महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवसीय ‘शक्ती संवादाचे आयोजन
महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यामाने मुंबईत दोन दिवसीय ‘शक्ती संवादाचे आयोजन... सर्व राज्यांतील महिला आयोगांचा सहभाग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन
X
मुंबई, 21 ऑगस्ट: महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने पुढाकार घेतला असून राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यामाने महिला सक्षमीकरणासाठी मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतल्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये या शक्ती संवादाचे उद्घाटन होणार आहे. या शक्ती संवादाची सविस्तर माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रहाटकर व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी दिली.
राष्ट्रीय महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी देशव्यापी मोहीम हाती घेतली असून विविध राज्यांमध्ये जाऊन महिलांसाठी तसेच संपूर्ण समाजाच्या जागृतीसाठी शक्ती संवादाचे आयोजन करत आहे. याद्वारे महिला सक्षमीकरण, प्रशिक्षण तसेच देशात महिलांच्या सुरक्षा, सक्षमीकरणाविषयी असलेल्या कायद्यांची माहिती देणे, प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देणे, या संदर्भात व्यापक जनजागृती करणे, असे कार्यक्रम आयोजित करीत आहे. याच साखळीतील पुढचा कार्यक्रम 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट 2025 या दोन दिवशी मुंबईतल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये आयोजित केला असून या शक्ती संवाद उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला आणि बालविकास मंत्री मा. आदिती तटकरे उपस्थित राहतील. यासोबच त्याचबरोबर देशभरातील राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि पदाधिकारी या शक्ती संवादामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत.
कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि कायदेशीर प्रतिबंधात्मक उपाय योजना या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाने तयार केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल.
शक्ती संवादाची रूपरेषा
राष्ट्रीय महिला आयोगाने शक्ती संवाद कार्यक्रमाची दोन दिवसांची सविस्तर रूपरेषा निश्चित केली असून पहिल्या दिवशीच्या परिसंवादांमध्ये देशातल्या महिला आयोगांसमोर असलेली आव्हाने आणि संधी, त्याचबरोबर मानवी तस्करी विरोधातील कायदे आणि अंमलबजावणी, विविध संस्थांमधील समन्वय यांचा समावेश असेल.
त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सुरक्षा, राज्यघटना निर्मितीत महिलांचे योगदान, यासोबतच महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, कामाच्या ठिकाणची सुरक्षितता आणि काळजी त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी लिंग समानता, या विषयावर भर देणाऱ्या परिसंवादाचाही शक्ती संवादात समावेश आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने देशातल्या विविध क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींची एक सल्लागार समिती नेमली आहे. महिला विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी प्रभावी सूचना करण्याचे काम ही समिती करते. या समितीचे सदस्य देखील शक्ती संवादामध्ये सहभागी होऊन आपले मोलाचे योगदान देणार आहेत. यासोबतच देशभरातील विविध विषयांतील तज्ज्ञ, मान्यवर अभ्यासक या शक्ती संवादात सहभागी होणार आहेत.