Home > News > रात्री पावणेबाराची बस आणि तान्हुल्या सोबत ती एकटी...

रात्री पावणेबाराची बस आणि तान्हुल्या सोबत ती एकटी...

रात्री पावणेबाराची बस आणि तान्हुल्या सोबत ती एकटी...
X

रात्रीच्या वेळेला एसटी गावात पोहोचते आणि एका महिलेला घ्यायला कुणी आलेलं नसतं म्हणून ड्रायव्हर गाडी तिथेच थांबवून वाट पाहत बसतो. चितळेंची ही जाहीरात प्रचंड गाजली होती. काल पुण्यात अशीच घटना प्रत्यक्षात घडली. रात्री पावणेबाराच्या सुमारास एक बस संशयास्पदरित्या उभी होती. गाडीचा ड्रायव्हर सीट वर बसून होता आणि कंडक्टर बसभोवती फेऱ्या मारत होता. नेहमीप्रमाणे भटक्या कुत्र्‍यांना खायला घालायला कात्रज-कोंढवा राजस चौक भागात गेलेल्या मनसेच्या वसंत मोरे यांना ही बस दिसली. इतक्या रात्री बस का उभी म्हणून वसंत मोरे बस जवळ पोहोचले. संशय आला म्हणून त्यांनी कंडक्टर ला काय प्रकार आहे म्हणून विचारले.

तेव्हा कंडक्टर नी सांगीतलं की, आम्ही सासवडवरून आलोय, गाडीत एक महिला आहे तिला छोटे बाळ आहे. त्या इकडे बाजूला राहतात. निघताना सांगितले होते की त्यांना राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल पण १५ मिनिटं झाले कोणीच येत नाही, फोन लागत नाही आम्हाला धड गाडी सोडता येईना आणि त्यांना पण, आणि आता रिक्षाही मिळत नाही.

वसंत मोरे यांना या घटनेचं गांभीर्य समजलं. काही दिवसांपूर्वी आसरा देण्याच्या बहाण्याने एका चालकाने एका महिलेवर बलात्कार केला होता. अशा स्थितीत या बसचालक आणि वाहकाने दाखवलेल्या माणुसकी आणि संवेदनशिलतेचं कौतुक करत वसंत मोरे यांनी स्वतःच महिलेचा दीर बनत तिला घरी पोचवायची भूमिका अंगावर घेतली. वसंत मोरे आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात, 'मग मी म्हटलं त्यांचा दीर नाही आला म्हणून काय झालं मीच त्यांचा दीर झालो त्या ताईला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोहचवले. घराच्या दारात पोचवले म्हणून फोटोही काढला. पण खरे धन्यवाद त्या MH 12 RN 6059 बस च्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला! त्यांनी इतक्या रात्री त्या ताईला एकटी उतरू नाही दिली. त्या दोघांची नावे नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर! यात एक चूक घरच्यांची, एकटी ताई इतक्या रात्री इतक्या पिशव्या घेऊन का सोडली? बर सोडली तर मग नेण्यासाठी इतका निष्काळजीपणा का केला ? थोडे तरी शहाणे व्हा.'

वसंत मोरे यांनी महिलेला सुखरूप पणे घरी पोचवून दिलेल्या संदेशाचं सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.

Updated : 16 Jun 2022 10:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top