Home > News > कधी बंद होणार अंधश्रध्देचं 'कुर्माघर'?

कधी बंद होणार अंधश्रध्देचं 'कुर्माघर'?

आपल्या देशात महिलांचं जर सर्वात जास्त शोषण कोणत्या प्रथेमुळे होत असेल तर ते मासिक पाळीच्या विविध प्रथांमुळे! पाळी आल्यावर अपवित्रतेच्या नावाखाली महिलांना त्यांच्या कुटूंबापासून दुर ठेवलं जातं. ग्रामीण भागात तर हे प्रमाण आणखीनच जास्त आहे. ग्रामीण भागात असलेली कुर्माघर प्रथा थांबवण्यासाठी तेथील स्थानिकांचं प्रबोधन करण्याचं काम समाजबंध करतंय. त्याचा आढावा घेणारा हा लेख नक्की वाचा...

कधी बंद होणार अंधश्रध्देचं कुर्माघर?
X

भामरागड तालुक्यातील १८ गावांमध्ये 'सत्याचे प्रयोग' हे शिबिर नुकतेच संपन्न झाले. मासिक पाळीविषयी प्रबोधन या विषयावर यादरम्यान काम करण्यात आले. शिबिरार्थींनी २-२ च्या जोडीने आदिवासी गावातच राहून तिथल्या स्त्री-पुरुषांचे प्रबोधन करायचे असे वेगळे स्वरूप या शिबिराचे होते. महाराष्ट्राच्या १४ जिल्ह्यातील एकूण ४५ युवक यात सहभागी झाले होते.

भामरागड तालुक्यातील काही आदिवासी जमातीत महिलांना मासिक पाळीच्या काळात घरात राहता येत नाही. त्यांना स्वतंत्र झोपडीत रहावे लागते जिला 'कुर्माघर' असे म्हटले जाते. या अस्वच्छ आणि असुरक्षित झोपडीत राहणे महिलांसाठी प्रचंड त्रासाचे व भीतीचे असते. मात्र प्रथा म्हणून ते त्यांना आजही पाळावे लागत आहे. याचविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न या शिबिरात करण्यात आला. यासाठी गावातील सर्व स्त्री-पुरुषांची मतं, माहिती व दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्याशी गप्पा मारत गावाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर गावातील महिलांसाठी व पुरुषांसाठी देखील 'प-पाळीचा' हे जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. त्यात सर्वांना पाळीविषयी शास्त्रीय माहिती देत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली.


समाजबंध निर्मित कापडी आशा पॅड किटचे मोफत वाटप यावेळी महिलांना करण्यात आले तसेच हे पॅड कसे बनवायचे याचं प्रशिक्षण ही महिलांना देण्यात आलं. कापड वापरणाऱ्या महिलांकडून या प्रशिक्षणाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. प-पाळीचा आरोग्य पुस्तिका ही सर्व घरांमध्ये वाटल्या गेल्या. गावकऱ्यांना सोबत घेत कुर्माघरांची स्वच्छता ही यावेळी कार्यकर्त्यांनी केली. भामरागडमधील १८ गावात एकूण १००० महिला व मुलींपर्यंत तसेच १००० युवक व पुरुषांपर्यंत हा विषय या निमित्ताने वैयक्तिक पातळीवर चर्चिला गेला.

कुर्माघरात महिला साप, विंचूदंशाने मरण पावल्याच्या घटना आजही घडत आहेत. तसेच कुर्माघरात असताना आजारी महिला दवाखान्यात जात नाहीत त्यामुळे इतर आजार ही बळावतात, स्वच्छता नसल्याने जंतुसंसर्ग होतो. एकट्या महिलांना भर वादळात, पावसात तकलादू अशा झोपडीत रहावे लागते, रात्री भीतीने आणि पाणी गळतीने झोप येत नाही. इतरवेळी आश्रमशाळेत असणाऱ्या मुलींना सुट्टीत गावात आलं की हे पाळावं लागल्याने शाळकरी मुलींना, नोकरीला असलेल्या, तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या, बाहेरगावी सासर असलेल्या मुलींना आता गाव नकोसा वाटायला लागला आहे. गावातीलही बहुतांश महिलांना या प्रथेतील फोलपणा लक्षात येत आहे, चाळीशीच्या आतील महिलांना तर हे सर्व नकोच आहे. गावातील शिकलेल्या पुरुषांना, युवकांना ही याची गरज नाही असं वाटतंय. पण.... हा पण फार मोठा आहे ! गावातीलच काही प्रस्थापित प्रतिष्ठित व्यक्तींना कुर्माप्रथा मोडणे मान्य नाही कारण ही प्रथा त्यांनी त्यांच्या आदिवासी संस्कृतीचा भाग आहे असं चित्र निर्माण केलं आहे. आणि या निर्णयप्रक्रियेत वर्चस्व असलेल्या 'त्या ४ लोकांचा' रोष ओढवून कोण घेणार ? वाळीत टाकलं, दंड वसूल केला तर ? या भीतीमुळे कोणीही याविरोधात बोलायला-कृती करायला तयार होत नाहीयेत असं समाजबंधचं निरीक्षण आहे. संस्कृती, प्रथा आणि कुप्रथा यातील फरक जोपर्यंत लोकांना समजत नाही तोपर्यंत महिलांचं हे असं शोषण थांबणार नाही.

यासाठी सातत्याने लोकांशी याविषयी बोलणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या विषयावर सातत्याने समाजबंध काम करत आहे, काम करत राहणार आहे. याचाच भाग म्हणून या सर्व गावात याची जाणीव असलेल्या मुलींची 'आरोग्य सखी' म्हणून निवड या शिबिरादरम्यान करण्यात आली आहे. लवकरच त्यांना प्रशिक्षण देऊन त्या मासिक पाळी आणि महिला आरोग्य या विषयावर गावात राहून काम करतील. तसेच दर सहा महिन्यांनी असे शिबीर विविध गावात आयोजित केले जाणार आहे. या शिबिराचा खर्च लोकवर्गणीतून जमा करण्यात आला. स्थानिक प्रशासन, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व गावकरी यांनी केलेले सहकार्य हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मोलाचे ठरले. कुर्माप्रथेला पर्याय म्हणून एकीकडे काही संस्था व शासन अस्पृश्यता पाळणारी आधुनिक कुर्माघरे बांधून देत असताना दुसरीकडे समाजातील काही अनोळखी युवक समाजबंधच्या छत्राखाली एकत्र येत अतिदुर्गम भागात, अनोळखी गावात जाऊन आदिवासी लोकांसोबत राहत त्यांच्याच घरी जेवत-झोपत प्रबोधनात्मक काम करत 'सत्याचे प्रयोग' करतात ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.


Updated : 6 May 2022 6:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top