Home > News > २४ तास फक्त लावणीचा विश्व विक्रम, लातूरच्या कन्येचा अभिमानास्पद पराक्रम!

२४ तास फक्त लावणीचा विश्व विक्रम, लातूरच्या कन्येचा अभिमानास्पद पराक्रम!

२४ तास फक्त लावणीचा विश्व विक्रम, लातूरच्या कन्येचा अभिमानास्पद पराक्रम!
X

आशिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी लातूरची कन्या सृष्टी जगतापचा इतिहासात पहिल्यांदा नॉनस्टॉप २४ तास लावणीचा विक्रम. मनात जर धेय्य गाठायची इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो. याचंच उत्तम उदाहरण दाखवून दिलंय ते लातूरच्या सृष्टी जगतापनं. लातूरच्या पोतदार शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या सृष्टीनं कमालच करून दाखवली आहे. आज एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सृष्टीनं सलग २४ तास लावणी सादर करत विश्वविक्रम केलाय. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दुपारी २ वाजता सृष्टीने लावणीला सुरूवात केली. तेव्हापासून लावणीच्या तालावर थिरकणारे तिचे पाय थेट २७ जानेवारीला दुपारी २ नंतरच थांबले.

सृष्टीला लहानपणापासूनच नृत्याची प्रचंड आवड आहे. नृत्याप्रती असलेलं तिचं प्रेम हे विलक्षण आहे. हा विश्वविक्रम प्रस्थापित करता यावा यासाठी सृष्टी गेल्या वर्षभरापासून तयारी करत होती. गेल्या वर्षभरात सृष्टीने अनेकदा सलग १२ तास नृत्य करत या विक्रमासाठी स्वतःला तयार केले होते. सृष्टीचं नृत्याच्या प्रती असलेलं वेड पाहून ती हा विक्रम करणार अशी तिच्या आई वडीलांना अपेक्षा होती, आणि अगदी तसंच झालं.

२७ तारखेला लातूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात सृष्टीनं हा विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम नोंदवण्यासाठी दयानंद महाविद्यालयात विशेष तयारी करण्यात आली होती. सृष्टीला थकवा जाणवू नये यासाठी दर एका तासाला ३ मिनिटांच्या आरामाची मुभा देण्यात आली होती. तसेच एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या डॉक्टरांचं एक विशेष पथक सृष्टीची दर तासाला तपासणी करत होतं. तिच्या संपूर्ण नृत्याचं परिक्षण करण्यासाठी एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे परिक्षक तिथे उपस्थित होते. बुधवारी सृष्टीने हा विक्रम तिच्या नावावर केल्यानंतर तिच्या आई बाबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सृष्टीचे वडील सुधीर जगताप आणि आई संजीवनी जगताप हे दोघेही लातूरच्या औसा तालुक्यातील कारला गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत.

Updated : 28 Jan 2021 7:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top