देशभरातील महिला आयोगांचे अध्यक्ष मुंबईत एकत्र
महिला आयोगांसाठी दोन दिवसीय संवाद व क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन
X
राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व राज्य महिला आयोगांसाठी मुंबई येथे दोन दिवसीय संवाद व क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन भूषवणार आहेत. कार्यक्रमाला मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व श्री. एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
तसेच महिला व बालविकास मंत्री मा. अदिती तटकरे, महिला व बालविकास राज्यमंत्री मा. मेघना बोर्डिकर, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा मा. विजया रहाटकर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा व कार्यक्रमाच्या निमंत्रक श्रीमती रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचा शुभारंभ २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नरीमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडेंट, मुंबई येथे होणार आहे.
या दोन दिवसीय उपक्रमातून महिला आयोगांच्या कार्याला नवी दिशा मिळणार असून महिलांचे हक्क, सुरक्षितता व सक्षमीकरण या उद्दिष्टांना अधिक बळकटी मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केले.
महिला आयोगांचे कार्य अधिक प्रभावी व एकसंध करण्यास हा संवाद उपयुक्त ठरणार असून महिलांच्या हक्कांचे संरक्षण व सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम मोलाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे