंबर साहेबांनी केले होते का ? हा प्रश्न आत्ताच्या पिढीकडे पाहून पडणे साहजिक आहे. ज्या अरब देशातून पैगंबर साहेबांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी इस्लाम जगभर पोहोचवला. त्याच अरब देशात महिलांना वाहन चालवण्याचा परवाना २०१८ साली मिळाला आहे. महिलांना नोकरी करण्याची परवानगी २०२० साली मिळाली. आता याबाबत भारतीय मुस्लिम स्त्रियांनी स्वतःला निश्चितच भाग्यवान समजायला हवे. हे हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला कुठलाही संघर्ष इथे करावा लागला नाही. पण विचार करा त्या स्त्रियांबाबत ज्यांना यासाठी झगडावे लागले.

एवढेच काय तर सौदी अरबचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी एका मुलाखती मध्ये एक महत्वाचे वक्तव्य केले ते म्हणजे 'अरबच्या महिलांनी काय परिधान करायचे आहे ते अरबच्या महिला ठरवतील. हा संपूर्णपणे त्यांचा निर्णय आहे'

किती सुंदर वक्त्यव्य आहे हे. काय असे एखादे मौलाना, एखादे इमाम इजतेमा मध्ये बोलतील का ? महिलांनी काय परिधान करावे हा महिलांचा प्रश्न आहे हे निश्चित. पण तो सर्वथा निर्णय महिलांचा राहील. असे कोणी बोलेल का ? मात्र बुरखा परिधान करण्याचे ईश्वरी आदेश आहे असे म्हणून कित्येक अशा ठिकाणी ज्या ठिकाणी महिला कधीही बुरखा परिधान करत न्हवत्या तिथेही बुरखा परिधान करायला लावला गेला आहे. महाराष्ट्रातील बरीच खेडी आणि गावे याचा अनुभव घेत आहेत. अगदी कित्येक मुस्लिम देखील या गोष्टी मला सांगतात. काहींनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला जरी विचारला तरी पुरे आहे. आणि हा बदल समाजात खूप सहजपणे झाला. त्याला कोणीही विरोध केला नाही. हे सर्वात विशेष होते. म्हणजे साडी मध्ये असलेल्या, किंवा ड्रेस मध्ये असलेल्या मुली महिला या आधी मुस्लिम न्हवत्या का ? हा प्रश्न महिलांना देखील पडायला हवा. तो तुम्हाला तुमच्या घरातील पुरुषांकडून पडू दिला जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.

साधारण वर्षभरापूर्वी हिजाबचा मुद्दा कर्नाटकच्या एका कॉलेज मध्ये झाला होता. तो मुद्दा तिथल्या पुरता मर्यादित होता. त्याचे राजकारण जेवढे भाजपने केले तेवढेच मुस्लिमांमधील स्वतःला समाजाचे ठेकेदार म्हणवणाऱ्या मुस्लिम पुरुषांनी देखील केले. समस्त महिला वर्गाला या लोकांनी हिजाब समर्थनार्थ बुरखा परिधान करून रस्त्यावर उतरवले. जो हेतु भाजप साध्य करत होती. तोच हेतू मुस्लिमांचे ठेकेदार देखील साध्य करत होते. त्यात महाराष्ट्रात 'पेहले हिजाब फिर किताब' चे बॅनर देखील लागले. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे बॅनर लागतात यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते बरे ? मी त्याहीवेळी याचा विरोधच केला होता. पण माध्यमांना माझा विरोध आवडत नव्हता. कारण त्याने भाजपच्या नीतीला धक्का पोहोचला असता आणि त्यांचे सगळे षडयंत्र पाण्यात गेले असते. त्यामुळे त्यांनी मला त्यावेळी अजिबात फुटेज दिली नाही.

मुस्लिमांमधील मसिहांनी कर्नाटकच्या प्रकारणासाठी हजारो महिला रस्त्यावर उतरवल्या. पण ज्यावेळी इराण मध्ये हिजाबच्या विरोधात तेथील महिला रस्त्यावर उतरल्या असताना हजारो महिलांना गोळ्या घालून मारले गेले त्याबद्दल मात्र इथल्या कुठल्याही महिलेला त्याबद्दल वाईट वाटले नाही. त्यांना हे सगळे माहिती आहे का ? हा ही प्रश्न आहेच. पण त्यांच्या कुठल्याही प्रतिक्रिया याबाबतीत नाही. अगदी त्या हिजाब गर्ल ची देखील प्रतिक्रिया नाही. ज्या ताईला समाजाने त्यावेळी खूप डोक्यावर घेतले होते. त्या ताई पर्यंत इराण मधील महिलांचा आवाज पोहोचला नाही का ? हा प्रश्न पडतो. तुम्ही म्हणाल ते बाहेरच्या देशात आहे. त्याचे इथे काय ? तर पॅलेस्टाईन इस्राईलचा विषय पण बाहेरच्या देशातलाच आहे. त्यासाठी इथे मानवी साखळी बनबुन मुस्लिम बांधव निषेध करतात. मग इराण मधील माता भगिनींसाठी हे का बोलत नाहीत ? हा प्रश्न पडतो. त्याही मुस्लिमच महिला होत्या. याठिकाणी आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. तो म्हणजे जॉर्डन देशाचे राजे किंग अब्दुल्लाह. किंग अब्दुल्लाह हे सुन्नी मुस्लिम असून ते पैगंबर साहेबांचे ४१ वे वंशज आहेत. त्यांच्या कुटुंबाचा फोटो पाहिलात तर त्यामध्ये कोणीही बुरखा आणि अगदी हिजाब देखील परिधान केलेला नाही. हीदेखील उदाहरणे मुस्लिमांच्या समोर ठेवणे अतिशय गरजेचे आहे. जेणेकरून मुस्लिमांमध्ये महिलांना पोशाख निवडीचे स्वातंत्र्य याबाबत खुलेपणाने विचार केला जाईल. आणि असा विचार करणे इस्लाम द्रोह होत नाही.

काहींना वाटेल मी मुस्लिमांना यातून टार्गेट करतोय. तर माझ्या बंधू आणि भगिनींनो मला यातून काहीही लाभ होणार नाही. जे लोक तुम्हाला असे सांगून या विचारांपासून प्रवृत्त करतात त्या लोकांनी तुम्हाला मानसिक गुलाम का बनवून ठेवले आहे ? हा प्रश्न त्यांना नक्की विचारा. त्यांच्याकडे काहीही उत्तरे नसतील त्यावेळी ते, हा ईश्वरी आदेश आहे असे म्हणतील. पण मी सांगतो, ईश्वराला तुमच्या पोषख निवडीने काहीही फरक पडत नाही. जो ईश्वर एका आईच्या पायाखाली जन्नत आहे असे सांगतो तो ईश्वर त्या स्त्रीला पोशाख निवडीचे स्वातंत्र्य देणार नाही असे तुम्हाला वाटते का ? निश्चितच जर पैगंबर साहेब या काळात असते तर त्यांनी महिलांचा बुरखा आधी बंद केला असता. हे पैगंबर साहेबांचे नाव घेणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे. पैगंबर साहेबांचे नाव घेणाऱ्यांनी काय करायला हवे माहिती आहे का ? पैगंबर साहेबांचे नाव घेऊन फक्त आणि फक्त आधुनिक विचार मांडावे आणि आधुनिकतेची कास धरावी. जो मागास बुद्धीचा आणि वृत्तीचा आहे तो कधीही पैगंबर साहेबांचा अनुयायी असूच शकत नाही.

Updated : 18 March 2024 3:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top