भारतापाठोपाठ आता नेपाळमध्येही मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. या घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासनाने ही माहिती दिली आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असून, परिस्थिती इतकी भयानक आहे की देशाच्या विविध भागांतील शेकडो कुटुंबांना आपली घरे सोडून इतर ठिकाणी जावे लागले आहे. काठमांडू टाइम्सच्या वृत्तानुसार, अवकाळी पावसामुळे झालेल्या आपत्तीमुळे सुदूर पश्चिम प्रांतला सर्वाधिक फटका बसला आहे.
नेपाळच्या कांचनपूर, डोटी, कैलाली, डुडेलधुरा, बैतडी आणि बऱ्हांग जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. याशिवाय महाकाली, कर्नाली आणि सेती नद्यांनी दशकातील सर्वाधिक पाण्याची पातळी नोंदवली आहे, ज्यामुळे जीवित आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. डोटीच्या जिल्हा पोलीस कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनाच्या वेगळ्या घटनांमध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे आणि एक जण बेपत्ता आहे.