Home > News > शाब्बास गड्या! कोव्हिडमुळे वैधव्य आलेल्या मुलीसोबत लग्न करत त्याने उचललं अनोखं पाऊल

शाब्बास गड्या! कोव्हिडमुळे वैधव्य आलेल्या मुलीसोबत लग्न करत त्याने उचललं अनोखं पाऊल

शाब्बास गड्या! कोव्हिडमुळे वैधव्य आलेल्या मुलीसोबत लग्न  करत त्याने उचललं अनोखं पाऊल
X

जगभरात हडकंप माजवणाऱ्या कोव्हिडमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अनेक नवविवाहित मुली विधवा झाल्या. कोरोनामुळे विधवा झालेल्या अशाच एका मुलीसोबत राहुरी येथील किशोर ढुस या तरुणाने लग्न केलं आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.


किशोरने केवळ या मुलीलाच आधार दिला नाही तर तिच्या नऊ महिन्याच्या बाळाचादेखील स्विकार केला आहे. दरम्यान राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी या दांपत्याचा सत्कार करत त्यांच्या नऊ महिन्याच्या बाळाच्या नावावर अकरा हजार रुपयांची मुदत ठेव ठेवली आहे. या प्रसंगी बोलताना तहसीलदार फसीयोद्दीन शेख साहेब म्हणाले की, माझी तब्बेत ठीक नसल्याने व आज रविवार असल्याने घरातून बाहेर कुठे जाण्याचा माझा अजिबात विचार नव्हता, मात्र मला फोनवरून या विवाहाबद्दल माहिती मिळाली , नऊ महिन्याचे बाळ असलेल्या कोरोना एकल महिलेशी माझ्या पुतण्याने विवाह करून तिला जगण्याची नवीन उमेद दिली, आधार दिला, तिचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन केले, हे ऐकून मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी या विवाहासाठी आलो. कोरोनाने कित्येक कुटुंबावर संकट कोसळले आहे, कित्येक महिला विधवा झाल्यात त्यांना शासन स्तरावर मदत देण्याचे काम सुरू आहे, पण आज किशोरने जो आधार या एकल मुलीला आणि तिच्या बाळाला दिला त्याबद्दल त्याचे आभार मानावे तितके थोडेच आहे, किशोर ढुस यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणारे असून कोणत्याही मदतीपेक्षा आज कोरोना एकल महिलांना आधाराची गरज आहे आणि तो आधार किशोरने दिला. हे खूप मोठे धाडस असून, त्याच्या कुटुंबियांनी देखील त्याच्या या निर्णयाला समर्थन दिले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.


किशोर हा अहमदनगर येथील नोबेल रुग्णालयात कार्यरत आहेत. अतिशय मनमिळाऊ आणि सामाजिक भान जपणाऱ्या किशोरसारखा जीवनसाथी मिळाल्याने त्याच्या पत्नीने देखील समाधान व्यक्त केलं आहे. पतीच्या निधनानंतर नऊ महिन्याच्या बाळासह संपूर्ण आयुष्य कसं काढायचं ? बाळाच्या भविष्याचं काय ? असे अनेक प्रश्न तिच्यासमोर उभे ठाकले असताना किशोरने आधार दिल्याने तिला नवी उमेद मिळाली आहे.

Updated : 9 Dec 2021 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top