Home > News > पोलिसाच्या धाडसामुळे युवकाचे प्राण वाचले, विठ्ठलवाडी स्थानकातील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसाच्या धाडसामुळे युवकाचे प्राण वाचले, विठ्ठलवाडी स्थानकातील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

त्याने आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उडी मारली पण सावध पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवले तरूणाचे प्राण!

पोलिसाच्या धाडसामुळे युवकाचे प्राण वाचले, विठ्ठलवाडी स्थानकातील थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
X

विठ्ठलवाडी स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या मेल समोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय युवकाचे पोलीस नाईक ऋषीकेश माने यांच्या धाडसामुळे प्राण वाचल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या युवकाच्या मागोमाग ट्रॅक मध्ये उडी मारून त्याला रेल्वेट्रॅकच्या बाहेर ढकलत त्यांनी त्याचा जीव वाचवला. क्षणार्धात घडलेल्या या घटनेनंतर त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उल्हासनगर ५ मधील प्रेम नगर टेकडी परिसरात राहणारा कुमार पुजारी हा १८ वर्षीय तरुण आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रेंगाळत असल्याने या फलाटावर ड्युटीवर असलेल्या माने यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास मदुराई एक्स्प्रेस विठ्ठलवाडी स्थानकात दाखल होत असताना गाडीचा वेग जास्त असतानाही कुमार याने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने चालत्या गाडीसमोर उडी मारली. मात्र त्याच्याच मागे असलेल्या माने यांना क्षणार्धात काय घडणार याची कल्पना आल्याने त्यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता त्याच्या मागोमाग ट्रॅक मध्ये उडी मारली आणि क्षणार्धात त्याला पुढच्या ट्रॅक बाहेर ढकलत स्वतःलाही ट्रॅकबाहेर झोकून दिले. इतक्यात वेगाने एक्सप्रेस धडधडत निघून गेली. डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर घडलेल्या घटनेने प्रवाशांसह सर्वाचा श्वास रोखला गेला होता. मात्र मेल निघून गेल्यानंतर या युवकासह माने यांना सहीसलामत पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी या युवकाला कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावले असून या तरुणाचे पोलिसांनी समुपदेशन केले. तर तरुणाचे प्राण वाचविणाऱ्या माने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Updated : 24 March 2022 9:11 AM GMT
Next Story
Share it
Top