Home > News > पद्मश्री राहीबाई यांचे आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन...

पद्मश्री राहीबाई यांचे आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन...

पद्मश्री राहीबाई यांचे आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन...
X

प्रत्येकाच्या आहारात सकस आणि विषमुक्त अन्न जावं यासाठी प्रयत्न केले जावेत. शाश्वत आणि पर्यावरण पूरक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत केली जावी. प्रशासनात काम करताना जनतेचे प्रश्‍न समजावून घेत काम करा पद्मश्री राहीबाई यांचे आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन..

मसूरी , उत्तराखण्ड येथे असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी भारत सरकार यांच्या माध्यमाने सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या फेस वन मधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या 183 आयएएस अधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात संसदीय सदस्य श्री .विवेक तनखा आणि श्रीमती. संध्या रे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

नव्यानेच निवडण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना पद्मश्री राहीबाई यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांना हात घातला . मातीचे होत असलेले प्रदूषण व त्यामध्ये शेती करताना मिसळले जात असलेले मानवी आरोग्यास धोका पोहोचणार रसायने त्यामुळे मानवी आरोग्य व मातीचेही आरोग्य धोक्यात येत आहे .मोठ्या प्रमाणात शेतीची उत्पादन क्षमता घटत आहे. शेतकऱ्यांना वेळीच सावध करणे आवश्यक आहे. देशी बियाणे संवर्धित करून प्रत्येक गावात शेतकऱ्यांसाठी बिज बँक निर्माण व्हावी यासाठी शासनाने अधिकाधिक प्रयत्न करावेत. प्रत्येकाच्या आहारात सकस आणि विषमुक्त अन्न जावं यासाठी प्रयत्न केले जावेत. देशी बियाणे वापरून प्रत्येक दारी परसबाग उभारली जावी. शाश्वत आणि पर्यावरण पूरक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत केली जावी. प्रशासनात काम करताना जनतेचे प्रश्‍न समजावून घेत काम करा असे आवाहन त्यांनी वडिलकीच्या नात्याने उपस्थित प्रशिक्षणार्थींना केले.

छत्तीसगड येथून आलेल्या गोपाल रत्न पुरस्कार विजेत्या माधवी जंगेल यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थींना दूध व्यवसाय आणि रोजगारनिर्मिती या विषयी सखोल मार्गदर्शन केले. महिलांच्या माध्यमाने दूध व्यवसाय व प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू करुन हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या माधवी जंगेल या छत्तीसगडमध्ये आदर्श ठरल्या आहेत.या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड कॅडरचे 36 आयएएस अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातून सुमारे पंधरा आयएएस अधिकारी निवडले गेले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र कॅडरमध्ये असलेले सुहास गाडे , मृणाली जोशी , विनायक महामुनी, निवृत्ती आव्हाड, आदित्य जीवने या अधिकाऱ्यांनी राहीबाई यांचे मार्गदर्शन व विचार समजून घेतले. त्यांच्यासह इतर 36 आयएएस अधिकारी या प्रशिक्षण वर्गात उपस्थित होते. एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा राहीबाई यांचे दर्शन घेत या सर्व प्रशिक्षणार्थींनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले.मावशींना बघून महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांना आपली आईच आपल्याला भेटायला आल्याचा विशेष आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. महाराष्ट्राचे तरुण तडफदार आयएएस अधिकारी श्रीकांत विसपुते यांनी या प्रशिक्षण वर्गाचे नियोजन आणि सूत्रसंचालन केले . बायफ संस्थेचे सुरू असलेले विविध उपक्रम व बीज बँक यांचे महत्व बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी समजाऊन दिले तसेच द्विभाषिकाची भूमिकाही पार पाडली. आयएएस प्रशिक्षणामध्ये अशाप्रकारे शेती आणि शेतकऱ्यांचे विचार ऐकून घेण्याचा अनोखा उपक्रम यावेळी राबवला जात असल्याबद्दल सर्वांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Updated : 19 April 2022 4:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top